लोणार सरोवर 

भारतातील महाराष्ट्र राज्यात बुलढाणा जिल्हा हा लोणार सरोवरासाठी प्रसिद्ध आहे. सन १९७० पर्यंत 'ज्वालामुखीचे मुख' म्हणून ओळखले जाणारे हे सरोवर जगातील एकमेव असे अशनीपात विवर म्हणून आता जगभरात प्रसिद्ध झाले आहे. सन १९७०मध्ये नील आर्मस्ट्राँगने चंद्रावरील खडकांचे जे नमुने पृथ्वीवर आणले त्यांचे साम्य या सरोवरातील खडकांशी असल्याचे आढळून आले आहे. शास्त्रज्ञांच्या मते फारफार वर्षापूर्वी २० लाख टन वजनाचा एक प्रचंड अशनी जवळजवळ प्रती सेकंद २० कि. मी. वेगाने पृथ्वीच्या दिशेने आला. आणि १७ अंश कोनातून पृथ्वीच्या पोटात शिरला. त्यामुळे ५०० मीटर  खोल, १८५० मीटर  दक्षिणोत्तर व्यास आणि १७६० मीटर पूर्व पश्चिम व्यास असलेला असा अंडाकृती  खड्डा भूपृष्ठावर पडला. तेच हे लोणारचे सरोवर. याच्या तळाशी खार्‍या पाण्याचे सरोवर आहे. पण सरोवराजवळ काही अंतरावरील खड्ड्यात मात्र गोड पाणी आढळते. या सरोवराच्या आजुबाजुला  सर्वत्र वाळू आणि वने
आढळतात. याच्या परिसरात अनेक मौल्यवान दगड , चुंबकीय खडक, स्फटीके आढळतात. येथे ओझोन वायु मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. या सरोवराचे पाणी औषधी आहे. त्यात अनेक प्रकारचे क्षार मिसळलेले असून ते त्वचारोगावर गुणकारी औषध आहे;  असे म्हटले जाते. सरोवराच्या आजुबाजुच्या परिसरात औषधी झाडेही विपुल प्रमाणात आहेत.
       रामायणात "पंचाप्सर सरोवर" म्हणून तर महाभारतात "पद्मसरोवर" म्हणून या लोणार सरोवराचा उल्लेख आहे. तसेच लीळाचरित्रात "तारातीर्थ" या नावाने या सरोवराला संबोधिले आहे. पद्मपुराण, स्कंदपुराण  यामध्येही या लोणार सरोवरासंबधीच्या कथा आहेत. थोडक्यात फार प्राचीन काळापासून मानव संस्कृतीचे अस्तित्व तेथे असून त्याला तीर्थ क्षेत्राचे महत्त्व होते. अनेक देव, ऋषीमुनींनी येथे तप केल्याच्या कथा आहेत. महानुभव संप्रदायाचे संस्थापक चक्रधर स्वामीही याठिकाणी वास्तव्याला होते. विविध माहितीसंबंधीचे शिलालेखही तेथे आहेत.
    लोणार सरोवराच्या परिसरात चालुक्य, होयसाळ,  राष्ट्रकूट  तसेच यादवकालीन अशी अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी "दैत्यसूदन मंदीर" हे विदर्भातील सर्वात मोठे असे सुंदर मंदिर आहे. चालुक्य राजा सहावा विक्रमादित्य याच्या पूर्णादेवी नावाच्या पत्नीने ते अकराव्या शतकात बांधलेले आहे. ते सुमारे १०५ फूट लांब, व ९५ फूट रूंद असे आहे.याचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून दोन बाजुला उपमंडप आणि समोर मुख्य मंडप अशी याची रचना आहे. शिवाय सप्तस्तराचा व्हरांडाही त्याला आहे. याच्या भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे उखडून पुन्हा दुसर्‍या ठिकाणी जसे आहे तसे उभे करता येते.
   विवराच्या आत पद्मावती देवीचे मंदीर, पापहरेश्वराचे मंदीर, कुमारेश्वर मंदीर आहे. याच ठिकाणी निद्रायोगातील हनुमंताची मूर्ती पहायला मिळते. ती चुंबकीत खडकापासून तयार केलेली आहे. तसेच एका बाजुचे पाणी खारे व एका बाजुचे पाणी गोडे असलेली एक विहीरही आहे. सभामंडपात अष्टदिक्पाल असलेली शुक्राचार्यांची वेधशाळाही येथे पहायला मिळते. येथील याज्ञवल्केश्वराचे मंदीर, भस्मटेकडी, रामगया, सीतान्हाणी, विष्णूगया, अनेक शिवमंदिरे, स्मारके, कुंडे, शिलालेख हे सारेच पहाण्यासारखे आहे.