श्री ओंकारेश्वर 

भारतात मध्यप्रदेश राज्यात इंदूरजवळ ओंकारेश्वर हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हिंदुस्थानातील बारा ज्योतीर्लिंगापैकी हे एक जाज्वल्य शिवस्थान आहे. नर्मदा -कावेरी नद्यांच्या संगमावर ओंकाराच्या आकाराचे हे एक बेट आहे. मंदिरात जाण्यासाठी नर्मदा नदीवर एक सेतू पादचार्‍यांसाठी बांधलेला आहे. कोणतीही गाडी त्यावरून जाऊ शकत नाही. पुलाच्या सुरवातीलाच मोठे पटांगण लागते; तेथे गाड्या पार्क करण्याची सोय आहे. दुकाने, उपहारगृहे, स्नानगृहे यांची सोयही पटांगणात आहे. ओंकारेश्वर हे क्षेत्र शिवपुरी, ब्रह्मपुरी, आणि विष्णूपुरी अशा तीन भागात विभागले गेले आहे. विष्णूपपुरीमध्ये विष्णूमंदिराबरोबरच कपिलेश्वर, काशीविश्वेश्वर, चंद्रमौलेश्वर इत्यादि अनेक मंदिरे आहेत. एक दहा हातांची महाकालीची प्रचंड मूर्तीही येथे आहे.वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले सिद्धनाथाचे मंदीरही येथे पहाण्यासारखे आहे. त्याचा चबुतरा दहा फूट उंच आहे. त्यावर चारी बाजुनी पाच फूट उंचीचे हत्ती आहेत. त्याच्या प्रवेशद्वारावर भीम व अर्जूनाच्या मूर्ती पाहून आश्चर्य वाटते. ब्रह्मपुरिमध्ये अमरेश्वराचे मंदीर आहे. त्याच्या भिंतीवर महिन्मस्तोत्र लिहिलेले आहे. कार्तिकमेळ्यासाठी ब्रह्मपुरी प्रसिद्ध आहे. शिवपुरिमध्ये ओंकारेश्वर महादेवाचे महत्वाचे मंदीर असले तरी तेथे जण्यापूर्वी अविमुक्तेश्वर, ज्वालेश्वर, केदारेश्वर, बडा गणपती, कलिका आदी अनेक मंदिरे लागतात.
    तीन प्रवेशद्वार असलेले ओंकारेश्वर मंदीर तीन मजल्यांचे आहे. मंदिराचे प्रवेशद्वार उत्तरेला असून गाभार्‍यातील प्रवेश गुहेप्रमाणे आहे. मंदीराच्या गाभार्‍यात स्वयंभू शिवलिंग खोलगट शाळूंकेत आहे शिवलिंगाच्या चहुबाजुला सदैव पाणी भरलेले असते. त्याच्या जवळच पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. दुसर्‍या मजल्यावर महाकालेश्वराची मूर्ती आहे. मंदिराच्या आवारात शुकदेव, नंदी आणि लिंगरूपात मांधाता  यांच्या मूर्ती आहेत. ओंकारेश्वर मंदिरात सकाळी, दुपारी आणि रात्री अशी तीन वेळा शिवलिंगाची पूजा केली जाते. रात्रंदिवस तूपाचा दिवा जळत असतो. कार्तिक पौर्णिमा व महाशिवरात्र या दोन दिवशी ओंकारेश्वराला मोठी यात्रा भरते.
          पुराणकाळात याठिकाणी विंध्य नावाचा राजा राज्य करीत होता. नारद ॠषींच्या सांगण्यावरून  ओंकाररूपी महादेवाची आराधना या विंध्य राजाने केली. त्यावेळी महादेव "ओम " हे अक्षर उच्चारुन  तेथे प्रकट झाले आणि ओंकाररुपी लिंग पाताळातून आपोआप वर आले; अशी कथा सांगितली जाते. तेंव्हापासून महादेव देवगण, सर्पदेवतांसह तेथे वास करून आहेत. म्हणूनच या क्षेत्राल ओंकारेश्वर असे नाव पडले आहे. पुढे त्रिपूर नावाचा राक्षस आपल्या तारकासूर, विद्युन्माली,कमलाक्ष या मुलांसह तेथील प्रजेला त्रास देऊ लागला; तेंव्हा शंकराने ब्रम्हा,विष्णू यांच्या मदतीने या सर्व राक्षसांचा नाश केला. आणि मग शिवाबरोबर ब्रम्हा, विष्णूही तेथे वास करून राहिले. असेही सांगितले जाते.
ऐतिहासिक दृष्ट्याही ओंकारेश्वराचे महत्त्व अबाधित आहे. महाप्रतापी पहिले बाजीराव यांचा ओंकारेश्वराजवळील रावेरखेडी येथे विषमज्वराने अंत झाला.
अशाप्रकारे धार्मिक, ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे असलेले नर्मदाकाठचे हे निसर्गरम्य ठिकाण खरोखरच पहाण्यासारखे आहे.