बा . सी. मर्ढेकर 

महाराष्ट्रातील एक थोर कवी, कादंबरीकार, टीकाकार म्हणून बा. सी. मर्ढेकर ओळखले जातात. त्यांचे खरे आडनाव 'गोसावी असे होते. सातारा जिल्ह्यातील 'मर्ढे' हे त्यांचे मूळ गाव होते. त्यावरून त्यांच्या पूर्वजांनी 'मर्ढेकर' हे आडनाव धारण केले. त्यांचा जन्म खानदेशातील फैजपूर येथे १ डिसेंबर १९०९ रोजी झाला. त्यांचे पाळण्यातील नांव रमेश असे होते. पण घरी त्यांना बाळ या नावाने संबोधित असत. शाळेत असताना ते 'रमेश बाळ' या नावाने शाळेच्या हस्तलिखितात लेखन करीत असत. मर्ढेकरांचे तिसरीपर्यंतचे शिक्षण फैजपूर येथेच झाले. त्यानंतरचे शिक्षण धुळे येथे झाले. पुणे येथून त्यांनी बी. ए. ची पदवी घेतली. आणि आय. सी. एस. ची पदवी घेण्यास ते इंग्लंडला गेले. परंतु त्याबाबत त्यांच्या पदरी निराशाच आली. इंग्लंडमधील सामाजिक, राजकीय विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला. इंग्रजी साहित्य, मानसशास्त्र, दैनंदिन विज्ञान या विषयांच्या अभ्यासामुळे त्यांच्या विचारसरणीत आमुलाग्र बदल झाला.

इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया' या दैनिकात उपसंपादक म्हणून काम केले. आणि काही काळ सरकारी कॉलेजात अध्यापनाचे काम केले. सन १९३८ मध्ये मुंबई नभोवाणीवर 'कार्यक्रम संयोजक' म्ह्णून त्यांची निवड झाली. याच काळात त्यांचा 'शिशिरागमन' नावाचा कव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर ''काही कविता" हा कव्य संग्रह प्रसिद्ध झाला. काही लोकांनी त्यावर अश्लिलतेचा शिक्का मारला असला तरी 'नव कवितेचा प्रारंभ' म्हणून त्याकडे बोट दाखवले जाऊ लागले. पुढे सन १९४८ पर्यंत "वाड्मयीन महात्मता", "रात्रीचा दिवस", "तांबडी माती", "पाणी", या कदंबर्‍या प्रसिद्ध झाल्या. २० मार्च १९५६ मध्ये दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.