कावळा 

अगदी लहानपणी ओळख झालेले, आईच्या बरोबरीने जेऊखाऊ घालणारे, बडबडगीतात डोकावणारे दोन पक्षी म्हणजे काऊ आणि चिऊ. त्यापैकी त्या काळ्याकुट्ट कावळ्याची प्रथम प्रथम खूप भीती वाटते. पण मग आपोआपच नकळत तो सर्वांचा दोस्तच बनून जातो. अनेक गोष्टीतून त्याचा परिचय होतो आणि मग तो आपलेपणा वाढतच जातो.
कावळ्याच्या नावातच त्याच्या वैशिष्ट्याची कल्पना येते. तो काव-काव करतो म्हणून "काव" ही अक्षरे त्याच्या नावात अली असावीत आणि त्याचा रंग काळा म्हणून "ळा" हे अक्षर आले असावे. कावळ्याच्या रंगाबाबत एक गमतीशीर गोष्ट लहान मुलांना सांगितली जाते. एकदा म्हणे देवाने सर्व पक्षांना रंग देण्यासाठी बोलावले. प्रत्येक पक्षाला विचारून ज्याच्या त्याच्या आवडीचा रंग देवाने दिला. पण हा शिष्ठ कावळा पुन्हा पुन्हा निरोप पाठवून आधी गेलाच नाही. नंतर गेला तेंव्हा उशीरा, फार घाईतच गेला. आणि मग इतका गोंधळला की देवाने अमुक एक रंग देऊ का विचारताच प्रत्येक वेळी 'हाच रंग का तो का नको' असच करत राहिला. शेवटी देव इतका कंटाळला की त्याने कावळ्याला उचलले; आणि काळ्या रंगाच्या पिंपातच बुडविले. अजुनही बिचारा कावळा "का- का मला काळा रंग का-का" अस ओरडत असतो. आणि पुढे एका गोष्टीत तर याने गंमतच केली. आपला काळा रंग जावा म्हणून साबण लावून दगडाने अंग घसाघसा चोळत राहिला आणि त्याची सारी कातडीच सोलून निघाली. कावळ्याच्या याच बावळट आणि मूर्खपणाचा फायदा एकदा कोल्ह्याने घेतला आणि त्याच्या तोंडातील भाकरीचा तुकडाच पळवला. एवढ्याश्या चिमणीनेसुद्धा एकदा कावळ्याची फजिती केल्याची गोष्ट आहे. एकदा चिमणीने कावळ्याला रहायला आपल्या घरात जागा दिली तर याने तिचे सारे खाणेच संपवून टाकले. मग काय चिमणीने त्याची शेपटीच भाजून टाकली. एकदा तर हा कावळा चिमणीची पिल्लच खायला गेला. चतुर चिमणीचि पिल्लच ती. त्यांनी अडकवला त्याच्या घशात एक आकडा. मग पुन्हाम्हणून हा त्यांच्या वाटेला गेला नाही. पण या मूर्ख कावळ्याने एकदा मात्र हुशारी करून मडक्याच्या तळाशी असलेले पाणी मडक्यात दगड टाकून वर काढले आणि आपली तहान भागवल्याची गोष्ट आहे.
      तर असा हा कथा विश्वात आढळणारा काहीसा मूर्ख बावळा कावळा प्रत्यक्ष सत्य सृष्टीतही बावळाच आहे. गोड गाणे म्हणणारी काळ्या रंगाची कोकिळा आपली अंडी उबवण्यासाठी कावळ्याच्या घरट्यात नकळत आणून ठेवते आणि कावळिण ती उबवतेही. कावळीणीने वाढवलेली हि कोकिळेची पिल्ल जेंव्हा 'कुहूकुहू' करायला लागतात; तेंव्हा कावळे परिवाराला समजत की ही आपली पिल्ल नाहीत.
       कावळ्याला डोळा एकच .पण त्याची नजर भारी तीक्ष्ण. जमिनीवर जरा काही पडलेल असल की कावळा येऊन त्यावर झडप घालणारच. मिष्टान्न असो वा शिळपाक, शिजवलेल असो वा बिनशिजवलेल , इतकच नाही तर कुजलेल सडलेल अन्नही त्याला चालत. "मिळेल ते खाव" हाच याचा स्वभाव. याच याच्या हावरट स्वभावामुळे तो माणसांचा मित्र बनला आहे. आपल्या आजुबाजुच्या परिसरातिल सर्व घाण खाऊन टाकून परिसर स्वच्छ करणारा तो जणू सफाई कामगारच. मनुष्य वस्ती याला भारी प्रिय. म्हणूनच मनुष्यवस्तीत मोठ्या झाडावर तो आपले घरटे बांधतो.
           माणसांचाही या कावळ्यावर अतोनात विश्वास. आपल्याकडे येणार्‍या पाहुण्यांची सूचना कावळा अगोदरच घेऊन येतो. अशी माणसांची समजूत आहे. जणू काही तो पोस्टमनच. त्यामुळेच खिडकीत बसून ओरडणार्‍या कावळ्याला आजि हाकारते, " कोण बाबा येणार आज?''
            इतकच काय पण मृत माणसही कावळ्याच्या रुपाने आपल्याला भेटायला येतात  अशी आपल्या पूर्वजांची समजूत होती. म्हणून  माणूस मृत झाल्यावर तेराव्या दिवशी पिंडाला कावळा शिवला की आपण खुश होतो. सणासुदीच्या दिवसालाही कागावळ ठेऊन आपण मृतात्म्यांना जेवायला घालतो.
                तर असा हा काळ्याकुट्ट रंगाचा, रुपानेही बेताचा एकाक्ष कावळा आपल्या जीवनाशी किती निगडीत आहे नाही. अगदी बालपणी आपल्याला तो जो भेटतो तो आपल्या मृत्युनंतरही आपली सोबत करीत असतो.