मदर्स डे 

 मे महिन्याचा दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. मदर्स डे ही खरतर पाश्चिमात्यांची कल्पना. सन १८७२ पासून अमेरिकेत मदर्स डे साजरा करण्याची पद्धत प्रचलित आहे. ज्युलिया हार्वे यांनी बोस्टनमध्ये शांतता प्रीत्यर्थ हा दिवस साजरा करण्याची प्रथा रूढ केली. इंग्लंडमध्ये "मदरिंग संडे" म्हणून सन १६००च्या दरम्यान साजरा केला जात असल्याचा उल्लेख आढळतो. श्रीमंतांच्या घरी राहून चाकरी करणारी मुले  या दिवशी आपल्या आईला भेटायला आपल्या स्वतःच्या घरी जात असत. तर ग्रीसमध्ये "रिया" नावाच्या जननाच्या देवतेच्या सन्मानार्थ मदर्स डे साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्माच्या प्रसारानंतर युरोपमध्ये युरोपियनांची जीवनदात्री, रक्षणकर्ती अशा मदरचर्चला अभिवादन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सन १९०७ मध्ये अ‍ॅना जार्विस या महिलेने राष्ट्रीय स्तरावर हा दिवस साजरा केला जावा म्हणून फिलाडेल्फिया येथे खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी घरोघरी आपल्या आईच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले.