कवी भा. रा.तांबे 

भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्म सन १८७३ मध्ये मध्यप्रदेशातील झाशीजवळील मुंगावली येथे झाला. झाशी येथे त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर देवासच्या राजकुमाराचे शिक्षक म्हणून नोकरी केली. आणि त्यासाठी इंदुर येथे वास्तव्य केले. याच काळात त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. सन १८९७ मध्ये ते विवाहबद्ध झाले. संस्थानी नोकरीमुळे त्यांना ग्वाल्हेर, अजमेर,प्रतापगड अशा अनेक ठिकाणी फिरावे लागले. पण ग्वाल्हेर येथे राजकीय कवी म्हणून ते स्थायिक झाले. आणि सन १९४१ मध्ये ग्वाल्हेर येथेच त्यांना देवाज्ञा झाली.

सन १९२० मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. आज त्यांच्या २२५ कविता उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रेम कविता, बालगीते, विधवाविषयक गीते, मृत्युगीते,अशा अनेक प्रकारांचा समावेश होतो. याशिवाय नाट्यगीते व भावगीते हे त्यांचे खास लेखन प्रकार आहेत. आपल्या काव्यात कवी तांबे यांनी रंगरेषांचा योग्य वापर आणि नाद व अर्थ यांचा सुरेख संगम साधलेला आढळतो. गेयता हे त्यांच्या कवितेचे खास वैशिष्ट्य आहे.