भारतातील प्राचीनतम गणेश मंदिरे 

१.] मोरेश्वर :-  पुण्यापासून पासष्ट कि.मी.वर व जेजुरी स्थानकापासून सोळा कि.मी.वर मोरगांव येथे मयुरेश गणेशाची मूर्ती आहे. अष्टविनायकांपैकी हे एक प्रमुख क्षेत्र असून भगवान शंकराने या मूर्तीची स्थापना केली असे म्हणतात.
२.] रांजणगाव :- अष्टविनायकांपैकी एक असलेले हे क्षेत्र पुण्यापासून सुमारे छपन्न कि.मी.वर आहे. याचे प्राचीन नाव "मणिपूर" असे होते. त्रिपुरासुराबरोबरच्या युद्धात जय मिळावा म्हणून शंकराने या गणेशमूर्तीची स्थापना केली असे म्हटले जाते.
३.] अदोष :- नागपूर छिंदवाडा रेल्वे मार्गावर सामनेर स्थानकापासून आठ कि.मी.वर असलेले 'आधासा ' नावाचे सध्याचे ठिकाण म्हणजेच पूर्वीचे अदोष ठिकाण होय. "शमी विघ्नेश" या नावाने हे ठिकाण ओळखले जाते. पुरातन काळी देव आणि ॠषींनी तपश्चर्या करून या गणेशाची स्थापना केली असे म्हटले जाते.
४.] राक्षस भुवन :- जालना स्थानकापासून बावन्न कि.मी.वर गोदावरी नदीच्या काठावर हे ठिकाण आहे. श्री दत्तात्रेयाने स्थापन केलेल्या या गणेश क्षेत्राला "विज्ञानक्षेत्र" असे म्हटले जाते.
५.] नामलगाव :- जालना- बीड मार्गावर घोसापूरीपासून थोड्या अंतरावर हे क्षेत्र आहे. त्याचे प्राचीन नाव अमलाश्रम असे होते. भृशुंडी ॠषींनी या गणपतीची स्थापना केली असे मानले जाते. "आशापूरक गणेश" या नावाने येथील गणपती ओळखला जातो.
६.] सिद्धटेक :- नगर जिल्ह्यात असलेले हे ठिकाण अष्टविनायकांपैकी एक आहे. मधुकैटभ नावाच्या राक्षसाचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूनी सिद्धटेक येथे गणेशाची स्थापना करून मंत्रजपाने त्याला प्रसन्न करून घेतले म्हणून या गणेशाला "सिद्धिविनायक" असे म्हटले जाते.
७.] थेऊर :-  पुण्यापासून चौवीस कि.मी. वर हे स्थान आहे. हे अष्टविनायकापैकी एक क्षेत्र असून ते "चिंतामणी" या नावाने ओळखले जाते. सृष्टीनिर्मितीच्या कामातील विघ्ने दूर व्हावीत म्हणून ब्रम्हदेवाने या गणेशाची स्थापना केली असे म्हटले जाते.
८.] कदंब :- विदर्भातील यवतमाळजवळ असलेले कळंब नावाचे गाव म्हणजे पूर्वीचे कदंबपूर गाव असे म्हटले जाते. महर्षी गौतमॠषींनी दिलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी इंद्राने या गणेशाची स्थापना केली असे म्हटले जाते.
९.] वेरूळ :- औरंगाबादमधील वेरूळ येथे हे गणेश मंदीर आहे. "लक्षविनायक" या नावाने ते ओळखले जाते. तारकासुराबरोबरच्या युद्धात जय मिळावा म्हणून कार्तिकेयाने शंकराच्या आदेशाने त्याची स्थापना केली असे म्हटले जाते.
१०.] लेण्याद्री :- पुण्यापासून जवळजवळ पंच्याऐंशी कि.मी. वर हे गणेश स्थान आहे."गिरिजात्म़ज" म्हणून ओळखले जाणारे हे स्थान अष्टविनायकांपैकी एक गणेश क्षेत्र आहे. या मूर्तीची स्थापना पार्वतीने केली असून गणेशाने पुत्ररूपाने आपल्या पोटी जन्म घ्यावा म्हणून तिने या ठिकाणी तपश्चर्याही केली होती असे म्हटले जाते.
११.] कुंभकोणम :- कावेरी नदिकाठी असलेले दक्षिण भारतातील हे क्षेत्र "श्वेत विघ्नेश्वर" म्हणून ओळखले जाते. अमृतमंथनाच्या वेळी कठोर परिश्रम करूनही अमृत मिळेना म्हणून  इंद्र, शंकरादि देवांनी या सुधा- गणेशाची स्थापना केली असे म्हटले जाते.