कथा कालिदसाची 

राजा विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांमध्ये कालिदास नावाच्या साहित्यिकाचा समावेश होता. ऋतुसंहार,तसेच अभिज्ञान शाकुंतल, विक्रमोर्वशीय, मालविकाग्निमित्र अशी तीन नाटके आणि मेघदूत, कुमारसंभव, रघुवंश ही महाकाव्ये एवढीच त्याची साहित्यसंपदा. पण याच कलाकृतींनी कालिदासाचे नाव महाकवी म्हणून जगभर गाजले. कवी जयदेव यांनी कालिदासाला "कविकुलगुरू" ही पदवी दिली. तर अकराव्या शतकातील सोडढळ नावाच्या कवीने कालिदासाला "रसेश्वर" म्हणून संबोधले आहे. अशा या कवीची अद्भूतरम्य अशी ही जीवनकहाणी.
                उज्जैन शहरात एका ब्राह्मण कुटुंबात कालिदासाचा जन्म झाला. पण तो पाच महिन्याचा असतानाच त्याचे आई वडील स्वर्गवासी झाले. मग एका गवळ्याने त्याला मुलाप्रमाणे वाढविले. साहजिकच या मेंढपाळकडे कालिदासाला काहीही शिक्षण मिळाले नाही.तो वयाच्या अठरा वर्षापर्यंत निरक्षर, अशिक्षितच राहिला.
                       याच काळात तेथल्या राजाच्या मुलीचे लग्नाचे वय झाले होते. राजकन्या अतिशय रूपवान तर होतीच शिवाय अति हुशारही होती. तिने  "अत्यंत विद्वान अशा तरुणाशीच मी विवाह करीन." असा पण केला. अनेक तरुणांना राजवाड्यात बोलाविले जाई. राजकन्या त्या तरुणांची स्वतः परीक्षा घेई. वादविवाद करी पण तिच्या परीक्षेला कोणी तरूण उत्तीर्ण होत नव्हता. अनेक तरुणांना तिने नापसंत केले. आता राजा कंटाळला. राजकन्येच्या काळजीने हवालदिल झाला. त्याने प्रधानाला बोलावून राज्यकन्येसाठी योग्य वर शोधण्याची जबाबदारी सोपविली. राजाला लवकरात लवकर चिंतामुक्त करावे म्हणून चाणाक्ष प्रधानाने एक योजना आखली. त्याने अनेक शास्त्री पंडितांना जमा केले. गवळ्याच्या घरात वाढलेल्या अशिक्षित पण दिसायला सुंदर अशा अठरा वर्षाच्या कालिदासालाही बोलाविले. कालिदासासह त्या शास्त्री पंडितांच्या जथ्याला घेऊन प्रधान राजकन्येकडे आला. "राजकन्येने प्रथम शास्त्री पंडितांना हरवावे आणि मगच कालिदासाशी वादविवाद करावा." असे ठरले. अनेक प्रश्नोत्तरे, वादविवाद झाले. आणि शेवटी त्या शास्त्री पंडितानीच राजकन्येला हरविले. ज्यांचे अनुयायी एवढे विद्वान त्यांचा नेता निश्चितच विद्वान असणार; असे समजून राजकन्येने कालिदासाशी वादविवाद करण्याचे टाळले. आणि त्याची विद्वत्ता मान्य करून त्याच्याबरोबर विवाह करण्यास संमत्ती दर्शवली.
                    अशाप्रकारे आपल्या या अशिक्षित कालिदासाचा विवाह राजकन्येशी झाला. सत्य परिस्थितीची त्या उभयतांना कल्पना नव्हती. विवाहानंतर चारच दिवसांनी आपला पती निरक्षर आहे, हे राजकन्येला समजले. तिने कालिदासाला विद्वत्ता संपादन करण्यासाठी कालिमातेची उपसना करण्यास  सांगितले. राजकन्येला फसवून आपला विवाह झाला आहे; आणि विद्वत्ता प्राप्त केल्याशिवाय ती आपला मनाने स्वीकार करणार नाही; हे कालिदासाने ओळखले. तो राजवाड्यातून बाहेर पडला. आणि वनात जाऊन कालिमातेची उपासना करू लागला. पण काहीकेल्या कालिमाता प्रसन्ना होईना. हे पाहिल्यावर त्याने आपले शिर कापून कालिमातेला अर्पण करायचे ठरवले. तसे तो करणार तेवढ्यात कालिदासासमोर साक्षात कालिमाता प्रकट झाली. आणि " तू जगातील श्रेष्ट असा प्रतिभावंत कवी होशील " असा आशीर्वाद तिने कालिदासाला दिला.
          प्रतिभावंत होऊन कालिदास घरी परत आला. तेंव्हा राजकन्येला अतिशय आनंद झाला. पण कालिदास आता तिला पत्नी मानण्यास तयार नव्हता. राजकन्येच्या सांगण्यानेच आपण एवढे प्रतिभसंपन्न झालो. तिनेच आपणाला मार्ग दाखविला तेंव्हा ती आता आपली पत्नी न रहाता गुरुमाताच बनली असे तो म्हणू लागला. "गुरूमाता"म्हणूनच तो पत्नीला संबोधू लागला. कालिदासाच्या या विक्षिप्त वागण्याने राजकन्या चिडली. रागाच्या भरात "तुला एका स्त्रीच्या हातून मरण येईल असा शाप तिने कालिदासाला दिला.
कालिदास पुन्हा घराबाहेर पडला. भारतभर फिरला.पत्नीला सोडून इतर स्त्रियात रममाण होऊ लागला. वेश्यांच्या सहवासात दिवस कंठू लागला. असाच एका वेश्येच्या घरी रहात असताना तेथल्या राजाने एक समस्या सोडविण्यासाठी फार मोठे बक्षिस लावले होते. वेश्येने ती समस्या कालिदासाला सांगितली. कालिदासाने लगेचच त्या समस्येची पूर्तता केली. त्या वेश्येला पैशाचा मोह आवरेना. तिने त्या बक्षिसाच्या लोभाने कालिदासाला ठार मारले.