आयुर्वेदाचा जनक चरक आणि त्याची चरक संहिता 

भारतात उत्तरांचल राज्यातील गढवालमध्ये 'चारेख' या गावी माग ब्राह्मण कुटुंबात चरकाचा जन्म झाला.पाच हजार वर्षाची परंपरा असलेल्या "आयुर्वेदाचा जनक" म्हणून चरकाचे नाव घेतले जाते. जीवनशैली आणि मानवी प्रयत्न यामुळे मनुष्याचा आयुष्यकाल वाढवता येतो असे सांगणारा चरक हा पहिला वैद्य होता. माणसाचे आरोग्य आणि अनारोग्य हे खाणे पिणे, पचनक्रिया, आवश्यक घटक शोषून घेणे, त्याचे शरिरात एकरूप होणे, आणि चयापचय यावर ठरते असे चरकाने सांगितले. वात, पित्त आणि कफ या तीन तत्त्वावर तसेच रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, आणि शुक्र हे सात शरिर घटक याबरोबरच मूत्र विष्ठा आणि घाम या टाकाऊ पदार्थावर माणसाची वाढ आणि झीज अवलंबून असते; आणि त्यानुसार मनुष्य प्राण्याच्या शरिराचे कार्य चालते; हा विचार चरकाने प्रथम मांडला. कफ, वात, पित्त यातील समतोल बिघडला कि माणूस रोगग्रस्त होतो असे चरकाचे म्हणणे होते. शरीरघटकातील अस्वस्थता म्हणजे आजार उलट त्यांच्यातील समतोल म्हणजेच आरोग्य आणि म्हणून रोगाच्या बाबतीत रोगनिदान काटेकोर होणे महत्त्वाचे असे चरक मानत असे. वैद्यक शास्त्राचे अप्रतिम ज्ञान, भरपूर व्यावहारिक अनुभव, हस्तकौशल्य,आणि आचरणातील शुद्धता हे चार गुण डॉक्टरांमध्ये असलेच पाहिजे असे मानणार्‍यापैकी चरक होता. वैद्यकशास्त्राबरोबरच तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांचाही अभ्यास वैद्यकशास्त्रात आवश्यक आहे असे चरकाचे म्हणणे होते.  रोगाची लक्षणे समान असली तरी त्याच्या भोवतालचा परिसर, हवामान, यामुळे वेगवेगळ्या रोग्यांना वेगवेगळी औषधे दिली पाहिजेत असे चरकाचे सांगणे असे. आपल्या संशोधक वृत्तीमुळे आणि जबरदस्त बुद्धिसामर्थ्याने चरकाने अनेक रोग प्रकाशात आणले. मधुमेह, क्षय, हृदयविकार यासारखे रोग त्यांनी आपल्या संशोधनाने शोधले होते. शरिरशास्त्र, जननशास्त्र, गर्भवृद्धिशास्त्र, औषधविज्ञान, अनुवंशिकता, रक्ताभिसरण या सारख्या वैद्यकीय संज्ञा चरकाने प्रथम मांडल्या. शरिरात दातांसहित एकूण ३६० हाडे असतात हे चरकानेच शोधून काढले. बाह्यांगाचे विकार, मध्यांगाचे विकार, केंद्रीभूत विकार अशी विकारांची वर्गवारी करून रोग बरे न होण्याची कारण मीमांसाही चरकाने सांगितली आहे. औषधे बनवण्यासाठी प्राणी, वनस्पती, खनिजे यांचा वापर कसा करावा आणि जवळजवळ ६०० औषधे बनविण्याच्या पद्धती चरकाने आपल्या चरक संहिता या ग्रंथात संगितल्या आहेत.
                   चरक संहितेत आयुर्वेदाचे ज्ञान कथित केले आहे. हे ज्ञान ब्रह्मदेवाने प्रजापतीला, प्रजापतीने अश्विनीकुमारांना, अश्विनीकुमारानी इंद्राला, इंद्राने भारद्वाज ॠषींना दिले. मग भारद्वाजांनी ते ज्ञान इतर ॠषींना दिले. त्यापैकी पुनर्वसू आणि अत्रेय ॠषींनी आपल्या जवळील हे ज्ञान भंडार अग्निवेश, पराशर, हरित, भेद, जतुकर्ण, सारपाणी या आपल्या सहा महाशिष्यांकडे सोपविले. त्यापैकी अग्निवेश यांनी मूळ संहिता तयार केली. अग्निवेशांनी रचलेली ही संहिता चरकांनी संस्कारित केली. आणि मग जो ग्रंथ तयार झाला तोच आज चरक संहिता म्हणून ओळखला जातो. चरक संहितेत सुमारे १००००० वनस्पतींचे वैद्यकीय गुणधर्म व युपयुक्तता यांचे वर्णन केले आहे. त्यात शोधन, शमन, पथ्य, निदान परिवर्जन,सत्ववजय, रसायन अशा सहा उपचारपद्धती सांगितल्या आहेत. मन आणि शरीर यांच्यावर आहार आणि उद्योग यांच्या होणारे परिणाम, अध्यात्म अणि शारीरिक अरोग्य यांचा परस्पर संबंध यांच्या चर्चेबरोबरच चरकाने  डॉक्टरांच्या नितीतत्वाची सनदही या चरक संहितेत विशद केली आहे. वैद्यक शास्त्राच्या विविध शाखा, डॉक्टर्सचे प्रकार, शुश्रुषेच्या पद्धती, याबरोबरच कपडे, चालीरिती, पेयपान, धूम्रपान, दैनंदिन आयुष्य, दंतकथा आदि अनेक गोष्टींचा समावेश चरक संहितेत आहे. आयुर्वेदाचा तात्त्विक व वैचारिक पाया कथन केल्यावर निदानखंड, सूत्रखंड, शरीर खंड, इंद्रिय खंड, चिकित्सा खंड, कल्प खंड, सिद्धी खंड अशा सहा खंडात चरक संहितेची विभागणी झाली आहे. या चरक संहितेचे पर्शियन, अरेबिक, इंग्रजी भाषेत भषंतरे झाली आहेत.