परिचित वृक्ष 

१.] निलगिरी :-  इ.स.१७७० मध्ये जोसेफ बॅक नावाच्या वनस्पती शास्त्रज्ञाने ऑस्ट्रेलियात प्रथम या वनस्पतीचा शोध लावला. नापिक जमिनीमध्येही कोणतीही मशागत न करता अल्पकाळात रुजणारा, सदैव हिरवागार असणारा, आणि झटपट वाढणारा असा हा वृक्ष आहे.सन १८४३ मध्ये दक्षिण भारतात निलगिरी पर्वतावर हा वृक्ष प्रथम लावण्यात आला. ऑस्ट्रेलियात मूळ उत्पत्तीस्थान असलेल्या या झाडाचे मूळ नाव '' युकॅलीप्टस " असे आहे. काही भागात " कर्पूर वृक्ष " म्हणूनही तो ओळखला जातो. ऑस्ट्रेलियात हा वृक्ष जवळजवळ १२० मीटर इतका उंच वाढत असला तरी भारतात मात्र तो दहा वर्षात सुमारे ३० मीटर इतक्या उंचीपर्यंत वाढतो. त्याच्या बुंध्याचा घेर ९ ते १० मीटर इतका असल्याने इमारती लाकूड म्हणून याचा वापर केला जातो. या झाडाचे लाकूड फार टणक असल्याने रेल्वेचे स्लिपर्स, फर्निचर, संगिताची वाद्ये, नौका इत्यादि बनवण्यासाठी वापरले जाते. याच्या वाळलेल्या फांद्यांचा वापर जळावू लाकूड म्हणून केला जातो. डास प्रतिबंधक म्हणून याची पाने जशी वापरली जातात तशीच ती सुगंधी द्रव्य बनविण्यासही उपयोगी असतात. चामडी कमवण्यासाठी त्याचा अर्क वापरला जातो. मिथेल, अल्कोहोल, अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड, कागदाचा लगदा, कृत्रिम धागा बनवण्यासाठी, या झाडाचा उपयोग होतो. सन १९३८ मध्ये टासमनियातील "असोसिएटेद पेपर अँड पल्प मिल्सने छपाईसाठी तसेच लेखनासाठी लागणारा कागद बनवण्यास याच झाडाचा वापर प्रथम केला. भारतात तो मान कर्नाटकातील "दांडोली येथील "वेस्ट कोस्ट पेपर मिल्स"ने मिळवला. कर्नाटकातील "हरिहर पॉलिफायबर" या कंपनीने निलगिरीच्या लाकडापासून कृत्रिम धागा बनविण्यास प्रथम सुरुवात केली.
२.] चिंच :-  भारतात बहुतेक ठिकाणी उगवणारा हा एक डेरेदार वृक्ष आहे. फार प्राचीन काळि अफ्रिकेच्या सुदान प्रदेशातून हे झाड भारतात आणले गेले असावे असे वनस्प्ती शास्त्रज्ञ सांगतात. सस्कृतमध्ये चिंचेला " तिंतेडी ", " तिंतडीका ", "आम्लिका " अशी नावे आहेत. इंग्रजीमध्ये त्याला " टॅमॅरिंड " असे म्हणतात. " हिंदुस्थानचा खजूर " म्हणूनही चीच ओळखली जाते. या वृक्षाला उभ्या-आडव्या चौफेर फांद्या फुटतात. त्याच्या पालवीचा डोलारा गोल घुमटाकार असतो. त्याचा बुंध्याचा घेर ३ते४ मीटर असून उंची सामान्यपणे २० ते २५ मीटर इतकी असते. चिंचेच्या क्झाडाची साल तपकिरी व खरखरीत असते. चिंचेचे लाकूड घट्ट व दणकट असल्याने शेतीची अवजारे बनवण्यास ते उपयुक्त ठरते. दाट सावली देणार्‍या या वृक्षाची पाने, फुले,फळे, कोंभ सारेच आबट असते. चीम्चेची पाने छोटी गोलाकार असून डहाळीला लांबसर दांड्याच्या दोन्ही बाजूंना जोड्यांनी चिकटलेली असतात. या वृक्षाचे फळ शेंग प्रकारात मोडते. फळाच्या वरच्या बाजुला असलेले कडक कवच आतील गराचे रक्षण करते. चिंच कच्ची असताना हे कवच त्याच्या गराला चिकटलेले असते. आणि गर हिरवा असतो. चिंच पिकल्यावर मात्र गराचा रंग चॉकलेटी होतो. आणि तो कवचापासून सहजच वेगळा करता येतो. अर्धपिक्या चिंचेला गाभूळलेली चिंच असे म्हटले जाते. गराच्या आत गडद चॉकलेटी रंगाची बी असते. तिला चिंचोका म्हणतात.खेडेगावातील लोक चिंचोक्याच्या पिठाचे पदार्थ बनवतात. लहान मुले त्याचा खेळण्यासाठी वापर करतात.
३.]  कडुलिंब :-  उष्ण आणि कोरड्या हवेच्या प्रदेशात चांगले वाढणारे हे झाड आहे. सावली देणार्‍या या झाडाच्या पालवीचा डोलारा उभट असतो. त्याची पाने काळसर हिरवट रंगाची असतात. बाकदार व टोकाला निमुळती होत जाणारी याची पाने डहाळीच्या दोन्ही बाजुला जोडीजोडीने येतात. जांभळट रंगाची लांबसर मुलायम अशी याची फुले गोंडस दिसतात. कडुलिंबाच्या फळांना "निंबोण्या" म्हणतात. कच्च्या असताना त्या रंगाने हिरव्या असल्या तरी पिकल्यावर त्यांचा रंग पिवळा होतो. कडुलिंबाचे झाड १५ ते २० मीटर उंच वाढते. वैद्यकशास्त्राने कडुलिंबाला आरोग्यवर्धक म्हणून मान्यता दिलेली आहे. कडूजहर असलेली याची पाने रक्त शुद्धीकरणासाठी खातात. पोटातील कृमीही त्यामुळे नष्ट होतात. अंतरबाह्य कडू असलेल्या या झाडाच्या लाकडाला वाळवी लागत नाही. फळांच्या पेट्यांमध्ये कडुलिंबाची पाने कीडप्रतिबंधक म्हणून वापरतात.
४.] वड :- इंग्रजीमध्ये "बनियन ट्री" म्हणून ओळखले जाणारे वडाचे हे भारतात सर्वाधिक सर्वत्र आढळणारे सामान्य झाड आहे. अनेक पक्षांचे वसतीस्थान असलेल्या या झाडाचा बुंधा साधारणपणे ३ ते ४ मीटर उअंच असतो. वडाची साल काळसर राखी रंगाची असते. वडाची पाने काळसर गडद हिरव्या रंगाची राठ व जाड असली तरी नवी आलेली पाने लालसर मऊ व लुसलुशीत असतात. वडाच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या "पारंब्या". वडाचे झाड पुरेसे मोठे झाले की त्याच्या फांद्यांना पारंब्या फुटू लागतात. आणि त्या वाढत वाढत थेट जमिनीत घुसतात. पारंब्यांची टोके ही वडाची मुळे असतात. ती जमिनीत शिरून झाडाला जीवनरस पुरवतात. या पारंब्या इतक्या मजबूत असतात की लहान मुले त्यावर लोंबकळून झोपाळ्याचा आनंद लुटतात. आणि "सूरपारंब्या" हा खेळ खेळतात. वडाच्या फळांना "वडांगळे" म्हणतात. गोटीच्या आकाराची ही फळे कच्ची असताना हिरव्या रंगाची असतात. तर पिकल्यावर ती लाल रंगाची होतात. पण या फळांमध्ये बारीक कीडे व चिलटे भरपूर प्रमाणात असतात. ही फळे पाखरांचे आवडते खाद्य असल्याने पाखरांच्या विष्टेमार्फत वडाच्या झाडाचा बीजप्रसार होतो. म्हणूनच काहीवेळा वडाची झाडे भिंतीवरसुद्धा उगवताना दिसतात.
५.] पिंपळ :-  पिंपळाचे झाड ३० ते ३५ मीटर एवढे उंच वाढते. त्याचा बुंधा सरळसोट व गोलसर असतो. पिंपळाची साल पांढरी व आकर्षक असते. पिंपळाची पानेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. पत्याच्या कॅटमधल्या बदामासारखा त्यांचा आकार असून त्यांची टोके मात्र लांबट निमुळती असतात. पानांचा रंग चकचकीत हिरवा असून उन्हात ती चकाकतात. पिंपळाच्या फळांना "पिंपरे" असे म्हणतात. ती पानालगतच्या देठांना येतात. कच्ची असताना त्यांचा रंग हिरवा असतो तर पिकल्यावर ति किरमिजी रंगाची होतात. चवीला गुळचट असणारी ही फळे पाखरांना खूप आवडतात.