नवरात्रीतील हादगा 

गुजराथी बांधव नवरात्रीमध्ये गरबा खेळतात. टिपरीच्या तालावर सुरांच्या संगतीत छानछान पोषाख करून गोल रिंगणात फेर धरून नाचतात. महाराष्ट्रात घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमा या दिवसात "हादगा" रंगात येतो. या हादग्यालाच "भोंडला" असेही म्हणतात. पाटावर हत्ती काढून त्यावर फुलांची आरास करतात. त्याची पूजा करतात. नंतर त्याभोवती बायका मुली फेर धरून नाचतात. नाचताना भुलोबाची किंवा हादग्याची गाणी म्हणतात. " एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू ", " ऐलमा पैलमा गणेश देवा", " अक्कण मती चिक्कण माती", "आतातरी जाऊ द्या माहेराला", "शिंक्यावरच लोणी खाल्ल कोणी" अशा गाण्यांमधून मुलींना आपल्या परंपरेतील संसारविषयक कल्पना सांगितल्या जातात. सासर माहेर मधला फरक ,कुटूंबातील नातेसंबंध यांची जाणीव करून दिली जाते. नाच गाण्याचा खेळ संपल्यावर खिरापतीचा खेळ सुरू होतो. प्रत्येक घरातून खिरापतीसाठी वेगळा पदार्थ आणला जातो. मग डब्यामध्ये असलेला खिरापतीचा पदार्थ ओळखण्याचा खेळ बराच वेळ रंगतो. ज्याची खिरापत ओळखता येणार नाही तो या खेळात जिंकतो. त्याला दुप्प्ट प्रसाद दिला जातो.त्यामुळे नाविन्यपूर्ण खिरापत आणण्याची  चढाओढच या दिवसात लागलेली असते.कोजागिरीला नैवेद्य दाखवला जातो.
 पाटावर काढावयाच्या हत्तीसंबंधी एक आख्यायिका सांगितली जाते. "गरुडाचल नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला माधवी नावाची मुलगी होती. माधवीसाठी वर संशोधनाच्या निमित्ताने गरुडाचल  विष्णूच्या वाड्यात गेला. आपल्या सोन्याच्या पलंगावर बसून विष्णू गरुडाचलाकडून माधवीची माहिती ऐकू लागला. त्याचवेळी तो सोन्याचा पलंग, त्यावरची मऊमऊ गादी, त्या गादीवरचे रेशमी कापड पाहून माधवीला त्या पलंगावर बसावेसे वाटले. ती चटकन उठून त्या पलंगावर विष्णूशेजारी जाऊन बसली. हे पाहून त्या पलंगाशेजारी उभ्या असलेल्या विष्णूपत्नीला राग अला. तिने माधवीला "तू अश्वमुखी होशील " असा शाप दिला. तो शाप ऐकताच गरुडाचल संतापला. त्याने लक्ष्मीला " तू हत्तीण होशील " असा शाप दिला. लक्ष्मी हत्तीण बनून पृथ्वीवर आली. आणि गरुडेश्वर नावाच्या तिर्थक्षेत्री जाऊन तप करू लागली. तिच्या त्या तपाने ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी लक्ष्मीला शापमुक्त केले. विष्णूपत्नी लक्ष्मी त्या दिवसापासून महालक्ष्मी म्हणून ओळखली जाऊ लागली. "
 तेंव्हा हादग्याला पाटावर काढलेला हत्ती हे लक्ष्मीचेच प्रतिक असते. त्याच्या रुपाने लक्ष्मीची पूजा केली जाते. अश्विन महिन्यातील नक्षत्र हस्त. हे नक्षत्र शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. मुबलक धान्य तयार करण्यास मदत करण्याबद्दल हस्ताला कृतज्ञता व्यक्त करणे, त्याचा गौरव करून निरोप देणे या गोष्टीही हादगा सण साजरा करण्यामागे  आपल्या कृषीप्रधान संस्कृतीत अभिप्रेत असतात.