अहिल्याबाई होळकर 

फलटण भागात नीरा नदिच्या काठावर होळ नावाचे एक गाव आहे. तेथे मल्हारराव होळकर रहात होते. थोरल्या बाजीरावांबरोबर अनेक लढायात मल्हाररावांनी भाग घेतला होता. त्यांच्या पराक्रमावर खूष होऊन बाजीरावांनी मल्हाररावांना सन १७२८ मध्ये नर्मदेच्या उत्तरेला बारा परगण्याची जहागिरी दिली. तसेच त्यानंतर माळव्याची सुभेदारीही दिली. मल्हाररावांची पत्नी अतिशय धार्मिक होती. मल्हाररावांना खंडेराव नावाचा एक मुलगा होता. तो विवाहयोग्य होताच बीड जिल्ह्यातील चोंडी गावच्या माणकोजी शिंदे या धनगर पाटलाच्या मुलीबरोबर त्याचा विवाह करून देण्यात आला. त्याच या अहिल्याबाई होळकर.
             अहिल्याबईंचा जन्म सन १७२५ मध्ये बीड जिल्ह्यातील चोंडी या गावी झाला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. या संस्कारक्षम वयात सासूची धार्मिक वृत्ती आणि सासर्‍यांचे खंबीर नेतृत्व यांचा प्रभाव त्यांच्या बालमनावर पडला. सन १७४५ मध्ये अहिल्याबाईंना एक मुलगा झाला. त्याचे नाव मालेराव होळकर. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव मुक्ताबाई असे ठेवण्यात आले. सन १७५४ मध्ये अहिल्याबाईंचे पती खंडेराव राघोबादादा पेशवे यांच्याबरोबर सूरजमल जाट याच्या विरुद्ध लढण्यास गेले होते. या लढाईत १९ मार्च १७५४ मध्ये खंडेराव मारले गेले. आणि अहिल्याबाईंना वैधव्य प्राप्त झाले. त्यावेळच्या रिवाजाप्रमाणे सती जाणार्‍या अहिल्याबाईंना त्यांच्या सासर्‍यांनी अडविले. आणि राज्यकारभार सांभाळण्याच्या कामी मदत करण्याची विनंती केली. प्रजेच्या हितासाठी अहिल्याबाईंनी सती जाण्याचा विचार रद्द केला. मल्हारराव युद्धावर गेले की सारा कारभार अहिल्याबाई पाहू लागल्या.
          काही काळानंतर मल्हारराव होळकरांचाही मृत्यु झाला. आणि ३जून १७६६ रोजी अहिल्याबाईंचा पुत्र मालेराव इंदूरचा सुभेदार म्हणून कारभार पाहू लागला. पण मालेराव अत्यंत व्यसनी होता. राज्यकारभाराकडे त्याचे लक्ष नव्हते. २७ मार्च १७६७ मध्ये एका आजारात तो मरण पावला. त्याला मूलबाळ कोणी नव्हते. साहजिकच राज्यकारभार पहाण्याची जबाबदारी पुन्हा अहिल्याबाईंवर येऊन पडली. आपली मुलगी मुक्तबाई हिचे लग्न यशवंतराव फणसे यांच्याशी त्यांनी लावून दिले होते. तिला नथोबा नावाचा एक मुलगा होता. आता तोच पुढे इंदूरचा सुभेदार होईल म्हणून त्याचे पालनपोषण त्यांनी केले. पण तोही अल्पायुषी ठरला. अहिल्याबाई निर्वंश झाल्या. नथोबाच्या मृत्युनंतर एका वर्षातच त्यांचे जावई यशवंतराव फणसे यांनाही देवाज्ञा झाली. आणि मुक्ताबाईही रिवाजाप्रमाणे सती गेली. एकुलत्या एका कन्येला चितेत जळताना पहाण्याचे दुर्भाग्य अहिल्याबाईंच्या नशिबी होते. पण त्या अचल राहिल्या. प्रजाहित हेच त्यांचे जीवन ध्येय बनले.
आपला मुलगा मालेराव याच्या मृत्युनंतर अहिल्याबाईंनी इंदूर सोडले. आणि नर्मदा नदीकाठी महेश्वर येथे राजधानी नेली. अहिल्याबाईंचा वाडा अत्यंत साधा होता. त्यांचे घराणे धनगर होते. म्हणून सिंहासनावर बसण्याऐवजी त्या साध्या पांढर्‍या घोंगडीवर बसून राज्यकारभार करीत असत. बिनकाठाचे पांढरे पातळ त्या नेहमी नेसत असत. डामदौल त्यांना पसंत नव्हता. नित्य प्रार्थना, पुराणश्रवण, दानधर्म यात कधी खंड पडला नाही.  त्यांच्यासमोरून योग्य कारणासाठी आलेला याचक कधी विन्मुख होऊन जात नसे. सणसमारंभाला गरिबांना कपडे , घोंगड्या, अन्नदान दिले जाई.अगदी दरोडेखोर भिल्लानांही जमीन देऊन शेती करण्याची संधी अहिल्याबाईंनी दिली होती. विद्वान ब्राह्मण, शास्त्री पंडितांचा दरबारात सत्कार होई. अनेक घाट, मंदिरे, स्मारके अहिल्याबाईंनी बांधली. सोमनाथाचे पुनरुज्जीवन करून तळघरात नवे मंदीर बांधले. काशी, त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर, भीमाशंकर, रामेश्वर, गोकर्ण, वेरूळ, श्रीमल्लिकार्जून, परळीवैजनाथ, उज्जैनचे महाकालेश्वर, औंढ्यानागनाथ अशा अनेक ठिकाणी घाट, पूल, अन्नछत्र, मंदिरे अहिल्याबाईंनी बांधली. आणि हा सर्व खर्च त्यांनी त्यांच्या वैयक्तिक मिळकतीतून केला; हेच त्यांचे वैशिष्ट्य. अशाप्रकारे समर्पित भावनेने, सेवावृत्तीने, लोकानुवर्ती राज्यकारभार करून त्यांनी एक आदर्श निर्माण केला. वयाच्या सत्तराव्या वर्षी १३ ऑगस्ट १७९५ रोजी त्यांनी शांतचित्ताने या जगाचा निरोप घेतला.