चहाते चहाचे 

सकाळी चहा घेतल्याशिवाय दिवस सुरू झाल्यासारखेच वाटत नाही असे म्हणणर्‍यांची संख्या अफाट आहे.
 मग कोणी घोटभर घेईल तर कोणी  मगभर.चहा पिणे योग्य की अयोग्य  यावर बरेच मतभेद आहेत.कोणी त्याची उपयुक्तता विषद करतो; तर कोणी चहा हानिकारक कसा हे पटवून देतो.  तरी सुद्धा चहा या पेयाचे बरेच चहाते आहेत हे निश्चित. प्रत्येक देशात चहा करणार्‍यांच्या नाना तर्‍हा आहेत.चीनमध्ये चहा ला "चायी" असे संबोधतात. गेली अनेक शतके चीन मधे हिरव्या पानांचा चहा पिण्यात येतो. गंध असलेली योग्य प्रमाणातील चहाची पाने उकळ्वून पारंपारिक चहा करण्यात येतो. जपानमध्येही चहापान महत्वाचे समजले जाते. चहा देण्याच्या खास पद्धतींचे तेथे प्रशिक्षणही दिले जाते.तिबेटमध्ये ब्रोक टी ची पाने चुरडून रात्र भर पाण्यात भिजवतात. आणि नंतर त्यात मीठ, बकरीचे दूध व याकच्या दूधाचे लोणी घालून लोणीयुक्त चहा पितात. तर मंगोलियामध्ये ब्रोक टी च्या पानाची दारू करुन त्यात  मीठ, बकरीचे दूध, लोणी व भाजलेले दाणे मिसळून चहा बनवतात. इराण  व अफगाणिस्तानात ग्रीन टी पिण्यात येतो. अमेरिकेध्ये भरपूर  साखर घालून बर्फ घातलेला चहा  पिण्यात येतो. मोरोक्को या देशात  ऊंच  चांदीच्या  किटलीतून  ग्रीन टीचे  मिश्रण  घेउन  त्यात  गरम  पाणी घालतात. हे मिश्रण छोट्या  पेल्यामध्ये थोडे  उंचावरुन  ओततात,  जेणेकरुन  त्याला  सोनेरी  फेस  येतो. ओमान येथे चहा मधे साखर घातलीच जात नाही.
          अशा या नानादेशाच्या चहाच्या नाना तर्‍हा. आपल्या भारतात मात्र  पाण्यामध्ये साखर, चहापावडर घालून ते पाणी उकळवतात. व नंतर त्यात दूध घातले जाते. चहा बनवण्याच्या पद्धतीत जशी विविधता आढळते तशीच विविधता चहा पिण्याच्या भांड्यात आढळते. बहुतांश घरामध्ये तो कप-बशी किंवा मगातून समोर येतो. तर काही वेळा स्टीलचे पेले, मातीच्या कुल्हाणी यांचाही वापर होताना दिसतो. चहाच्या टपरीवर हाच चहा हल्ली प्लॅस्टिकच्या कपातून दिला जातो. त्यातही कटिंग चहा आणि फूल कप असाही प्रकार आढळतो. काहीवेळा हा चहा उकळलेल्या पाण्याबरोबर टी बॅगमधूनही ऐतीत दिला जातो.
.                 चहा करण्याचे, आणि चहापानाचे विविध प्रकार असले तरी प्रत्येक चहात्याला आपलीच पद्धत पसंत असते. 'पसंत अपनी अपनी' असे म्हणून प्रत्येक चहाता दुसर्‍याच्या पद्धतीला नाक मुरडून आपल्या खास चहाचा मनसोक्त मनसोक्त घेत असतो.