असे सुरू झाले अणुशक्तीचे युग 

सन १७८९ मध्ये जर्मन रसायनशास्त्रज्ञ मर्टिन क्लॅपरॉथ यांनी युरेनियम या मूलद्रव्याचा प्रथम शोध लावला. त्यानंतर पन्नास वर्षांनी म्हणजे सन १८४१ मध्ये  फ्रेंच रसायन शास्त्रज्ञ युजेन पेलिगॉट यांनी प्रथमच धातुरूप युरेनियम मिळविण्यात यश मिळवले. वजनदार आणि तुलनात्मक दृष्ट्या मृदू वाटणारे हे मूलद्रव्य आपल्या अत्याधिक अणुभारामुळे लक्षवेधी ठरले. वस्तुमानाचा सर्वात मोठा संचय युरेनियममध्ये आहे. सन १८९६ मध्ये फ्रेंच रसायन सास्त्रज्ञ हेन्री बेक्वेरल यांनी आपल्या एका प्रयोगाद्वारे असा निष्कर्ष काढला की युरेनियम हे पहिले धातुवर्गीय मूलद्रव्य आहे की जे अद्रृश्य प्रस्फूरणासारखा गुणधर्म दाखवते. बेक्वेरलच्या म्हणण्यनुसार शुद्ध युरेनियमचा किरणोत्सार गुणधर्म त्याच्या इतर कोणत्याही संयुगापेक्षा अधिक प्रभावी असतो. त्यानंतर काही वर्षांनी रोम विद्यापीठात एन्रिको फर्मी आणि त्यांच्या हाताखालील तरूण भौतिक शास्त्रज्ञांनी युरेनियमवर न्युट्रॉन-प्रारणांचे आघात केले असता प्रारित युरेनियममध्ये आणखी अधिक मूलद्रव्ये असल्याचे शोधले. पुढे इरिन जोलिऑ-क्यूरी हिने फर्मीचे प्रयोग पुन्हा पुन्हा करून पाहिले असता तिला युरेनियमपासून लँथानम हे मूलद्रव्य मिळाले. त्यानंतर जर्मन भौतिक शास्त्रज्ञ ओटो हान आणि फेडरिक स्ट्रासमन यांनी इरिन जोलिओ-क्युरीचे प्रयोगच पुन्हा करुन पहिले. तेंव्हा त्यांना युरियममध्ये लँथानम बरोबरच बेरियम हे आणखी एक मूलद्रव्य सुद्धा आढळले. युरेनियमच्या अणुवर न्यूट्रॉन आदळतो तेंव्हा अस्तित्वात येणार्‍या लँथानम आणि बेरियम या दोन्ही मूलद्रव्यांचा अणुभार युरेनियमच्या अणुभाराच्या जवळजवळ निम्म्याने असतो असे आढळून आले. इरिन जोलिओ-क्युरिने असेही सिद्ध केले की युरेनियम अणुचे विभाजन हे स्फोटासारखे होत असून ते होताना सर्व दिशांना मोठ्या वेगाने तुकडे तुकडे उडतात. आणि विभाजन पावणार्‍या अणूंची संख्या जर जास्त असेल तर प्रचंड उर्जा मुक्त होते. सन १९३९-४० मध्ये सोविएत भौतिकशास्त्रज्ञ के. ए. पीटरझॅक आणि जी. एन. फ्लेरोव यांनी युरेनियमचा अभ्यास करून  "युरेनियमचे अणुगर्भ अचानक विघटन पावू शकतात." असे सिद्ध केले.सन १९४२ मध्ये एन्रिको फर्मी यांनी अमेरिकेच्या मदतीने युरेनियमपासून ऊर्जानिर्मितीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. युरेनियम अणुगर्भाच्या विभाजनाची नियंत्रित साखळी प्रक्रिया पूर्ण करून अणुगर्भातील उर्जा मुक्त केली. आणि त्यामुळे आपल्या इच्छेनुसार पाहिजे तेंव्हा ही उर्जा माणूस वापरू शकतो. हे दाखवून दिले. आणि जगातील पहिल्या अणुभट्टीचा जन्म झाला.त्यानंतर सन १९४५ मध्ये अणुबॉम्बचे काम पूर्ण झाले. ६ ऑगस्ट १९४५ या दिवशी जपानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.
 अणुबॉम्बने केलेला तो विध्वंस पाहून सारे जग हादरले. आणि अणुतील प्रचंड ऊर्जेचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी कसा करता येईल याचा विचार सुरू झाला. याचीच परिणती म्हणून २७ जून सन १९५४ मध्ये सोविएत शास्त्रज्ञ व इंजिनियरच्या मदतीने जगातील पहिले व ५००० किलोवॅट उत्पादन क्षमतेचे अणुऊर्जाकेंद्र प्रस्थापित करण्यात आले. युरेनियमच्या अणूंपासून निर्माण झालेली वीज विद्युततारांनी वाहून नेण्यात यश मिळाले. आणि "अणुशक्तीचे युग" सुरू झाले.