नवरत्ने 


१.] हिरा :- रत्नांचा राजा म्हणून हिरा ओऴखला जातो. "सिम्बॉल ऑफ लव्ह" म्हणूनही त्याला मानाचे स्थान आहे. हिरा एक खानदानी रत्न आहे. शुद्ध रासायनिक तत्त्व त्यात आहेत. तो आहे त्याच शुद्ध, चमकदार स्थितीत रहातो. तो झिजत नाही. त्याची रचना घनस्वरुपी आहे. हिरा हा शुक्र ग्रहाचा खडा म्हणून प्रसिद्ध आहे. पांढरा,शुभ्र पांढरा, निळ्सर पांढरा अशा तीन रंगात तो आढळ्तो.आफ्रिका, रशिया, केनिया या देशात हिर्‍याच्या खाणी जास्त असल्यातरी हिर्‍याचे कटींग व पॉलिशिंग करण्याची केंद्रे मात्र भारतातच आहेत.

२.) माणिकः- गुलाबी, फिक्कट गुलाबी, रक्तवर्णी अशा रगांमध्ये माणिक हे रत्न आढळते. पारदर्शक असे असलेले हे रत्न षड्.भुजीय रचनेत आढळ्ते. हे रत्न कुरंडम समुहातील आहे. भारत, पाकिस्तान, नेपाळ, थायलंड, म्यानमार, श्रीलंका इत्यादि देशात माणिक आढळ्ते. सूर्याचा खडा म्हणून ते वापरले जाते.

३.) मोती:- दागदागिन्यात खुलून दिसणारे रत्न म्हणजे मोती. तो अनेक रंगात सापडतो. साधारणतः पिवळा, फिक्कट पिवळा, तांबूस, नीळसर गुलाबी, काळा अशा रगांचे मोती आढळतात. अपारदर्शक असणारा मोती ऑरर्गॅनिक समुहातील आहे. त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट हे रासानिक तत्त्व आढळते. मोती वापरुन वापरुन त्याची झीज होते. चीन,जपान, मलेशिया, श्रीलंका येथे मोती अधिक प्रमाणात आढळतात. चंद्राचे आधिक्य असणारे हे रत्न आहे.

४.]  पाचू :- हिरव्या रंगाच्या अनेक छटांमध्ये आढळणारे हे रत्न पारदर्शक असते. हे रत्न बेरील समुहातील असून त्याची रचना षड्भूजीय समस्वरूपाची असते. पाचू हे बुध ग्रहाचे रत्न समजले जाते.अफगाणिस्तानची सीमा, पाकिस्तान, कोलंबिया, टांझानिया, ब्राझील, झाम्बिया येथे पाचू आढळतात.

५.] पुषकराज :- पारदर्शक असलेले हे पुष्करज रत्न गुरू ग्रहाचे समजले जाते. पांढराशुभ्र, निळसर पांढरा, पिवळा, फिकट पिवळा,सोनेरी नारिंगी, गुलाबी, फिकट जांभळा,अश विविध रंगात पुष्कराज मिळते. ते विद्युतशक्तीयुक्त समुहातील असून त्यात फ्लुओ सिलिकेट, अ‍ॅल्युमिनियम, व थोड्या प्रमाणात फ्लोरिन तत्त्व असते. या पुष्कराज रत्नाच्या खाणी श्रीलंकेत आहेत.

६.] पोवळ :- दागदागिन्यांमध्ये वापरले जाणारे हे पोवळे रत्न नारिंगी, लाल, शेंदरी, गर्द लाल, अशा रंगात मिळते. अपारदर्शक असलेले हे रत्न वापरून वापरून झिजते. ते ऑरगॅनिक समुहातील असून त्यात कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट ही रासायनिक तत्त्व असतात. मंगळ ग्रहाचा खडा म्हणून पोवळे वापरले जाते. भारत, श्रीलंका, जपान, इटली, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पोवळे मिळते.

७.] नीलम :- नावाप्रमाणेच निळा, फिकट निळा, अस्मानी या रंगात मिळणारे नीलम हे रत्न शनी ग्रहाचे मानले जाते. ते कुरंडम व विद्युतशक्तीयुक्त समुहातील आहे. त्याची रचना षड्भूजीय असते. निलम रत्नात अ‍ॅल्युमिनियम, ऑक्सिजन, कोबाल्ट ही रासायनिक तत्त्व असतात. श्रीलंका, बँकॉक, काश्मीर येथे नीलम रत्न आढळते.

८.] गोमेद :- नारिंगी रंगाचे गोमेद रत्न गार्नेट समुहातील आहे. त्याची रचना घन स्वरूपाची असते. गोमेदामध्ये अ‍ॅल्युमिनियम, कॅल्शियम, सिलिका, ऑक्सिजन ही रासायनिक तत्त्व असतात. श्रीलंका, भारत, ब्राझील या ठिकाणी आढळणारे गोमेद हे रत्न राहू ग्रहाचे म्हणून ओळखले जाते.

९.] लसण्या :- पांढरा, पिवळसर पांढरा, हिरवा या रंगात आढळणारे लसण्या हे रत्न केतू ग्रहाचे म्हणून ओळखले जाते. याची रचना विषम लंबाक्ष स्वरूपाची असते. या रत्नात बेरिलियम, अ‍ॅल्युमिनियम, फेरस ऑक्साइड, ही रासायनिक तत्त्व असतात. लसण्या हे रत्न क्रेसोबेरिल समुहातील रत्न आहे. भारत, श्रीलंका या देशात ते आढळते.