सुखी जीवनासाठी पर्यावरण रक्षण 

आज पृथ्वीवरील वातावरणातील बदलामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे याच मुख्य कारण आपण पर्यावरणाकडे केलेले दुर्लक्ष. शहरतील प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अमर्याद उपसा, शहरातील वाहनांचे वाढते प्रमाण हे पर्यावरण शुद्ध राखण्यास घातक ठरत आहे. जल,वायु,ध्वनी यांचे प्रदुषण तर पर्यावरणाला मारकच आहे. म्हणून आता शहरीकरण करताना निसर्ग साखळी कोठे तुटली जात नाही ना याचा विचार होणे गरजेचे आहे.कारण कितीही सुधारणा झाल्या तरी पर्यावरणाचा समतोल टिकला नाही तर त्यांचा काहीच उपयोग होणार नाही.
          निसर्ग आणि मानव यांचे सहजीवन अगदी प्राचीन काळापासून  आहे. आपल्या ऋषीमुनिंनी ते  ऑळखल त्याचा अभ्यास केला. आणि विविध मार्गानी टिकविण्याचा प्रयत्नही त्यांनी वर्षानुवर्षे केला.
 पण औध्योगिक क्रांतीनंतर मात्र माणूस निसर्गापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू लागला. निसर्गापासून दूर जाऊन निसर्गावर मात करण्याचे अनेक क्षेत्रातील मानवाचे प्रयत्न मानवाला पर्यावरणापासून दूर नेत आहेत. आपण निसर्गापासून वेगळे आहोत; ही मानवाची भावनाच मुळी चुकीची आहे. माणसाने निसर्गावर हल्ले चढवले; तर निसर्ग कसा स्वस्थ बसेल ? भूकंप ,महापूर दुष्काळ ज्वालामुखी उद्रेक, त्सुनामी, अतिवृष्टी किंवा कमी वृष्टी अशा अनेक हत्यारांनी निसर्गही आपल्यावर हल्ले चढवतच आहे. ती नैसर्गिक आक्रमणे परतवून लावयची असतील तर निसर्गाशी हातमिळवणी करून त्याचा ढळलेला समतोल जैसेथे करण्यात मानवानेच पुढकार घेणे गरजेचे आहे.. पुढच्या पिढीसाठी तरी आपण पर्यावरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
                  पृथ्वीवर केवळ मनुष्यच एकटा सजीव आहे आणि या पृथ्वीवरील सर्व उपभोग्य वस्तूंचा उपभोग घेण्याचा अधिकार केवळ मानवाचाच आहे; हा स्वार्थी विचार बाजुला ठेऊन वृक्ष, प्राणी, पक्षी यांचे नैसर्गिकपणे जगण्याचे हक्क आपण त्यांना परत दिले पाहिजेत. त्यांची वाढ होण्यास मदत केली पाहिजे. 'जगा आणि जगू द्या' हा मंत्र लक्षात घेऊन आपण आपली बदललेली जीवनपद्धती सुधारली पाहिजे.
आपली जीवन पद्धती बदलायची म्हणजे काय करायच? तर आपल्या नित्य जीवनात जितक प्रदुषण टाळता येईल तेवढ टाळायच. कचरा कमी करायचा. प्लॅस्टिकचा वापर टाळायचा. कापड, कागद यांचा वापर पुरेपूर करायचा. म्हणजे भारंभर कपडे घेणे टाळायचे. असलेल्या कपड्यांचा जास्तीत जास्त वापर करायचा. कपडे फाटले तरी त्याच्या चांगल्या धडधाकट भागातून पिशव्या, दुपटी, पायपुसणी यासाठी वापर करायचा. अन्नपदार्थ वाया जाणार नाहीत याची काळजी घ्यायची. आवश्यक तेवढेच पदार्थ शिजवायचे.  भाज्यांची देठे ,साली यांचा वापर खतासाठी करायचा. कागदाचही तेच. आवयक तेथेच कगद वापरायचा. खराब झालेल्या कागदाचाही उपयोग करता येईल तेवढा करायचा. थोडक्यात गरजा कमी करायच्या. मग कचरा आपोआप कमी होईल. कचरा कमी झाला की हवेचे, पाण्याचे प्रदुषण कमी होईल निसर्ग संपत्तीचा अनावश्यक वापर कमी झाला की पर्यावरणाचा समतोल टिकून राहील. वीजबचत, इंधन बचत ,पाण्याची बचत यासाठीही विविध पर्याय शोधले पाहिजेत. सांडपाण्याचा योग्य वापर करण्यानेही योग्य पर्यावरण टिकवून ठेवण्यास मदत होईल.मुळात निसर्गाने आपल्या व्यवस्थेत पर्यावरणाचा समतोल ढळू नये याची काळजी अगोदरच घेतली आहे. त्याने कार्बन-डया- ऑक्साइड सोडणारे प्राणी पक्षी जसे निर्माण केले तसेच तो कार्बन-डाय- ऑक्साइड शोषणार्‍या वनस्पतीही निर्माण केल्या आणि ऑक्सिजन बाहेर टाकणार्‍या वनस्प्तींबरोबरच कार्बन-डाय ऑक्साइड घेणारे सजीवही निर्माण केले. अगदी कचर्‍यावर उदरनिर्वाह करणारे, मृत पक्षी खाणारे पशू पक्षीही निर्माण केले. वाळलेली पाने, फुले,यांचा उपयोग आपोआपच झाडांना खतासाठी होतानाआपण पहातो. निसर्ग योजनांचा आपण मनापासून अभ्यास केला तर पर्यावरण संतुलित राखण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केलेले दिसून येतात. आपण मानवच त्यात ढवळाढवळ करून सगळी निसर्ग व्यवस्था बिघडवत आहोत आणि अनेक संकटे ओढवून घेत आहोत.
                                म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातच पर्यावरणाचा जाणीवपूर्वक विचार होणे गरजेचे आहे. आज कारण कोणतेही असो पण वैश्विक तापमानात वाढ होत आहे. त्याचा परिणाम जीवनाच्या सर्व क्षेत्रात दिसून येत आहे. ॠतू बदलले, अन्नधान्य,भाजीपाला, फळफळावळ आदि अनेक गोष्टींमध्येही त्यामुळे बदल झाले. नवेनवे रोग, आजार यांचेही प्रमाण वाढले. जमिनीतही फरक दिसून येऊ लागला. तिचा कस कमी झाला. या सगळ्याचा विचार करून नवे उद्योग नवे व्यवसाय, नवे शेती तंत्र विकसित करणे आवश्यक आहे. पण जी काही निर्मिती करायची त्यातून पर्यावरणाला धोका तर पोहोचणार नाही ना हे प्रथम पाहिले पाहिजे. आणि त्यादृष्टीने निर्मितीबरोबरच पर्यावरण समतोल राखण्याची तजवीजही केली पाहिजे.पण त्यातही स्वार्थ बाजुला सारून पर्यावरणाचा विचार आधी व्हावा हे सांगण्याची गरज आता मला वाटत नाही. कारण पर्यावरण शुद्ध , तर आरोग्य स्वस्थ आणि स्वस्थ आरोग्यच सुखी जीवनाचा मंत्र आहे.