दुर्गाबाई भागवत 

१० फेब्रुवारी १९१० रोजी दुर्गाबाई नावाच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा उदारमतवादी अशा भागवत घराण्यात जन्म झाला. आपल्या निर्भय स्वतंत्र, प्रामाणिक वृत्तीमुळे तसेच चिंतनशील शैलीदार ललित लेखनाने त्यांनी मराठी समाजावर चांगलाच प्रभाव टाकला. आयुष्याचा प्रत्येक क्षण त्या उत्कटतेने जगल्या. त्यांनी ज्या ज्या विषयाला हात घातला त्या त्या विषयात आपल स्वतःच वेगळ अस अस्तित्व उमटवल. जात्याच अत्यंत चौकस, हूड, असणार्‍या दुर्गाबाईंना जे जे आपल्याला येत नाही ते ते शिकून घेण्याचा ध्यासच लागला होता. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्य, बौद्धसाहित्य अशा अनेक विषयांचा त्यांनी नुसता अभ्यासच केला अस नाही तर त्यामध्ये त्यांनी संशोधनही केल. एखाद्या विषयात फार खोलात जाऊन अभ्यास करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे नवनविन अनुभव त्या घेत गेल्या. इतरांना हेवा वाटावा अस एक अनुभव संपन्न जीवन त्या जगल्या. नव-जुन, प्राचीन- अर्वाचिन, स्त्री-पुरूष असे भेदाभेद त्यांनी मानले नाहीत. येईल तो अनुभव त्या आपल्या स्वतंत्र शैलीने टिपत गेल्या. आयुष्यभर चिंतन, वाचन, मनन, लेखन करून आपले विचार नेटक्या शब्दात त्यांनी वाचकांपर्यंत पोहचवले. परखड विचार,छोटी छोटी वाक्ये, नादमय शब्द, आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. संस्कृत, पाली, प्राकृत, इंग्रजी, मराठी, फ्रेंच, हिंदी इत्यादी भाषांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. दुर्गाबाईंच्या लेखनातील आपल्या सांस्कृतिक,पौराणिक, सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ वाचकांना थक्क करून जातात. अभ्यास आणि लिखाण हे त्यांचे प्राण होते. म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयींचा अपूर्व संगम आढळतो. त्यांच्या लिखाणात स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांबरोबरच कवी मनाची कोमलता आढळते. आणि "आपणाला जे जे ठावे ते इतरांना सांगावे" हा समर्थांचा विचार प्रत्यक्षात आणण्याची तळमळ दुर्गाबाईंमध्ये दिसून येते.
"पैस", "ॠतुचक्र", "डूब", "व्यासपर्व" अशा जबरदस्त ललित लेखांच्या पुस्तकांनी  वाचकांना  तोंडात बोटे घालायला लावणार्‍या दुर्गाबाई अनुवादाच्या क्षेत्रातही मागे नव्हत्या. बाणभट्टाची "कादंबरी","जातककथा", यांचा अनुवाद करणार्‍या दुर्गाबाईंनी थोरो या अमेरिकन विचारवंताच्या पुस्तकाचा " वॉल्डनकाठी विचारविहार "नावाचा अनुवाद ही केला. रवींद्रनाथ टागोरांच्या "गीतांजली"चा संस्कृतात अनुवाद करण्याच कौस्तुकास्पद कार्य दुर्गाबाईंनी केल. संशोधन व साहित्य या क्षेत्रात रमणार्‍या दुर्गाबाईंना पाककलेतही तितकाच रस होता.दुर्गाबाईंनी स्वतःचा संसार कधी थाटला नाही. पण गृहिणीची सगळी कर्तव्ये त्यांनी पार पाडली. कोणाला बाळंतविडा करून दे, कोणाला स्वादिष्ट पदार्थ करून दे  अशी कामेही त्या मोठ्या आवडीने करीत. स्वयंपाक या विषयाबाबतही दुर्गा भागवतांचे खास त्यांची अशी मते होती. आपल्या "दुपानी" सारख्या पुस्तकांतून आपले पाककलेबाबतचे विचार दुर्गाबाईंनी व्यक्त केले आहेत
दुर्गाबाई स्वतःच्या विचाराबाबत नेहमी ठाम असत. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेत हा ठामपणा दिसून येतो.आणीबाणीच्या राजकारणाला नवी दिशा देणार्‍या त्या तेजस्विनी ठरल्या. हाच ठामपणा दुर्गाबाईंनी शासकीय पुरस्कार न स्वीकारण्याच्या भूमिकेबाबत दाखवला.