शाहीर साबळे 

"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" अशी गर्जना करून शाहीरी परंपरा अगदी अलिकडच्या काळापर्यंत जपून ठेवणारे शाहीर म्हणजे शाहीर कृष्णा गणपत साबळे. सातारा तालुक्यातील शिवथर हे त्यांचे मूळ गाव होते. भाऊबंदकीच्या त्रासाने कंटाळून त्यांचे आजोबा शिवथर सोडून पसरणी नावाच्या गावी स्थायिक झाले. परंतु कुटुंबाला आर्थिक हालाखीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शाहिरांचे वडील मुंबईला गिरणी कामगार म्ह्णून नोकरीत रूजू झाले. अर्थात त्यामुळे आर्थिक स्थितीत फारसा फरक पडला नाही. मग आईने शाहीर साबळे यांना जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर या गावी मामाकडे ठेवले. येथेच साने गुरूजींच्या संस्कारामुळे त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली.गाडगे बाबांचा परिचयही येथेच झाला. शाहीर सिदराम बसप्पा यांच प्रभावी व्यक्तिमत्व आणि आकर्षक कार्यक्रम करण्याची पद्धत याच दर्शनही येथेच त्यांना झाल. या काळात शाहीर साबळे उत्कृष्ट भजने व गाणी स्वतः रचून म्हणत असत.पण त्यांच्या आजीचा या गोष्टीला विरोध होता. या विरोधाला कंटाळून व कला क्षेत्रात नांव कमवायचच असा निश्चय करून शाहीरांनी अंमळनेर सोडले आणि ते पुन्हा पसरणीला आपल्या घरी परत आले.

गावाच्या विविध उत्सवातून आपल्या भजनांचे व गाण्याचे कार्यक्रम करू लागले. पुढे मुंबईला येऊन लीलाबाई मांजरेकर यांच्या तमाशा फडात दाखल झाले. त्यानंतर तेही काम सोडून ते न १९४२च्या सुमारास मुंबईच्या 'स्वदेशी मिल' मध्ये नोकरीला लागले. तेथेही ते फार काळ रमले नाहीत. त्याच काळात स्वदेशीच्या चळवळीने जोर धरला होता. आपणही देशासाठी कहीतरी केले पाहिजे; अशी जाणीव मुंबईत होणार्‍या विविध सभांतील नेत्यांचा भाषणांनी त्यांना दिली. त्यांनी नोकरी सोडली आणि ते साने गुरूजींबरोबर त्यांच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सामील होऊ लागले. त्यातूनच साने गुरूजींच्या आशीर्वादाने 'शाहीर साबळे आणि पार्टी'ची सुरूवात झाली.स्वातंत्र्य चळवळीत घडणार्‍या ताज्या घटनांवर गाणी रचून ती जनतेसमोर सादर केली जाऊ लागली. त्यातून क्रांतीसिंह नाना पाटील ,महात्मा गांधी , सुभाषचंद्र बोस आदि देशभक्तांच्या कार्याचा परिचय लोकांना करून दिला जाई.

ह्ळूह्ळू त्यांच्या कार्यक्रमांचा बोलबाला होऊ लागला. अधूनमधून आकाशवाणीवर कार्यक्रम करण्याची संधी त्यांना मिळू लागली. 'नवलाईचा हिंदुस्थान' या गीताचे रेकॉर्डिंग होऊन त्याची पहिली ध्वनीमुद्रिका काढली गेली.त्यानंतर 'इंद्राच्या दरबारातील तमासगीर' या प्रहसनाच्या ध्वनीमुद्रिका दारूबंदी खात्याच्या प्रचारासाठी वापरण्यात आल्या. त्यानंतर दारूबंदी प्रचारक म्हणून ते सातार्‍याला आले. तेथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहवासाचा लाभ त्यांना मिळाला. त्यानंतर आपली पत्नी भानुमती हिच्या सहकार्याने त्यांनी अनेक  कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांची पत्नी गीत रचून देत असे आणि शाहीर त्याला सुंदर चाली लावून देत असत एकेक व्यावसायिक तंत्र आणि मंत्र आत्मसात करत अनेक चांगले कार्यक्रम होऊ लागले. याच काळात आकाशवाणीचा 'प्रादेशिक संगीत विभाग' स्थापन झाला. त्यामध्ये काम करण्याची संधी साबळे यांना मिळाली. आचार्य अत्रे, पंडित जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, लतादीदी आदि अनेक मान्यवरांकडून कौतुकाची थाप मिळाली. संयुक्त महाराष्ट्राच्या स्वागतासाठी तयार केलेल्या वैशिष्टपूर्ण ध्वनीमुद्रिकेसाठी कवीवर्य राजा बढे लिखित आणि श्रीनिवास खळे यांनी संगीत दिग्दर्शित केलेले "गर्जा महाराष्ट्र माझा.... " हे . गीत गाण्याची संधी त्यांना मिळाली. आणि ते प्रसिद्धिच्या अत्युच्च शिखरावर जाऊन पोहोचले.

शाहीर आत्माराम पाटील यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या "महाराष्ट्र शाहिरी संगम" या संस्थेचे ते अध्यक्ष बनले. शाहीर साबळे  यांनी 'यमराज्यात एक रात्र' , 'ग्यानबाची मेख' , 'आक्काबाईचा कोंबडा', 'मीच तो बादशहा', 'आंधळ दळतय', 'एक तमाशा सुंदरसा' ,'असुनी खास मालक घरचा' , 'माकडाला चढली भांग',' फुटपायरीचा सम्राट' , 'बापाचा बाप', आदि अनेक लोकनाट्य व मुक्त नाट्य सादर केली.सन १९८४ मध्ये संगीत अकादमीने "लोकगायक"हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. सन १९८८ मध्ये पुन्हा "शाहीर अमरशेख पुरस्कार'' शाहीर साबळे यांनाच प्राप्त झाला. पुढे "अखिल भारतीय शाहीर परिषद" कार्यान्वितकरण्यात त्यांनी हातभार लावला. तसेच निवृत्त अपंग कलावंतांना सरकारकडून निवृत्ती वेतन मंजूर करून घेण्याच्या कार्यातही शाहीर साबळे अग्रेसर होते. याच काळात "शाहीर साबळे प्रतिष्टाना"ची स्थापना करून त्याद्वारे "लोकधारा प्रशिक्षण शिबिरे" घेतली. सन १९९० मध्ये महाराष्ट्र शासनाने " महाराष्ट्र गौरव पुर्स्कार" देऊन शाहीर साबळे यांना सन्मानीत केले.