सेंद्रिय खते 

कोणत्याही जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक असे तीन गुणधर्म असतात. या तिन्ही घटकांचा समतोल जेथे असेल ती जमीन अधिक उत्पादनक्षम बनते. तिच्यात जसे रासायनिक , कार्बनिक पदार्थ असतात तसेच अनेक जीवांचे ते वसतिस्थान असते. अनेक बॅक्टेरिया, प्रोटोझोआ , शेवाळ, बुरशी, गांडुळे, आणि अन्य छोटे जीव जमिनीत राहून तिच्यातील कार्बनयुक्त पदार्थांचे खतात रुपांतर करत असतात. शिवाय जमिनीतील अकार्बनिक पदार्थांना विघटित करून वनस्पतींना उपयुक्त पदार्थ तयार करण्याचे काम ते करत असतात. जमिनीतील काही जीवाणू जमिनीमध्ये अमिनो अ‍ॅसिड्स व्हिटॅमिन्स बनवतात . तर काही जीवाणू मुळांना आवश्यक अशी हार्मोन्स तयार करतात. बुरशीसारखे जीवाणू अ‍ॅन्टिबायोटिक्सचे काम करून किटाणूंची वाढ रोखण्याचे काम करतात. जमिनीतील ओलावा टिकवण्याचे आणि खताचे प्रमाण वाढविण्याचे काम गांडुळे करतात. जमिनीतील सारेच जीवाणू जमीनीत ह्यूमसचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. ह्युमसमुळे जमीन हवेशीर ओलसर व भुसभुशीत रहाते. आणि अंततः जमिनीची सुपिकता टिकून रहाते.
   परंतु अमाप उत्पादनाच्या हव्यासापोटी भारतात भरमसाठ रासायनिक खते, कीटकनाशके वापरली जाऊ लागली आणि त्यामुळे जमिनीतील जैवविविधता नष्ट होऊ लागली. त्यामुळे जमिनीत नैसर्गिकरित्या खत तयार होणे बंद झाले. जमिनीचा रासायनिक आणि जैविक समतोल बिघडल्याचा तो परिणाम आहे. हा बिघडलेला समतोल परत आणायचा तर सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवण्यात आलेली ही सेंद्रिय खते जमिनीचा कस वाढवतात,जमिनीच्या सुपिकतेबरोबरच जमीन निरोगी बनवण्यासाठी ती उपयुक्त ठरतात.
             १] शेण खत :--- एका गायीपासून दिवसाला सरासरी दहा ते बारा किलोगॅम ताजे शेण मिळते. ते रोजच्या रोज पिकांना घालता येते. शिवाय मुबलक प्रमाणात शेणखत तयार करता येते. त्यासाठी पाच फूट गोलाकार व्यासाची जागा तयार केली जाते. त्यामध्ये जवळ जवळ एक टन जुने शेण टाकून त्याचा ढीग केला जातो त्या ढीगामध्ये एक किलोग्रॅम कल्चर मिश्रणाची भुकटी मिसळली जाते. त्यात रोज थोडे थोडे पाणी घातले जाते. दर आठवड्याला ढीग उपसून वरखाली केला जातो. अशा प्रकारे चार आठवड्यात काळेभोर ४०० किलोग्रॅम इतके शेणखत तयार होते.
            २] गांडुळखत :--- गांडुळ जेवढे खातात तेवढीच विष्टा टाकतात. ही गांडुळ विष्टा म्हणजेच गांडुळखत. गांडुळखत तयार करण्यासाठी ओलावा, दाट सावली आणि शेण किंवा अर्धवट कुजलेला  कचरा यांची गरज असते. गांडुळखत तयार करण्यासाठी ३ फूट रुंद, २ फूट उंच आणि पाहिजे तेवढा लांब असा हौद तयार केला जातो. त्यात क्रमाने काडीकचरा, शेण टाकले जाते. आणि गांडुळे सोडली जातात. दररोज त्यात पाणी घालून ओलावा टिकवला जातो. काही दिवसानी गांडुळखत तयार होते. ते शेणखतापेक्षा तीन ते चार पट जास्त परिणामकारक असते.
                 ३] समाधी खत :--- गायीचे आयुष्य सामान्यतः अठरा ते वीस वर्ष इतके असते. गाय मृत झाल्यावर तिचे चामडे काढले जाते. आणि तिला एका झाडाखाली खड्डा खणून पुरले जाते. साधारणतः वर्षभरात तिचे खतात रुपांतर होते. यालाच अणुखत किंवा समाधी खत असे म्हणतात.
                 ४] शिंग खत :--- मृत गायींची पोकळ शिंग हे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. अशा शिंगांमध्ये शेण भरले जाते. नंतर जमिनीमध्ये तीस ते चाळीस से.मी. खोल खड्डा खणला जातो. त्यामध्ये शिंगाचा निमुळता भाग वरच्या बाजुला राहील अशारितीने शेण भरलेली शिंगे पुरली जातात. या खड्ड्यातील माती ओलसर रहावी यासाठी त्यावर पाणी शिंपडले जाते. सहा महिन्यानंतर जमिनीतून शिंग बाहेर काढली जातात आणि त्यातील खत काढून मातीच्या डेर्‍यात साठवले जाते.
                    ५] अमृतपाणी :--- शेण, गोमूत्र,गूळ यांचे सडवलेले पाणी म्हणजे अमृतपाणी. ते बनवण्यासाठी तीस किलो ताजे शेण, दहा लिटर गोमूत्र, दिड किलो गूळ, दिड किलो डळीचे पीठ, पाचशे ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि तीस लिटर पाणी लागते. हे सर्व मिश्रण चार ते पाच दिवस एका ड्रममध्ये भरून ठेवतात. रोज सकाळी ते मिश्रण ढवळले जाते. पाचव्या दिवशी त्यात आणखी पाणी मिसळून अमृतपाणी बनवले जाते. हे अमृतपाणी झाडांना घातल्यावर झाडाचा पोत सुधारतो. शिवाय किडींचे नियंत्रण होते.
                    ६] व्हर्मिवॉश :--- गांडुळ आपल्या शरिरातून एक चिकट द्रव सोडत असतात. गांडुळखत तयार करताना त्यात जे पाणी असते त्यात तो द्राव मिसळलेला असतो त्यालाच व्हर्मिवॉश असे म्हणतात. त्यामध्ये किटकनाशक, बुरशीनाशक आणि अन्य संप्रेरके असतात.