डॉ.कनक रेळे 

आज नृत्यकलेने जनमानसात मानाचे स्थान मिळविले आहे. कोणी आवड म्हणून तर कोणी विरंगुळा म्हणून  नृत्य करत, कोणी वजन कमी करण्यासाठी नृत्यकलेचा आसरा घेत. कोणी पैसा कमावण्याचे एक साधन म्हणून त्या कलेला आपलस करत. पण डॉ. कनक रेळे यांच्या विषयीची माहिती वाचनात आली; आणि नृत्य एक साधना, एक तपस्याही असते ही जाणीव मनाला झाली. नृत्य हा एकच ध्यास घेऊन आपले जीवन त्यासाठी समर्पित करणार्‍या कनक रेळे मला नृत्य क्षेत्रातील एक चमत्कारच वाटल्या.  
              संपूर्ण भारतात क्लासिकल डान्सच "नालंदा" हे एकमेव महाविद्यालय आहे. डॉ. कनक रेळे या महाविद्यालयाच्या संस्थापक आहेत. पारंपारिक पद्धतीने नृत्यकलेच शिक्षण या महाविद्यालयात दिल जात. नृत्याच तंत्र आणि सौंदर्य यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास येथे केला जातो. नृत्याची उत्पत्ती, उन्नत्ती, इतिहास, परंपरा संस्कृती सामाजिक तसेच धार्मिक बांधिलकी, या सार्‍यांच संशोधन व विश्लेषण येथे केल जात. कनक रेळे यांनी स्वतः बी.ए. एल. एल.बी. ची पदवी मिळवल्यानंतर मँचेस्टरहून एल. एल.एम, ही पदवी घेतली. आणि त्यानंतर नृत्य विषयातही पी. एच. डी. केले आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या "करिक्युलम डेव्हलपमेंट कमिटी"वर नृत्यतज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांचि निवड झाली आहे. त्यामुळे यु.जी.सी.चा नृत्यविषयक अभ्यासक्रम त्यानीच निर्माण केला आहे. याशिवाय यु.जी.सी.च्या "नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट एक्झामिनेशन ऑफ डान्स"च्या अभ्यासक्रमाची निर्मितीही त्यानीच केली आहे. मुंबई विद्यापीठात "फाईन आर्टस"ची फॅकल्टी निर्माण करण्यात डॉ.कनक रेळे यांनीच पुढाकार घेतला. आणि त्यांच्याच प्रेरणेने मुंबई विद्यापीठात बॅचलर ऑफ फाइन आर्टस, मास्टर ऑफ फाइन आर्टस आणि पी.एच.डी. या नृत्यकलेतील पदव्यांना समाविष्ट करण्यात आले. मॉरिशसच्या "महात्मा गांधी इन्स्टिट्युट"ने भारतीय शास्त्रीय नृत्यासंदर्भातील पदविका तसेच पदवी अभ्यासक्रमाची आखणी करण्यासाठी डॉ.कनक रेळे यांच मार्गदर्शन घेतल आहे. याशिवाय सेंट्रल संगीत नाटक अ‍ॅकॅडमीच्या दिल्लीतील कथ्थक केंद्रातील आणि मणिपूरच्या इंफाळ येथील "जवाहर नेहरु डान्स अ‍ॅकॅडमी"साठी अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी ही डॉ. कनक रेळे यांचे सहकार्य घेण्यात आल आहे. भारत सरकारच्या प्लॅनिंग कमिशनवर नृत्य सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ फाइन आर्टसच्या माजी डीन, मुंबई विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलच्या माजी सभासद, मुंबईच्या प्रिंन्स ऑफ वेल्स म्युझियमच्या विश्वस्त अशी अनेक सन्माननिय पदे त्यांनी आपल्या आयुष्यात भूषविली आहेत.
 डॉ.कनक रेळे या "मोहिनी अट्टम" या नृत्यशैलीच्या प्रवर्तक व प्रचारक आहेत. त्यांची स्वतःची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण नृत्यशैली आहे. चाळीस-पन्नास वर्षापूर्वी केवळ चार पाच प्रकारच अस्तित्वात असलेल्या या मोहिनीअट्टम या नृत्यशैलीचे त्यांनी आजपर्यंत एकूण साठ प्रकार शोधून काढले आहेत. त्यासाठी त्यांना "फोर्ड फाउंडेशन"चे अनुदान मिळाले होते. त्यामुळे मोहिनीअट्टम ही नृत्यकला सादर करणार्‍या अनेक कलावंतांची भेट घेऊन त्यांच्या कार्याच संशोधन आणि विश्लेषण त्यांनी केल. या कामी केरळमधील कवी आणि संगितज्ज्ञ श्री. कवलम नारायण पनिक्कर यांचे सहकार्य त्यांना मिळाले.
डॉ. कनक रेळे यांनी अनेक नृत्य नाटिकाही साकार केल्या आहेत. त्यातून भारतीय परंपरेच उत्कृष्ट दर्शन घडविल आहे.
"कलारत्न", "नाट्यकला भूषण", सूरसिंगारसंसदचा "नर्तन विलास", "सारंगदेव फेलोशिप".
"इंटरनॅशनल डान्स अलायन्स अवॉर्ड", गुजरात स्टेटचा "गौरव पुरस्कार" असे अनेक सन्मान प्राप्त करणार्‍या डॉ. कनक रेळे यांना २४ मार्च १९९० मध्ये भारत सरकारने 'पद्मश्री" पुरस्काराने गौरविले.