फुलपाखरू 

"फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू | या वेलींवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू |" अशा कवितेच्या ओळी गुणगुणत लहानपणी आम्ही दोस्त मंडळी फुलपाखरांचे निरिक्षण करण्यात आणि त्यांना पकडण्यासाठी त्यांच्यामागे धावण्यात दिवसाचा किती वेळ घालवत असू याला सुमारच नाही.भल्या सकाळी आणि संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात या फुलांवरून त्या फुलावर उडणार्‍या त्या फुलपाखरांचे रंग, त्यांचे आकार, त्यावरील नक्षीकाम पाहून परमेश्वराच्या अगाध लीलेचे कौतुक वाटे. मृत फुलपाखरे जमा करून वहीत साठवण्याचा छंद लागला तो त्यांच्यातील या विविधतेमुळेच. परंतु आज जगात सुमारे पंचवीस हजार फुलपाखरांच्या जातींची नोंद होऊनही आजकाल ही फुलपाखरे फारशी दृष्टीला पडतच नाहीत. याच महत्त्वाची दोन कारणे म्हणजे वृक्षतोड आणि वनस्पतींवर मारण्यात येणारी कीटकनाशक.
फुलपाखरांचे मोहक रंग, त्यांचे वैविध्यपूर्ण आकार, आणि त्यांची या फुलावरून त्या फुलावर उडण्याची चंचल वृत्ती यामुळे ही फुलपाखरे कवी, चित्रकार आदि कलाकार मंडळींच्या कलाकृतीचा विषय बनली आहेत. रांगोळी असो, कशिदाकाम असो, पुस्तकावरील नक्षीकाम असो नाहीतर घर सजावट असो, किंवा उत्सव- समारंभाची मंडप सजावट असो फुलपाखराची नक्षी कोठेही शोभून दिसते. तशी फुलपाखरांची चित्रे अगदी ख्रिस्तपूर्व १५००व्या शतकापासून भिंतीवर काढलेली आढळून येतात. इसवीसनानंतरच्या शतकातील हस्तलिखित पुस्तकातही नक्षीसाठी फुलपाखरांचा वापर झालेला आढळतो. पण अठराव्या शतकानंतर मात्र फुलपाखरां विषयीच्या शास्त्रीय अभ्यासाला प्रथम युरोपात सुरुवात झाली. या अभ्यासातून फुलपाखरांचे त्यांच्या शरीर वैशिष्ट्यानुसार वर्गिकरण, व नामकरण केले गेले. फुलपाखरांची जीवनशैली, त्यांचे स्थलांतरण, त्यांचे उपयोग, यांचा अभ्यास केला गेला. वनस्पतींच्या परागीभवनात फुलपाखरे मदत करतात, कर्करोग संशोधनात फुलपाखरांच्या अळ्यांचा उपयोग होतो, काही फुलपाखरांच्या अळ्यांवर विशिष्ट विषाणूंची पैदास करता येते, काही फुलपाखरांच्या अळ्यांना मुंग्यांचा स्पर्श झाला की त्या अळ्यातून दुधासारखा द्रव पाझरतो व तो मुंग्याच्या बाळांसाठी पौष्टीक असतो ,असे अनेकानेक निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आले आहेत. काही फुलपखरांच्या अळ्यांच्या कोषातून तर रेशमाची पैदास होते. अनेक किटक, पक्षी ही फुलपाखरे व त्यांच्या अळ्या यांचा अन्न म्हणून आस्वाद घेतात. पर्यावरण संतुलनाच्या कामातही फुलपाखरांचा मोलाचा वाटा आहे.
" निसर्गाचे संवेदनक्षम दर्शक " असा बहुमान मिळालेल्या या फुलपाखरांचे पहिल उद्यान ब्रिटनमध्ये सन १९६७ साली सुरू करण्यात आले. त्यानंतर फुलपाखरांची अनेक उद्याने तयार करण्यात आली. सन १९८६ पासून या उद्यानांना प्राणीसंग्रहालयाचा दर्जा देण्यात आला.