सज्जनगड 

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या नैॠत्य दिशेला जवळजवळ दहा किमी. अंतरावर उरमोडी नदीच्या खोर्‍यात वसलेला सज्जनगड पूर्वी "परळीगड" म्हणून ओळखला जायचा. त्यानंतर विजापूरच्या आदिलशहाच्या काळात तो "नवरसतारा" म्हणून संबोधला जाऊ लागला. दोन एप्रिल सन १६७३ मध्ये शिवरायांनी आदिलशहाकडून तो जिंकून घेतला. मग शिवरायांनी आपले गुरू समर्थ रामदासस्वामी यांना या गडावर वास्तव्य करण्याची विनंती केली. तेंव्हपासून म्हणजे सन १६७३ ते सन १६८१ सालापर्यंत समर्थ रामदास स्वामी याच गडावर राहिले. समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेला हा भाग्यशाली गड पुढे "सज्जनगड" म्हणून नावारूपाला आला.
सातारा शहरापासून दहा किमी. अंतरावर असलेल्या परळी गावातील या गडाला ७८० पायर्‍या आहेत. गडाला दोन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा "छत्रपती शिवाजी महाराज द्वार" म्हणून उल्लेखला जातो. या प्रवेशद्वाराच्या माथ्यावर पर्शियन शिलालेख कोरलेला आहे. दरवाज्यातून प्रवेश केल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. त्यात समर्थ शिष्य श्रीधर स्वामींनी स्थापन केलेल्या हनुमान व वराह यांच्या मूर्ती आहेत. तेथून पुढे काही पायर्‍या चढल्यावर दुसरा दरवाजा लागतो. तो "समर्थ प्रवेशद्वार" म्हणून ओळखला जातो. या दरवाजातून आत आल्यावर छान वेलबुट्टीनी सजलेला सहा भागात विभागलेला एक शिलालेख लक्ष वेधून घेतो. या शिलालेखाच्या पुढे डाव्या हाताला "घोडाळे" नावाच तळ आहे. या तळ्याच्या काढावर एक पडकी मशिद आहे. मशिदीच्या पुढे आग्नेय दिशेला चालत गेल्यावर श्री "आंग्लाई देवी"च मंदिर आहे. समर्थ रामदास स्वामींना अंगापूरच्या डोहात सापडलेल्या चतुर्भूजा महिषासूरमर्दिनीच्या मूर्तीची स्थापना या देवळात केली आहे. मंदिराच्या परिसरात अनेक समाध्या आणि मंदिरासमोर ध्वजस्तंभाचा बुरूज आहे.
      गडवरील सर्वात महत्त्वाची वास्तू म्हणजे श्रीराम मंदिर. या मंदिराच्या तळघरात समर्थांची समाधी आहे. २२ जानेवारी सन १६८२ मध्ये समर्थांनी आपला देहत्याग केला. त्यांच्यावर जेथे अग्निसंस्कार करण्यात आले; तेथे छ्त्रपती संभाजी राजांनी समर्थांच वृंदावन बांधून घेतल. सन १७०० मध्ये औरंगजेबाने सज्जनगड जिंकून घेतला तेंव्हा सर्वच नासधूस झाली. नंतर परशूरामपंत प्रतिनिधीनी पुन्हा किल्ला जिंकून घेतल्यावर त्यांनीच वृंदावनाच्या जागी राम मंदिर आणि त्याच्या तळघरात समर्थांचे समाधी वृंदावन बांधून घेतल. मंदिरात भव्य साभामंडप आहे. गाभार्‍यात संगमरवरी मंदिरात श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या पितळी प्रभावळीतील सुबक मूर्ती आहेत. त्यांच्या पुढ्यात हनुमानाची देखणी मूर्ती आहे. या सुबक मूर्ती अंध कारागिराने बनविल्या आहेत.समर्थांच्या समाधीसमोर सतत तेवणारी पितळी समई व पितळी दिवे आहेत. मंदिराच्या समोर उंच जोत्यावर समर्थांचा मठ आहे. या वास्तूमध्ये शेजघर आहे. त्यामध्ये समर्थांच्या नित्य वापरातील वस्तू ठेवलेल्या आहेत. मठाच्या बाहेरील आवारात प्रदक्षिणेच्या मार्गावर समर्थ शिष्या वेणाबाई व अक्काबाई यांचीही वृंदावन आहेत. मठाच्या मागच्या बाजुला उंच ओट्यावर स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती आहे. या ठिकाणाला "ब्रह्मपिसा" अस म्हणतात. या ब्रह्मपिसापासून पुढे जवळच दक्षिणाभिमुख हनुमानाच "धाब्याचा मारुती" म्हणून ओळखल जाणार छोटेखानी मंदिर आहे. हेच गडाच अखेरच टोक.