आपट्याची पाने 

हिंदू धर्मात दसरा हा सण साडे तीन मुर्हुतापैकी एक असा समजला जातो. आपट्याच्या झाडाची पाने दसरा ह्या सणाच्या दिवशी "सोने" म्हणून लुट्ण्याची परंपरा आहे. पुराण कथे प्रमाणे राम पिता रघुराजाने मोठा यज्ञ करून सगळी संपत्ती दान करून टाकली. त्याच वेळी वरतंतू नावाच्या ॠषींकडे आध्ययन करणार्‍या कौत्स नामक ब्राम्हणाला गुरुदक्षिणा म्हणून दान करण्यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. कौत्साने निष्कांचन झालेल्या रघुराजाकडे सुवर्णमुद्रांची याचना केली. त्याला रिकाम्या हाताने पाठवणे योग्य नाही म्हणून रघुराजाने कुबेराला सुवरर्णमुद्रांचा वर्षाव करायला सांगितला. त्या सुवर्ण मुद्रा ज्या झाडा वर पडल्या ते झाड आपट्याचे होते.कौत्स्याने आपल्याला हव्या तेवढ्याच सुवर्णमुद्रा घेतल्या आणि बाकी उरलेल्या अयोध्यावासियांना वाटून टाकल्या. तो दिवस दसर्‍याचा होता. आणि म्हणूनच दसर्‍याला आपट्याची पाने आपण एकमेकांना सोन म्हणून देतो.
                आपट्याचे झाड मध्य भारतात सगळीकडे दिसत. रेताड माती आणि कोरड्या हवेत ते चांगल वाढत. आपटाचे शास्त्रीय नाव "बाऑहिनिया रेसिमोसा" आहे. जीन बाऑहिनि  {५४१- १६१३} आणि  गास्पार्ड बाऑहिनि असे दोन भाऊ सोळाव्या शतकात प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. त्याच्या स्मरणार्थ  जोडपानासारख्या  दिसणार्‍या  द्विखंडीय पानाचे नाव ''बाऑहिनिया'' असे करण्यात आले. बाऑहिनिया च्या असंख्य जाती  अस्तिवात आहेत. "रेसीम" प्रकारचा फुलोरा असलेल्या या झाडाच्या प्रजातीचे नामकरण रेसिमोसा असे झाले.
आपट्याची पाने खालून पांढरी आणि वरुन हिरवी असतात. आपट्याच्या झाडाच्या लाकडाचा वापर फक्त जळण्यासाटी करतात. तर आपट्याची साल हीऔषध म्हणून वापरतात. आपट्याची फुले मार्च ते जून या दरम्यान येतात.  या फुलांधून चपट्या लांब शेंगा येतात. थंडी मध्ये सर्व जुनी पाने गळून जातात  आणि शेंगा मात्र झाडावर लटकत रहातात.
सर्व साधारण पणे आपटाच्या झाडाची लागवड मुद्दामहून करत नाहीत. परंतु दसरा या सणा ला मात्र निष्काळजी पणे या झाडाला ओरबाडण्यात येते. अशी झाडाची हानी न करण्याचा निश्चय आपण सर्वांनी या दसरा सणाला केला पाहिजे. झाडाची हानी करुन सोन वाटण्याची ही प्रथा बंद करुया. आणि त्याऐवजी दसर्‍याला एक तरी झाड लावू या.