वर्ल्ड अर्थ डे किंवा वसुंधरा दिवस 

पृथ्वीवरील पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार याची आठवण आपल्याला २२ एप्रिलला साजरा केला जाणारा ''वर्ल्ड अर्थ डे'' करून देतो. विविध प्रकारच्या वृक्षवल्ली, त्यावर लगडलेली नाना रंग,वास आणि स्वादाने युक्त अशी फळे-फुले, उंच उंच पर्वत, विशालकाय सागर, आणि त्यांना जाऊन मिळणर्‍या नद्या, मौलिक खनिजांनी युक्त अशी धरित्री, आणि अनेक वायुमंडलाने वेष्टिलेली अशी ही आपली पृथ्वी. अशा या पृथ्वीवर अनेक वर्ष अगदी डोळ्यांनाही दिसणार नाहीत असे अगदी  सूक्ष्मजीवांपासून विशालकाय प्राणी वास्तव्य करून आहेत. परंतु आज लोकसंख्यावाढ, अफाट वृक्षतोड, प्रदूषण, यासारख्या अनेक मानवनिर्मित कारणांनी पृथ्वीच्या पर्यावरणाची हानी होत आहे.या पर्यावरण र्‍हासामुळे सजीवांच्या अनेक जाती-प्रजाती  नष्ट होत आहेत. मानवाने आपल्या हुशारीने स्वतःच्या सुखासीन जीवनासाठी लावलेले शोध, आणि मानवाचा मानवेतर पृथ्वीवासीयांबाबतचा बेजबाबदारपणाच या पृथ्वीच्या हानीला कारणीभूत आहे. तेंव्हा मानवाने आता आपल्याच हुशारीने पृथ्वीचे झालेले अतोनात नुकसान भरून देणे आवश्यक आहे;  हे सांगणारा दिवस म्हणजे वसुंधरा दिवस. आपल्याच सुखाच्या मागे धावणार्‍या मानवाला जागृत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
२२ एप्रिल सन १९७० मध्ये गेलार्ड नेल्सन यांनी अमेरिकेत पहिला अर्थ डे साजरा केला. आणि त्यानिमित्ताने पृथ्वीवर निर्माण होणार्‍या धोक्यांची अमेरिकन बांधवांना जाणीव करून दिली. याच दिवशी चीन, अमेरिका आणि रशियातील काही गिर्यारोहक तुकड्या एव्हरेस्टवर गेल्या आणि तेथील कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली. म्हणून संयुक्त राष्ट्र्संघाने २२ एप्रिल हा दिवस वर्ल्ड अर्थ डे म्हणून साजरा करण्याचे ठरविले.