आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन 

१५ मार्च हा दिवस आंतर राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष  जे. एफ. केनेडी यांच्या मते "कोणत्याही उपक्रमाचा केंद्रबिंदू ग्राहक असतो. अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक आणि उत्पादक असे दोन गट नाहीत. कारण ग्राहक हा जसा उत्पादक असू शकतो, तसाच उत्पादक हा कधी कधी ग्राहकही असू शकतो. फक्त प्रसंगानुसार त्यांच्या भूमिका बदलत असतात. असे असूनही ग्राहक हा अर्थव्यवस्थेतला सर्वात दुर्लक्षित घटक आहे". हे मत मांडून केनेडी गप्प बसले नाहीत. तर सन १९६० मध्ये आपली अध्यक्षपदाची निवडणूक लढवताना नेमक्या याच गोष्टीवर त्यांनी भर दिला. सेनेटमध्ये ग्राहकांची बाजू मांडण्याचे अश्वासनही त्यांनी दिले. आणि निवडून आल्यावर ते आश्वासन त्यांनी पाळले. केनेडींनी हे भाषण १५ मार्च सन १९६२ मध्ये केले होते. म्हणूनच पुढे या दिवसची आठवण म्हणून इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ कन्झुमर युनियनने १५ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून मान्य केला.