मदर्स डे आणि भारतीय परंपरा 

मे महिन्याचा दुसरा रविवार हा पाश्चिमात्य देशात "मदर्स डे" म्हणून साजरा केला जातो. अनेक पाश्चिमात्य चालिरितींचे अंधानुकरण करणारे भारतीयही आज भारतात 'मदर्स डे'ची प्रथा रूढ करू पहात आहेत. आईबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याच्या या दिवशी अनेकानेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. खरतर आपल्या भारतात अगदि पुरातन काळापासून आईला मानाचे स्थान दिले गेले आहे. 'मातृदेवो भव |' असे म्हणून मातेला ईश्वराचे रूप मानले आहे. इतकच नाही तर परमेश्वरालाच आपण "माता", "माऊली" असे म्हणून हाक मारतो. पंढरीचे वारकरी 'विठाई माऊली' म्हणत विठ्ठलाकडे धाव घेतात. तर रामदासी लोक 'आई जगदंबे' असा पुकरा करून आपल्या कार्याची सुरूवात करतात. शिवरायांनी भवानी देवीला माता मानले तर विवेकानंद कालीमातेला शरण गेले. अशाप्रकारे सर्वच भक्तांनी आपल्या मनातल्या ईश्वराला ' माता ' हा शब्द योजला असल्याचे आपल्या निदर्शनास येईल
          " न मातु: परदैवतम | " असे आईचे वर्णन केले जाते. मातेला तीन प्रदक्षिणा घातल्याने पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते, अशी भारतीय परंपरा सांगते. कोणतही कार्य करताना आईला प्रथम वंदन केले जाते. तिचा आशीर्वाद घेतल्याविना कार्याला सुरूवात होतच नाही. सर्व संकट तरून जाण्यास मदत करते ती माता. तिच्या प्रेमाने, आशीर्वादाने भवसागर पार करून जाण्याचे अपार सामर्थ्य व्यक्तीला प्राप्त होते.
         भारतीय संस्कृती मातृप्रधान संस्कृती आहे आणि म्हणूनच केवळ जन्मदात्रीलाच 'माता' असे न संबोधता; जीवन जगत असताना ज्यांच्या ज्यांच्याकडून आपण पोसले जातो त्या सर्वांना भारतीय संस्कृतीत मातेचे स्थान दिले आहे. पहिले नऊ महिने आईच्या उदरात तिच्या अन्नरसावर मूल पोसले जाते. नऊ महिन्यानंतर या जगात पाऊल ठेवल्यावर त्या जन्मदात्रीच्या दुधावर आपल पोषण होत. हळूहळू आपण मोठे होतो, मग गायीच्या दुधाने आपली भूक भागवली जाते. गाय ही आपली दुसरी माता. आणि म्हणून गायीला " गोमाता " असे संबोधले जाते.केवळ या गोमातेच्या दुधावर आपला पिंड पोसला जातो अस नाही तर मग त्या दुधापासून विविध पदार्थ तयार करून आपण आपल्या जीभेचे चोजलेही पुरवतो. गायीच दूध, दुधाची साय, सायीच दही, दह्याच ताक, ताकाच लोणी, लोण्याच तूप, हे सारेच पदार्थ शरिराला बळकटी देणारे, आणि बुद्धिवर्धकही आहेत. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव वास करतात; असे भारतीय संस्कृती सांगते. याचे कारण गाय अनेकांगानी आपल्या उपयोगी पडते. तिचे केवळ दूधच नाही तर मलमूत्र, गोरोचन सारच औषधी आहे. अनेक रोगांपासून ती आपल्याला दूर ठेवते. म्हणूनच आपण भारतीय आपल्या घराशेजारीच या आपल्या दुसर्‍या मातेला रहाण्यासाठी गोठा नावाचे घर बांधून देतो.
    "समुद्रवसने देवि | पर्वत स्तनमंडले | विष्णूपत्नी नमस्तुभ्यं | पादस्पर्श क्षमस्व मे || " असे म्हणून आपण भारतीय जमिनीला वंदन करतो. कारण जमिनीला आपण माता मानले आहे. जमीन आपल्याला धरून ठेवते. म्हणूनच तिला 'धरा' असेही म्हणतात. जन्मदात्रीच्या आणि गायिच्या दुधावर पोसलेल्या या बळकट पिंडाला आता अन्न पुरवण्याची जबाबदारी ही धरणीमाता घेते. नानाप्रकारची अन्नधान्ये, औषधी वनस्पती, विविध प्रकारची फुले फळे आपल्यामधून उपजवून ती आपली भूक भागवते. छोट्यामोठ्या झर्‍यांना, नद्यांना वाट देऊन आपली तहान भागवते. त्याचबरोबर अनेक खनिजही ही भूमाताच आपल्याला देते. अन्न-पाण्याबरोबरच वस्त्र आणि निवाराही या भूमातेच्या कृपेनेच आपल्याला मिळतो. घर बांधताना, शेती करताना आपण तिची पूजा करतो ते तिचे ॠण फार मोठे आहे म्ह्णूनच .
                     जन्मदात्री माता, गोमता, आणि भूमाता याबरोबरच आपली चौथी माता आहे ती नदी. "लोकमाता" असा उल्लेख करून तिची पूजा केली जाते. धरणीमातेबरोबर हातात हात घालून अन्नधान्य निर्माण करणारी, आपली तहान भागवण्यास पुढाकार घेणारी; ही लोकमाता आपल्या स्वच्छतेची काळ्जीही घेते. आपले शरीर, आपले कपडे, आपली भांडी आणि आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लागणारे पाणी पुरवण्याची जबाबदारी या लोकमातेचीच. "गंगेच  यमुने चैव गोदावरि सरस्वति | नर्मदे सिंधु कावेरि जले अस्मिन सन्निधिं कुरु ||" असे म्हणून आपण नित्य या लोकमातेचे स्मरण करतो.
"जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी | " असे म्हणणारे भारतीय आपल्या देशालाच "भारतमाता" म्हणून संबोधतो. आणि तिच्या रक्षणासाठी प्राणांचेही बलिदान करण्यास हसत हसत तयार होतो.स्वातंत्र्यपूर्वकाळात अनेक देशभक्तांनी हा आदर्श आम्हापुढे ठेवला आहे. विनोबा भावे यांनी तर ज्यातील विचरांनी त्यांना घडविले त्या गिताईलाच आई मानले. "गिताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता" अशा शब्दात त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.
                  अशाप्रकारे भारतात शारीरिक तसेच मानसिक बळ देऊन जीवननौका भवसागरातून तरून नेण्यास ज्यांचा ज्यांचा हतभार लागतो; त्या सजीव-निर्जीव अनेक घटकांना "माता" म्हणून संबोधले जाते आणि प्रसंगानुरूप अनेक सणसमारंभातून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्तही केली जाते. आणि म्हणून आता मदर्स डे साजरा करताना या सर्वच मातांचा एकत्रितपणे स्मरण करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन केले जावे.