कॉफी 

एक उत्तेजक पेय म्हणून फार पूर्वीपासून कॉफीपान केले जाते. अशी कथा सांगतात की सुमारे नवव्या शतकात इथिओपितातील एक मेंढपाळ रानात बकर्‍या चरायला नेत असताना त्याच्या अस लक्षात आल कि एका विशिष्ट झाडाची पाने खाल्ल्यावर बकर्‍या ताज्यातवान्या होतात. याची  सत्यता पडताळून   पहाण्यासाठी  त्यानेही त्या बिया खाऊन पाहिल्या. त्यालाही तोच अनुभव आला. त्यानंतर त्या गावातील काही संन्याशांनी त्या बिया पाण्यात उकळवून ते पाणी पिऊन बघितले. तेंव्हा त्यांनाही ते प्यायल्यावर ताजतवान वाटल. या घटनेपासून मग कॉफी पिण्यास सुरुवात झाली असे म्हटले जाते. इसवीसन ११००च्या सुमारास अरब समाजात फॉफीपानास प्रारंभ झाला. तेथे अनेक कॉफीगृहे बांधण्यात आली. त्यानंतर सन १६००च्या सुमारास युरोपात व अमेरिकेत कॉफी प्रचारात अली. सन १६५२ मध्ये पहिल कॉफीहाऊस युरोपात इंग्लंडमध्ये बांधण्यात आले.
        अफ्रिकेमध्ये इथिओपिया, युगांडा, झैरे हे कॉफीचे प्रमुख उत्पादक देश आहेत. दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये आज कॉफीच सर्वात जास्त उत्पादन होत. याशिवाय कोलंबिया, मेक्सिको हे देशही कॉफी उत्पादनात नाव कमावून आहेत. आशिया खंडात इंडोनेशियामध्ये कॉफीच उत्पादन जास्त प्रमाणात होत. आपल्या भारतात कर्नाटक, केरळ आंध्रप्रदेश, ओरिसा, आसाम, मणिपूर, मिझोराम, मेघालय,  त्रिपुरा, नागालँड, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी कॉफीची लागवड केली जाते.
               कॉफीचे झाड पंधरा-वीस वर्ष जगू शकते. साधारणतः सहा ते पंधरा फुटापर्यंत कॉफीच्या झाडाची उंची ठेवली जाते. तीन ते चार वर्षानंतर त्याच्या हिरव्या पानांच्या देठावर पांढर्‍या रंगाची फुले झुपक्यानी येतात. या फुलांमधून हिरव्या रंगाची फळे येतात. साधारणत: चौदा आठवड्यानंतर ही फळे चांगली लाल होतात. मग ती फळ काढून सुकविली जातात. त्याचा गर व साल बाजुला काढून बिया वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर त्या बिया छोटी छोटी छिद्र असलेल्या पिंपांमध्ये ठेऊन १५० ते २५० अंश सेल्सियस तापमानाला चांगल्या भाजल्या जातात. आणि लगेच थंड केल्या जातात. त्यानंतर त्या दळल्या जातात. अशाप्रकारे कॉफीपावडर तयार केली जाते.
        उत्तेजक पेय म्हणून कॉफीचा वापर सर्रास होत असला तरी कॉफीचे अन्यही उपयोग केले जातात. लिंबू पिळलेली ब्लॅक कॉफी "लूज मोशन"वर औषध म्हणून घेतली जाते. योग्य प्रमाणात कॉफीपान केल्याने उतारवयात होणारे अल्झेमर, पार्किन्स, लिव्हर सिर्‍होसिस, हार्ट डिसीज होण्याची शक्यता कमी असते असे प्रयोगान्ती आढळून आले आहे. कॉफीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यासारखी द्रव्य असल्याने कॉफीचे अवशेष पाण्यात मिसळून झाडांना घातले तर झाडांची वाढ चांगली होते असे म्हणतात. मात्र कॉफीचा अतिरेक निद्रानाश, आयर्नची कमतरता, इत्यादि आजारांना आमंत्रण देणारा ठरतो.