हबल दुर्बीण 

सन १६०९ मध्ये गॅलिलिओने "अपवर्ती दुर्बीणी"चा शोध लावला. गॅलिलिओच्या या दुर्बीणीमध्ये ज्या त्रृटी होत्या त्या नाहिश्या  करण्याच्या प्रयत्नात सर आयझॅक न्यूटन यांनी ''परावर्ती दुर्बीणी''चा शोध लावला. त्यानंतर अनेक मोठ्या दुर्बीणी बांधण्याचे काम जगभरात चालू झाले. परंतु पृथ्वीवरील वातावरणामुळे अवकाशातील अंधुक वस्तूंचे निरिक्षण करणे कठीणच होत होते. अशावेळी अवकाशातच दुर्बीण स्थापण्याची कल्पना पुढे येऊ लागली. सन १९२३ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ ''हरमान ओबर्थ'' यांनी ही कल्पना प्रथम मांडली. त्यानंतर लेमन स्पिट्झर यांनी सन १९४० मध्ये अवकाशस्थ दुर्बीणीबाबतचे आपले विचार मांडले. पण अजूनही ही अवकाशस्थ दुर्बीणीची कल्पना लोकांना अशक्य घटनाच वाटत होती. सन १९६२ मध्ये अमेरिकेच्या "नॅशनल अकॅडमीज ऑफ सायन्सेस" ने या कल्पनेवर काम करण्याचे ठरवले. आणि सन १९७० मध्ये अवकाश दुर्बीणीच्या प्रकल्पाला सुरूवात झाली. या कामासाठी निधी गोळा करण्यात आणखी काही कालावधी गेला. अखेर सन १९८३ मध्ये अमेरिकेतील बाल्टिमोरमधील जॉन्स हाफकीन्स युनिव्हर्सिटीत " स्पेसटेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट''ची स्थापना करण्यात आली. २४ एप्रिल सन १९९० रोजी " डिस्कव्हरी" स्पेस शटल हबल दुर्बीण घेऊन आकाशात झेपावले. दंडगोलाकृती आकाराच्या या दुर्बीणीची लांबी १३.१ मीटर व रुंदी ४.३ मीटर असून तिचे वजन ११.६ टन इतके आहे. तिच्या मुख्य आरशाचा व्यास २.४ मीटर आहे. हबल दुर्बीणीचा वेग ताशी २९००० किमी. आहे. सन १९२० च्या दशकात हबल नावाच्या शास्त्रज्ञाने विश्व प्रसरण पावत असल्याचे दाखवून दिले होते. विश्वाचा धांडोरा घेणार्‍या या दुर्बीणीला त्या शास्त्रज्ञाचेच नाव  दिले गेले.
                  सुरवातीला हबल दुर्बीणीतून मिळणार्‍या प्रतिमा फारच धूसर होत्या.शिवाय हबलच्या सौरपट्ट्या सूर्यप्रकाशातून अंधारात जाताना आणि अंधारातून सूर्यप्रकाशात जाताना आकुंचन-प्रसरणामुळे थरथरत असत. त्यामुळे दुर्बीणही बराच वेळ थरथरत राही. हबल दुर्बीणीतील हे दोष दूर करण्यासाठी सन १९९३ मध्ये " एंडेव्हर " नावाच्या स्पेस शटलमधून काही अंतराळवीर अवकाशात उतरले. त्यांनी हबलचा मुख्य आरसा, सौरपट्ट्या आणि इतर उपकरणांची दुरूस्ती केली. त्यानंतरही आणखी पाच वेळा अंतराळवीरांनी अवकाशातील हबलला भेट देऊन तिच्यात सुधारणा घडवून आणली. त्यामुळे हबल दुर्णीणीची क्षमता आता पहिल्यापेक्षा साठ पटीनी वाढली आहे. अवकाशातून येणारा दृश्य प्रकाश, अवरक्त किरणे, अतिनील किरणे यांचे निरिक्षण हबलने केले. अवकाशातील ग्रहांची, तार्‍यांची, सूर्याची आणि इतरही अवकाशस्थ वस्तूंची अनेक वेळा, काही अंतराने पुन्हा पुन्हा छायाचित्रे घेतल्याने तुलनात्मक अभ्यास करणे शास्त्रज्ञांना शक्य झाले. शिवाय दूरवरच्या दीर्घिकांचे नेमके अंतर मोजण्यातही हबलने मोलाची सहायता केली आहे. सन १९९० पासून सातत्याने अवकाशाच्या वेगवेगळ्या  भागाचे सातत्याने निरिक्षण करण्याचे काम हबल दुर्बीण करत आहे. दूरचे विश्व हे जवळच्या विश्वापेक्षा वेगळे आहे हे हबलने दाखवून दिले. हबलचा वापर करून कृष्णविवरांच्या अभ्यासाला गती मिळाली. ओरायन तेजोमेघातील नवीन निर्माण होत असलेल्या तार्‍याभोवतीच्या ग्रहनिर्मितीच्या चकतीचे सूक्ष्म निरिक्षण करणे हबलमुळेच शक्य झाले आहे. अवकाशस्थ तार्‍यांच्या जीवनाबाद्दलची माहिती, तार्‍यांची निर्मिती, त्यांचा मृत्यू, त्यांचे आयुष्यमान इत्यादि अनेक गोष्टींची अधिक माहिती मिळणे हबल दुर्बीणीमुळे शक्य झाले.