मधमाशी एक उपयोगी कीटक 

मधमाशी,तिचे मधाचे पोळे, तिचे सतत उद्योगीपण, तिचे चावणे, तिचे या फुलावरून त्या फुलावर नृत्य करणे या सार्‍याच गोष्टी अजब आहेत. एक छोटासा कीटक माणसाच्या किती उपयोगी पडू शकतो हे मधमाशीच्या जीवनक्रमावरून कळते. मधमाशीच्या घराला पोळे म्हणतात. मधामाशीचे  हे पोळ  म्हणजे अल्लाउद्दिनचा खजिनाच. कितीतरी उपयुक्त पदार्थ त्यापासून मिळतात. हे पोळे तयार करण्यासाठी लागणारे मेण मधमाश्यांच्या पोटावरील ग्रंथींपासून तयार होते. त्याला "बीज वॅक्स" असे म्हणतात. कृत्रिम मेणापासून बनविलेल्या मेणबत्यांच्या वापरापूर्वी या बीजवॅक्सचाच वापर केला जात असे. आजही सौंदर्य प्रसाधनात बीजवॅक्सचा वापर केला जातो. अर्थात हे मेण महाग असते. कारण एक किलो मेण तयार करण्यासाठी आठ ते दहा किलो मध वापरला जातो. मधमाशीच्या पोळ्यात "प्रोपोलिस" नावाचा चिकट पदार्थ सापडतो. यालाच "बी-ग्लू डिंक" असेही म्हणतात. पोळ्याच्या बाजू  बळकट करण्यासाठी व त्यावरील छिद्रे नाहीशी करण्यासाठी त्याचा वापर या पोळ्यामध्ये केलेला असतो. काही विशिष्ट कळ्यांमध्ये प्रोपोलिक्स सापडते.मधमाशी कळ्यांच्या विशिष्ट भागावर चिर देऊन हा प्रोपोलिक्स गोळा करते. आणि आपल्या पायांवरील परागकणांवर चिकटवते. पोळ्याजवळील इतर मधमाश्या हा पदार्थ काढून घेतात व त्यात आपली लाळ मिसळून त्याचा वापर पोळ्याच्या मजबूतीसाठी करतात. या प्रोपोलिक्समध्ये अनेक प्रकारचे क्षार व जीवनसत्वे असतात. औषध म्हणून त्याचा वापर मानवांकडून होत असतो. मधमाशी फुलाफुलांतून परागकण गोळा करत असतात.ते परागकण त्या आपल्या पोळ्यात साठवतात. या परागकणांमध्ये सुद्धा प्रथिने, क्षार, जीवनसत्वे व काही प्रमाणात शर्करा असते. या परागकणांना "बी-पोलन" असे म्हणतात.केस गळती थांबवण्यास, तणाव कमी करण्यास बी- पोलन हे उपयुक्त औषध अहे. मधमाशीच्या पोळ्यातील काही कोषांमध्ये एक प्रकारची जेली सापडते. तिला "रॉयल जेली" किंवा "राजरस" असे म्हणतात. अतिशय पौष्टिक असलेली ही रॉयल जेली राणीमाशीचे अन्न म्हणून वेगळे साठविले जाते. हॄदयरोग, यकृताच्या समस्या यावर उत्तम इलाज म्हणून काही लोक त्याचा वापर करतात.