डॉ. राधाकृष्णन 

५ सप्टेंबर १८८८ मध्ये एका मध्यमवयीन कुटुंबात राधाकृष्णन यांचा जन्म झाला. घरी पैशाची श्रीमंती नसली तरी मनाची श्रीमंती फार होती. त्यांचे आई वडील कष्टाळू, धार्मिक , प्रेमळ व स्वाभिमानी होते. डॉ. राधाकृष्णन यांच्या मनावर हेच संस्कार झाले. घरातील धार्मिक वातावरणामुळे त्यांना अध्यात्माची गोडी लागली.
अवघ्या १५व्या वर्षी ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे बी. ए. साठी त्यांनी तत्त्वज्ञान ह विषय घेतला. आणि या परीक्षेत ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. नंतर याच विषयात एम. ए. ची पदवी मिळवून ते "प्रेसिडन्सी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करू लागले. विद्यार्थ्यांत प्रिय ,तसेच अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यंची ख्याती होती. पुढे म्हैसूरला नवीन विद्यापीठाची स्थापना झाली; आणि तेथून डॉ. राधाकृष्णन यांना 'तत्त्वज्ञान विभागप्रमुख, म्हणून बोलावणे आले. यानंतरच त्यांचे व्यक्तिमत्व झळकू लागले. सन १९२६ मध्ये इंग्लंड येथे "आंतरराष्टीय तत्त्वज्ञान परिषद" भरली होती. त्या परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून राधाकृष्णन यांची निवड झाली. हिंदूधर्म तत्त्वज्ञानाबाबतचे विचार त्यांनी तेथे उत्तम रितीने मांडले. इंग्लंड , अमेरिका आदि ठिकाणी त्यांनी भाषणे केली. भारतात परतल्यावर त्यांची नेमणूक आंध्र विद्यापीठाचे कुलुगुरू म्हणून झाली.
डॉ. राधाकृष्णन हे हाडाचेच शिक्षक होते. शिक्षणाची व शिकवण्याची त्यांना मनापासूनच आवड होती. त्यांचा अभ्यास व वाचन प्रचंड होते. ते राष्ट्रपती झाले तेंव्हा 'एका हातात छडी आणि दुसर्‍या हातात भगवत गीता घेऊन राधाकृष्णन जगातल्या सार्‍या मुत्सद्द्यांना शिकवत आहेत" असे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. कोणत्याही व्यक्तीला योग्य शिक्षण देण्याचे सामर्थ्य राधाकृष्णन यांच्याकडे होते. पुढे आंध्र विद्यापीठाने त्यांना "डॉक्टरेट" ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.शिक्षण व सामाजिक क्षेत्रातल्या त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना "भारत रत्न" हा किताब दिला. सन १९६२ मध्ये स्वतंत्र भारताचे 'दुसरे राष्ट्रपती' म्हणून त्यांची निवड झाली. डॉ. राधाकृष्णन यांनी तत्त्वज्ञान व हिंदुधर्माचे महत्त्व सांगणारे अनेक ग्रंथ लिहिले. आपले सारे आयुष्य शिक्षण क्षेत्राला वाहिलेल्या डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजारा केला जातो.