नवरात्रीतील प्रतिके 

अश्विन शुद्ध प्रतिप्रदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा केला जातो. नंदादीप, घट,पुष्पमाळा, आणि बीजरोपण या चार मह्त्वाच्या गोष्टींना या नवरात्रात महत्त्व असते.
१.) नंदादीपः - देवीच्या नवरात्रात नऊ दिवस अखंड दीप लावला जातो. हा दीप विझू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येते.
काही ठिकाणी हा दिवा घटामध्ये किंवा मडक्या मध्ये ठेवण्यात येतो. अखंड दीप हे अखंड ज्ञानसाधनेचे प्रतीक आहे. अज्ञानरुपी अंधकार दूर होऊन ज्ञानरुपी प्रकाशाने उजळून निघावे ही त्यामागील भावना आहे.
२.)घटः- नवरात्रात ठेवलेला घट हे नाशवंत मानवी देहाचे प्रतीक आहे.कुंभार जसा आकार देईल तसा तो घट तयार
होतो.आपणही शरिराला जशा सवयी लावू तस वळण त्या शरिराला लागत. ज्याप्रमाणे मातीच्या घटाच महत्त्व फक्त पाणी, दूध वैगरे धारण करण्यापुरतच असत; त्याचप्रमाणे मनुष्य जीवनात मनुष्याचा स्वभाव, चालिरिती यांनाच खर महत्त्व असत.सरतेशेवटी घटाप्रमाणेच मानवी शरिराच अस्तित्व अत्यल्प असत. असा ह नाशवंत मानवी देहाचे प्रतीक असलेला घट.
३.) पुष्पमाळा:- नवरात्राच्या सुमारास सगळीकडे फुलांची रेलचेल असते. झेंडूच्या किंवा शेंवतीच्या फुलांच्या माळा नवरात्रात लावल्या जातात. सत्कार्यांच्या
मालिकेनं सुगंधित झालेलं मानवी जीवन या माळाच्या रुपाने व्यक्त होत.
४.) बीजरोपणः- देवीच्या नवरात्रात एका पत्रावळी वर मातीची वेदी करतात आणि त्यात धान्य पेरतात. उगवलेले हे हिरवेगार धान्य नवनिर्मितीचे प्रतिक आहे. मानवी देहाचे मातीत विलिनीकरण होणे आणि नंतर मातीतून होणारे पुर्निर्माण हा जीवनाचा नियम आहे.मातीतून होणारी निर्मिती ही नेहमी स्फूर्तीदायी आणि चैतन्यप्रदच असते.