सिरॅमिक पॉटरी 

सिरॅमिक पॉटरी म्हणजे "कुंभकला".फार प्राचीन काळापासून ही कला आपल्याकडे अस्तित्वात आहे. मोहनजोदडो, हडप्पा, इत्यादि उत्खननात मातीपासून बनविलेली, भट्टीत भाजलेली भांडी मिळालेली आहेत. लोच म्हणजे प्लस्टिसिटी असलेली माती, क्वार्टझ, पोटॅश, फेल्डस्पार, सिलिका, पायरोफिलाइट, बोन अ‍ॅश, टाल्क पावडर इत्यादि कच्च्या मालापासून ही भांडी बनविली जातात. भांडी बनविण्यासाठी लागणार्‍या मातीचे चिनी माती, बॉल क्ले, फायर क्ले असे प्रकार आहेत. अग्निजन्य खडकापासून चिनी माती मिळते.ही माती कच्च्या अवस्थेत असताना त्यात अनेक अशुद्धी, वनस्पती असल्याने ती वेगवेगळ्या रंगछटात मिळते. पण भाजल्यानंतर ती पांढरीशुभ्र होते. बॉल क्ले मध्ये अशुद्धता अधिक असते. त्यामुळे भाजल्यावर ती दुधाळ रंगाची बनते. फायर क्ले कोळशाच्या खाणीखाली मिळते. असा हा कच्चा माल बारीक दळून चाळून वापरला जातो.मग तो बॉल मिलमध्ये दळला जातो. नंतर त्या दळलेल्या बारीक मातीत पाणी मिसळून सरसरीत मिश्रण तयार केले जाते. व ब्लंजरमध्ये पाठविले जाते. त्यानंतर त्या द्रवरूप मिश्रणाला चाळणीतून पाठविले जाते. शिवाय त्यावरून लोहचुंबकही फिरवला जातो. मग ते एजिटेटर टँकमध्ये पाठविले जाते. त्यातील अतिरिक्त पाणी शोषून घेतले जाते. आणि शिल्लक राहिलेली अशुद्धता काढून घेण्यासाठी फिल्टर प्रेसचा वापर केला जातो. त्याठिकाणी त्याचे केकमध्ये रुपांतर होते. त्या केकला एकसंध बनविण्यासाठी पग मिल आणि जिगर-जॉली मध्ये पाठविले जाते. शेवटी प्लॅस्टिक मोल्डमध्ये टाकून हवा तो आकार दिला जातो. नंतर तयार झालेली वस्तू सुकविण्यासाठी काही प्रक्रिया केली जाते. सुकल्यानंतर एक प्रकारच्या काचेच्या पातळ आवरणाने त्याला ग्लेझ  दिले जाते. मग आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या तापमानाला ती भांडी भट्टीत भाजली जातात. सामान्यतः  टेराकोटा १२०० डिग्री तापमानावर, स्टोनवेअर १२०० ते १३०० डिग्रि तापमानावर तर  पोर्सिलेन टेबलवेअर १२०० ते १४०० डिग्री तापमानावर भाजले जाते.                                                 सिरॅमिक वेगवेगळ्या प्रकारचे असते.                                                  १.] टेराकोटा :- या प्रकारची भांडी किंवा वस्तू सामान्य मातीपासून बनविलेली असतात. ही भांडी भाजल्यानंतर लाल होतात. ती कमी तापमानावर भाजली जातात आणि त्यांना चकचकीतपणाही  नसतो. त्यांची संरंध्रता आठ टक्क्याहून कमी असते. इमारतीच्या बांधकामासाठी लागणार्‍या विटा, कौले, थंडपाण्याचे माठ, सुरया, मडकी कलाकुसरीच्या वस्तू टेराकोटापासून बनवतात.                            २.] अर्दनवेअर :- पांढर्‍या मातीपासून बनविलेली, काचेच्या पातळ आवरणाची चमक चढविलेली भांडी अर्दनवेअर म्हणून ओळखली जातात. त्यांची संरंध्रता आठ टक्क्याहून कमी असते. आणि आघात सहन करण्याची त्यांची क्षमताही कमी असते. त्यामुळे अशा प्रकारची भांडी चटकन फुटतात किंवा त्यांना तडे जातात.                                                                                                                                                   ३.] स्टोनवेअर :- अशी भांडी कोळशाच्या खाणीखालच्या " फायरक्ले"नावाच्या मातीपासून बनविली जातात. ती उच्च तापमानावर भट्टीत भाजली जातात. त्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता तीन टक्क्याहून कमी असते. ती मजबूत असतात.                                                                                   ४.] व्हीट्रियस चायना टेबलवेअर :- पांढर्‍या मातीपासून बनविलेली या प्रकारची भांडी सामान्यतः हॉटेल्समध्ये वापरली जातात. ती पूर्ण भाजलेली असतात. आणि त्यांची संरंध्रता पाच टक्क्याहून कमी असते.                                                                                                                                                   ५.] बोनचायना :- अशाप्रकारची भांडी चिनी माती, क्वार्टझ, फेल्डस्पार, बैल किंवा रेडा यांच्या हाडांचा चुरा यापासून बनविलेली असतात. ही भांडी वजनाला हलकी आणि अर्धपारदर्शी असतात.                                                                                                                                                  ६.] पोर्सेलिन :- शुद्ध चिनीमाती, क्वार्टझ आणि फेल्डस्पार यापासून पोर्सेलिन भांडी बनविली जातात. ती मजबूत व रंध्रहीन असतात. थर्मल शॉक सहन करण्याची त्यांची क्षमता जास्त असते. त्यांना चटकन चरे पडत नाहीत आणि ती विद्युतरोधक असतात. शास्त्रीय उपकरणे, वैद्यकीय उपकरणे,टेक्निकल उपकरणे बनविताना याचा वापर केला जातो.