पारवा 

सुखी दाम्पत्याचे प्रतिक म्हणून "पारवा" हा पक्षी ओळखला जातो. "गुटर-गूं, गुटरगूं "असा आवाज करत कायम प्रणयात गुंतलेले असे पारवे घराच्या आसपास,मंदीर , रेल्वे स्टेशन, गोदामे, कारखाने, उद्याने  अशा मनुष्य वस्तीच्या जवळ नेहमीच आढळतात. इंग्रजीत त्यांना "ब्ल्यू रॉक पिजन" असे म्हटले जाते. शास्त्रीय भाषेत त्याला "कोलंबा लिविया" असे नामाभिधान आहे. तर संस्कृतमध्ये "पारावत " किंवा "नील कपोत " असेही म्हणतात. आकाराने ३३ से.मी. लांब, हिरवी जांभळी झाक असलेला निळा राखी रंग, आणि पंखावर दोन काळे पट्टे असलेल्या पारव्याच्या पंखाखालचा भाग मात्र पांढुरका असतो. त्याच्या शेपटीच्या खाली सुंदर काळी फित असते. त्याची मान जाड आणि चोच काळी असते. भारताप्रमाणेच पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, लक्षद्विप बेटे, आयर्लंड, ब्रिटन आदि अनेक ठिकाणी पारव्यांचे वास्तव्य आहे.
                   खाण्याच्याबाबतीत पारव्यांना अधाशीच म्हणावे लागेल. पूर्ण शाकाहारी असलेले हे पक्षी धान्याचे दाणे,गवताच्या बिया, कोवळी पाने आवडीने मिळेल तेवढी खातात. नवलाची गोष्ट म्हणजे या धान्याबरोबर ते खडेसुद्धा खातात. सतत विष्ठा करणार्‍या या पारव्यांच्या विष्ठेमध्ये न पचलेल्या खड्यांचे तुकडे आढळून येतात. अन्न साठवून ठेवण्याची वृत्तीही पारव्यांमध्ये दिसून येते. सलग मान खाली ठेवून पाणी पिण्याची पारव्यांची पद्धतही इतर पक्ष्यांपेक्षा वेगळी आहे. पारव्यांच्या अंगावर अनेक सूक्ष्मजीव असतात. म्हणून ते आपले अंग उन्हात शेकवताना दिसतात. जमिनीवर पालथे पडून पंख, काख सूर्यकिरणांत शेकवण्याची त्यांची पद्धत मजेशीर आहे.
                                 मे ते जुलैच्या दरम्यान पारव्यांचा विणीचा हंगाम असतो. नर पारवा गळा फुगवून मान हलवत स्वत;भोवती घिरट्या घालत गुटर-गूं आवाज काढत मादीचे प्रणयाराधन करतो. जोडी जमली की दोघे मिळून घरटे बांधतात. काड्या काटक्यांनी बनविलेल्या घरट्यात बिछान्यासाठी पिसांचे किंवा इतर पक्षांच्या विष्टेचे अस्तर ते तयार करतात.एकदा तयार केलेले घरट्यांचा वापर पारवे पुन्हा पुन्हा करतात. मात्र नर आणि मादी पारवे आळशी असतात.घरट्यातील विष्ठा दोघेही बाहेर टाकत नाहीत.  त्यामुळे त्यांच्या घरट्याला घाण वास येत असतो. घरट्याप्रमाणेच अंडी उबविण्याचे कामही पारवा नर-मादी दोघे मिळून करतात. अंडी घातल्यानंतर साधारणतः पंधरा-सोळा दिवसांनी त्यातून पिल्ल बाहेर येतात. पारव्याच्या अन्ननलिकेत वरच्या बाजुला एक पिशवी असते.विणीच्या काळात त्यामध्ये दुधासारखा पातळ स्त्राव तयार होतो. पिल्ल सहा-सात दिवसांची होईपर्यंत नर व मादी आपल्या चोचीतून हा स्त्राव पिल्लांना भरवतात. पिल्ल थोडी मोठी झाल्यावर मगच त्यांना धान्य भरविले जाते. साधारणतः पंधराव्या दिवशी पिल्ले घरट्यातून उडून बाहेर जाऊ शकतात.
                   उडण्यामध्ये अत्यंत कुशल असलेले पारवे संदेशवहनाच्या कामातही उपयोगी आहेत विविध रंगांची जाणही माणसांपेक्षा पारव्यांना अधिक असते.