महात्मा गांधीजींचे एकादशव्रत 

२५ मे १९१५ रोजी महात्मा गांधीजींनी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील कोचराब येथे "सत्याग्रह आश्रमा"ची स्थापना केली परंतु दोनच वर्षांनी तो आश्रम त्यांनी साबरमती येथे हलवला. या आश्रमात प्रवेश घेण्यासाठी महात्मा गांधीजींनी अकरा नियम ठरवले. सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य, अस्तेय, अपरिग्रह, आस्वाद, अभय, अस्पृश्यतानिवारण, शरीरश्रम, सर्वधर्मसमभाव, स्वदेशी अशा या अकरा नियमांना एकादशव्रत म्हणून ओळखले जाते. आपल्या या आश्रमात वास्तव्य करणार्‍या प्रत्येक सत्याग्रहीने या व्रतांचे काटेकोर पालन करावे असा त्यांचा आग्रह होता. विनोबा भावे यांनी या एकादशव्रतांना "युगप्रवर्तक व्रते" असे म्हटले आहे.
१.]  सत्य :- "सत्यच परमेश्वर" अस महात्मा गांधी नेहमी  म्हणत असत. आणि म्हणून जिथे सत्य आहे तिथे परमेश्वर आणि शुद्ध ज्ञान असलच पाहिजे अस ते म्हणत. "बोलल्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच सत्याने वागणे" इतक सोप स्पष्टिकरण सत्याविषयी गांधीजीनी केल आहे.
२.] अहिंसा :- महात्मा गांधीनी अहिंसा शब्द व्यापक अर्थाने वापरला होता. कायेने, वाचेने आणि मनाने कोणालाही न दुखविणे म्हणजे अहिंसा. या अहिंसेतून जगातल्या सर्व गोष्टींवर निरपेक्ष प्रेम त्यांना अपेक्षित होत. आपल्या स्वतः प्रमाणेच इतरांच्या हृदयातही परमेश्वराचा वास आहे या जाणीवेतून इतरांशी वागणे म्हणजे अहिंसा. अर्थात अहिंसा म्हणजे सर्व सहन करणे अस त्यांनी सांगितल नाही. तर व्यक्ती आणि समाजाच्या रक्षणासाठी करावी लागणारी हिंसा त्यांना मान्य होती. त्यांना अहिंसेमध्ये सेवाही अभिप्रेत होती. अहिंसेमध्ये साहस, हिंमत निर्भयता या सार्‍या वृत्ती वाढीस लागतात. असे महात्माजी म्हणत.
३.] ब्रम्हचर्य :- सर्व इंद्रियांवर संयम म्हणजे ब्रम्हचर्य असे गांधीजी म्हणत. अर्थात मनामध्ये विकारांच चिंतन आणि बाह्यतः इंद्रिय संयम अस वर्तन म्हणजे शुद्ध स्वतःचीच स्वतः केलेली  फसवणूक होय. ब्रह्मचर्य व्रतात गांधीजींना स्वयंशिस्त अभिप्रेत होती.
४.] अस्त्येय :- अस्त्येय म्हणजे "चोरी न करणे". दुसर्‍याच्या कोणत्याही वस्तूची अभिलाषा मनानेसुद्धा न करणे म्हणजे अस्त्येय. दुसर्‍याच्या वस्तूवर अधिकार न दाखवणे म्हणजे अस्त्येय.
५.] अपरिग्रह :- परिग्रह म्हणजे भविष्यासाठी केलेली तरतूद. अपरिग्रह म्हणजे कोणत्याही गोष्टीचा साठा न करणे. आपल्या नित्य गरजेपुरतेच मिळवणे आणि जे आहे त्यात समाधान मानणे, या गोष्टी अपरिग्रह व्रतात समाविष्ट आहेत.
६.] आस्वाद :- सर्व इंद्रियाबरोबरच जिभेवरही संयम हवा असे गांधीजी म्हणत असत.साध्या रहाणीबरोबरच अत्यंत साधा आहार ते पसंत करत. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आहारावर नियंत्रण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
७.] अभय :- आपण कोणालाही न भिण आणि कोणी आपल्याला न भिण म्हणजे अभयव्रत. भयामुळेच हिंसा होते असे गांधीजीचे मत होते. तसेच भयातून मुक्त होणार्‍यालाच सत्याचा शोध घेता येतो अशी त्यांची श्रद्धा होती.
८.] अस्पृश्यता :- "प्रत्येक सजीव निर्जीवात जर परमेश्वराचा निवास आहे" असे आपण म्हणतो तर स्पृश्य-अस्पृश्य हा भेद करण्याची गरजच नाही. निसर्गात जे जे आहे ते ते सारेच स्पृश्य आहे अशी त्यांची धारणा होती. अस्पृश्यता मानणे हे महापाप आहे असे गांधीजी सांगत.
९.] शरीरश्रम :- शरीरश्रमात गंधीजींना स्वावलंबन अभिप्रेत होत. श्रमाचे संस्कार शाळेपासूनच मुलांना मिळाले पाहिजेत यासाठी गांधीजींनी श्रमाधिष्टित आणि मूल्याधिष्टित शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला. श्रमव्रताच्या पालनाने समाजातील गरिब-श्रीमंत, उच्च-नीच अशासारखे भेद नष्ट होतील असे गांधीजींना वाटत असे.
१०.] सर्वधर्म समभाव :- सर्व धर्मांचा सखोल अभ्यास केल्यानंतर गांधीजीनी सर्वधर्म समभावाचे व्रत स्विकारले. विभिन्न लोकांमध्ये असणारा आत्मा जसा एक आहे तसेच सर्व धर्मांची मूलतत्व एकच आहेत. एकाच वृक्षाला जशा अनेक फांद्या असतात तसेच सर्व धर्मांचे मूळ एकच आहे; त्यामुळे आपल्या धर्मापेक्षा वेगळ्या धर्माचा द्वेष न करता त्यातील चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात असे गांधीजी म्हणत.प्रत्येकाने सर्वधर्म समभावाचे व्रत स्विकारले तर सार्‍या जगात शांतता प्रस्थापित होईल असा त्यांचा विश्वास होता.
११.] स्वदेशी :- स्वदेशीच्या व्रतामध्ये गांधीजींना शेजार्‍यांची सेवा अपेक्षित होती. माझा शेजारी माझ्या गरजा भागवण्यास समर्थ असेल तर मी त्याची मदत आधी घेईन; त्याने बनविलेले कापड त्याने तयार केले धान्य किंवा अन्य वस्तू घेतल्याने माझ्या गरजा पूर्ण होतीलच आणि  त्याच्या मिळकतीसाठीसुद्धा त्यामुळे माझा हातभार लागेल अशा  व्यापक अर्थाने गांधीजींचे स्वदेशी व्रत होते. त्यात केवळ विदेशी मालावर बहिष्कार अपेक्षित नव्हता. तर स्वतःच्या देशातील व्यावसायिकांच्या फायद्याचा विचार त्यात आधी होता.
             अशाप्रकारे गांधीजींचे एकादश व्रत हे अभ्यासातून स्विकारलेले व्रत होते. त्यासाठी सर्व धर्मांच्या प्रमुख ग्रंथांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता.  स्वामी विवेकानंदांचा राजयोग, पतंजलीचे योगसूत्र,  भगवद्गीता, रस्किनचे "अन टू त लास्ट " हे पुस्तक या सार्‍यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. गांधीजींच्या एकादश व्रतातील पहिली पाच व्रत ही सर्वच धर्मांनी अगोदरच सांगितलेली आहेत. सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य, अस्त्येय, अपरिग्रह यांना वैदिक धर्मात "महाव्रत", जैन धर्मात "पंचमहाव्रत",म्हणून ती स्विकारली आहेत. गौतम बुद्धाने 'पंचशील" तर पतंजलीने "पंचयम" म्हणून त्यांचा पुरस्कार केला आहे. त्यांना पूरक म्हणून गांधीजींनी इतर सहा व्रतांचा समावेश आपल्या एकादश व्रतात केला आहे.