संत नामदेव 

२६ ऑक्टोबर १२६० मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीला संत नामदेवांचा जन्म झाला.वडील दामाशेट आणि आई गोणाबाई दोघेही विठ्ठलभक्त होते. पिढीजात शिंप्याचा धंदा करणार्‍या दामाशेटनी लहान वयातच नामदेवाचे लग्न राजबाई नावाच्या मुलीशी करून दिले. नामदेवांना एक मुलगी आणि एक मुलगा झाला. पण लहानपणापासून देवभक्तीकडे ओढा असलेले नामदेव संसारात फारसे रमले नाहीत.विसोबा खेचर हे त्यांचे अध्यात्मिक गुरू होते. ज्ञानेश्वरांबरोबर त्यांनी काशी, गया, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, मारवाड, राजस्थान, पंजाब, गुजरात इत्यादि अनेक ठिकाणी तीर्थयात्रा केली.ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतरही नामदेवांनी भक्तीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पुन्हा तीर्थयात्रा केली. वारकरी संप्रदायाचा विठ्ठल भक्तीचा महिमा अगदी उत्तरेत जाऊन पोहोचविला. लोकभाषेत अनेक भक्तिरचना करून किर्तने, प्रवचने याद्वारे भक्तिमहिमा लोकात रुजवण्याचे कार्य नामदेवांनी केले.समाजातील अंधश्रद्धा, मूर्तिपूजेला मिळालेले अवास्तव महत्त्व, कर्मकांडे, जातिधर्मभेद,यावर आपल्या प्रेमळ शब्दात नामदेवांनी हल्ला चढविला. नामदेवांनी भक्तिमार्गाच्या प्रसारांतून लोकांना नैतिकतेचे धडे दिले. स्वार्थाच्या पलिकडे पहायला शिकवले. सर्वसमावेशक अशा परमेश्वराचे चिंतन करताना सांसारिक गोष्टींचा त्याग करून निष्काम होणेच उचित आहे असे नामदेव म्हणत. ईश्वर मंदिरात किंवा मशिदीत नसून आपल्या अंतरंगात, प्रत्येक जीवात, प्रत्येक अणूरेणूत सामावलेला आहे ही शिकवण नामदेवांनी दिली.
                  शिखांचे गुरू अर्जूनसिंह यांनी " ग्रंथसाहिबा " या पवित्र ग्रंथात नामदेवांच्या एकसष्ट पदांचा समावेश केला आहे. पंजाबात घुमान या गावी नामदेवांचे मंदिरही आहे. "गाथापंचक" या ग्रंथामध्येही नामदेवांच्या हिंदी पद्यरचनांचा समावेश करण्यात आला अहे. नामदेवांच्या साहित्यरचनेमध्ये कीर्तन, भजन, लोकसंगीत, भक्तिरचना, उपदेश, कूट पदे अशी विविधता आढळते.या सर्व रचना भक्ती, तत्त्वज्ञान,नाममहात्म्य या विषयावर आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर परप्रांतात जाऊन लोकजागृती करणारे नामदेव हे पहिलेच मराठी संत आहेत.