अशी बनते चहा पावडर 

"कॅमेलिया सायनोन्सिस" या झुडुपांच्या पानांपासून चहा पावडर बनविली जाते. कमीत कमी १०० ते १२५ से.मी. पर्जन्यमान असणार्‍या प्रदेशात चहाची लागवड केली जाते. दक्षिण चीन, आणि दक्षिणपूर्व आशिया येथे चहाच पिक अधिक आढळत. भारतात आसाम, दार्जिलिंग, निलगिरी, डेहराडून, मणिपूर, तराई, त्रावणकोर, आदि ठिकाणी चहाचे मळे आहेत. चहाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो.
          जगातील जवळजवळ सर्वच चहाचे मळे १५०० मीटर्स उंचीवर डोंगर उतारावर आहेत. साधारणतः तीन फुटाच्या अंतराने लावलेली चहाची झुडुपे तीन फुटापर्यंत वाढू देतात. मग त्याचा वरचा भाग खुडला जातो. दर वीस वर्षांनी जुनी झाडे काढून टाकून तीन वर्ष जमीन पडीक ठेऊन नवी झाडे लावली जातात. ही नवीन रोप तयार व्हायला किमान पाच वर्ष लागतात.
        चहाच्या झाडाची कोवळी पाने तोडण्याचे काम बहुतेक चहाच्या मळ्यात बायकाच करतात. पाने तोडल्यावर ती फॅटरीत आणली जातात. आणि तेथे त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. १.] विदरिंग :- खुडलेल्या पानातील पाण्याचा अंश कमी करण्यासाठी ही पाने विदरिंग रॅक्सवर पसरली जातात. सुमारे दहा ते पंधरा तास ती पंचवीस ते तीस अंश सेल्सियस तापमानाला वाळविली जातात. २.] रोलिंग ;- वाळलेली चहाची पाने मशिनरोलच्या सहाय्याने चुरडली जातात. या प्रक्रियेमुळे पानातील रस पानाच्या पृष्ठभागावर जमा होतो. ३.] ऑक्सिडेशन ;- या प्रक्रियेमध्ये पानांवर ऑक्सिजन सोडला जातो. तो पानांमध्ये शोषला जाऊन पानांना विशिष्ट रंग येतो. ऑक्सिडेशनच्या कमी अधिक प्रमाणानुसार पानांचे हिरवा, का़ळा हिरवट तांबूसा असे रंग मिळतात. ४.] फायरिंग :- या प्रक्रियेत ऑक्सिडेशन केलेला पानाचा भुगा गरम हवेच्या झोताखालून फिरवत खूप तापविला जातो. त्यामुळे पाण्याचा राहिलेला अंश पूर्ण शोषला जाऊन चहापावडर काळी पडते. ५.] सॉर्टिंग :- वरील चार प्रक्रियांमधून बाहेर पडलेली पावडर वेगवेगळ्या चालण्यांमधून सरकवली जाते. आणि शेवटी पावडरीच्या जाडीनुसार वेगवेगळ्या पेट्यात भरली जाते. 
          साधारणतः शंभर किलो चहाच्या पानांपासून वीस किलो चहापावडर तयार होते. नंतर चहाचा दर्जा ठरवण्याचे काम टेस्टरला करावे लागते. चहाचा रंग, चव, वास यानुसार चहाची प्रत ठरवली जाते. चहाची किंमत ठरवण्यासाठी चहाचा लिलाव केला जातो. जगभरात एकूण तेरा ठिकाणी ही लिलाव केंद्र आहेत.
          चहा बनवण्याच्या प्रक्रियेतील फरकामुळे विविध प्रकारचा चहा तयार होतो. १.] सी टी सी चहा :- यालाच काळा चहा असे म्हणतात. हा चहा भारतात जास्त प्रमाणात वापरला जातो. तो अनेक तास विदरिंग, अनेक तास ऑक्सिडेशन, आणि दोनशे अंश फॅरनहीट तापमानाला सुकविला जातो. २.] ऊलाँग टी :- सी टी सी चहाप्रमाणेच सर्व प्रक्रिया यात केल्या जातात मात्र ऑक्सिडेशनची क्रिया सी टी सीच्या निम्मा वेळ केली जाते. ३.] ग्रीन टी :- या प्रकारात ऑक्सिडेशनची प्रक्रिया अगदी कमी वेळ केलेली असल्याने या प्रकारच्या चहात पानांचा हिरवा रंग कायम असतो. चीन तसेच जपानमध्ये ग्रीन टी अधिक वापरला जातो. ४.] मिक्चर चहा :- हा थोडा स्वस्त असा चहा असून तो हॉटेलमध्ये वापरण्यात येतो. ५.] हर्बल टी :- या प्रकारच्या चहात वेगवेगळ्या वनस्पतींचे अर्क मिसळलेले असतात.