फायूम चित्रे 

          प्राचीन काळापासून इजिप्तमध्ये मृत शरीर जतन करण्याची प्रथा होती. मृत शरीराबरोबरच त्याच्या ऐहिक वस्तूसुद्धा वाळूमध्ये प्रत असत. या शरिराची ओळख म्हणून त्या शरिराबरोबर त्या मृताचे चित्रही ठेवले जाई. मृत शरीर तसेच्या तसे टिकावे म्हणून त्यात विशिष्ट प्रकारे मसाला भरण्यात येत असे आणि मेण रंगाचा वापर करून त्याबरोबरची चित्रेसुद्धा बर्‍याच काळपर्यंत टिकवण्यात येत. .
              अशी चित्रे इजिप्तमधील पूर्व फायूम प्रांतातील एर-रुबियात आणि हावारा या ठिकाणी थिओडोर ग्राफ नावाच्या प्राचीन कलेच्या अभ्यासकाला मिळाली. अर्थात फायूम या गावावरूनच या चित्रांना " फायूम " चित्रे म्हणून संबोधले जाते.
फायूम चित्रे तयार करताना लोखंडी तक्त्याचा वापर करून अर्धवट वितळलेल्या मेणात रंग मिसळण्यात येतात. नंतर पोलादी छुरिकेने ते चित्राला लावण्यात येतात. यासाठी वापरलेल्या मेणाला "प्युनिक वॅक्स" असे म्हणतात. यामध्ये वापरलेल्या मेणबंधकामुळे चित्रातील रंगाची सतेजता कायम टिकण्यास मदत होते. अशा चित्रात सर्वसाधारणपणे प्रौढ स्त्री-पुरुषांचीच चित्रे काढली गेलेली आढळतात. बोलके डोळे हे या चित्रांचे खास वैशिष्ट्य. या चित्रांमध्ये पूर्ण मानवी शरीर काढलेले नसते. तर समोरून दिसणारा एका बाजुला वळलेला चेहरा,मोठे बोलके डोळे, एक कान संपूर्ण दिसणारा तर दुसरा थोडासा दिसेल असा, उजवीकडे वा डावीकडे वळलेले खांदे, केशरचना, दागदागिने आणि छातीवरील वस्त्र एवढ्याचेच दर्शन या चित्रातून होते.