बाळशास्त्री जांभेकर 

'दर्पण' या मराठीतील पहिल्या वृत्तपत्राचे व 'दिग्दर्शन' या पहिल्या मराठी मासिकाचे संपादक म्ह्णून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म सन १८१२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे झाला. कुशाग्र बुध्दिमत्ता, दीर्घोद्योग , चिकाटी आणि धडाडी या गुणांमुळे अनेक क्षेत्रात ते यशस्वी झाले. मराठी भाषेत अनेक साहित्यप्रकार त्यांनी रूढ केले. ' नितीकथा' ,'भूगोलविद्या', 'सारसंग्रह' , 'बाळ व्याकरण' 'हिंदुस्थानचा इतिहास' हे त्यांचे काही उल्लेखनीय ग्रंथ होत. मराठीतील प्रारंभीचे निबंधकार म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठीबरोबरच संस्कृत, बंगाली, गुजराथी, कानडी, तेलगू,फारशी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक या भाषांचेही ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील विशेष प्राविण्याबद्दल फ्रान्सच्या बादशहाकडून त्यांचा सन्मान झाला होता. ते गणित व ज्योतिष यात पारंगत होते. कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी त्यंची नियुक्ती झाली होती. जांभेकरांना रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, पाशवीविद्या, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास इत्यादि विषयांचे उत्तम ज्ञान होते. सन १८३२ मध्ये शाळा खात्याकडून " नेटिव्ह सेक्रेटरी" म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. सन १८३४ मध्ये एलफिस्टन कॉलेजात गणित, विज्ञान या विषयाचे पहिले भारतीय लेक्चरर बनण्याचा मान त्यांना मिळाला होता. लोकशिक्षणासाठी "नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटी" नावाची संस्थाही जांभेकरांनी काढली होती. सन १८४५ मध्ये " बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी " नावाची लायब्ररी बाळशास्त्रींनी काढली होती. १७ मे सन १८४६ मध्ये वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी आद्य समाजसुधारक वृत्तपत्रकार, निबंधकार, भाषांतरकार, इतिहाससंशोधक,  व्याकरणकार , गणितज्ञ  शिक्षणशास्त्रज्ञ, आणि प्रकाशक म्हणून नावाजलेल्या बाळशास्त्री जांभेकरांची जीवनज्योत मालवली.