कवी नारायण सुर्वे 

कवी नारायण सुर्वे यांचीजीवनकहाणी वाचून "विधात्याची लीला अगाध आहे" असे म्हणून त्या विश्वनियंत्यापुढे मी पूर्ण नतमस्तक झाले. एका अभागी मातेने कचर्‍याच्या कुंडीत टाकलेले हे  छोटेसे पोर " घालीन मी सार्‍या ब्रम्हांडाच्या पाठी | सोडविन गाठी दिक्कालाच्या |" असे म्हणत मोठ्या मस्तीत वाढले. नुसतेच वाढले नाही तर अनेक मानसन्मान त्यांनी मिळवले. स्वतः झगडत झगडत जीवन जगले आणि अशा अनेक झगडणार्‍यांना त्यांनी मार्ग दाखवला. दोन वेळा सोवियत युनियनचा प्रवास करून आले. मॉरिशसलाही भेट दिली. सोवियत युनियनकडून " माझे विद्यापीठ " या आपल्या काव्यसंग्रहाला "नेहरू पारितोषिकही मिळवले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा "जनस्थान पुरस्कार", मध्यप्रदेश सरकारचा " संत कबीर पुरस्कार ", महाराष्ट्र फाऊडेंशनचा "गौरव पुरस्कार", कर्‍हाड साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे दोन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांबरोबरच भारत सरकारचा "पद्मश्री" पुरस्कार त्यांनी मिळवला. प्रथम कामगार साहित्य संमेलन तसेच १९९५ चे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. समाजकार्यासाठी " प्रगत प्रतिष्ठानची स्थापना केली. त्यांच्या साहित्याचे भारतीय व जागतिक भाषांमध्ये अनुवादही झाले. त्यांच्या कविता जशा बालवाडीत गायल्या जातात तशाच एम. फिल., पी. एच. डी. साठीही अभ्यासल्या जातात. त्यांच्या कवितांवर अनेक प्रयोग झाले. त्यांच्या कवितांची गाणी झाली. गाण्यंतून नृत्यनाट्य अवतरले. स्वतः सुर्वे सरांनी आपल्या कवितांचे गवोगाव वाचनाचे कार्यक्रम केले. त्या कर्यक्रमांनाही रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यांच्या कवितांच्या ध्वनीफितीही निघाल्या. त्यांच्या जीवनावर " नारायण गंगाराम सुर्वे " नावाचा माहितीपटही निघाला. आणि कौतुक म्हणजे त्या माहितीपटाला राष्ट्रीय पातळीवरचा प्रथम पुरस्कारही प्राप्त झाला. त्यांच्या कवितेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे "झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले गेले". आणि म्हणूनच त्यांचे आयुष्य अनुभव संपन्न बनले. कसा घडला हा दैवी चमत्कार?
" ना घर होते ना गणगोत | चालेन तेवढी पायाखालची जमीन होती | " अशा काव्यपंक्ती लिहिणारे सुर्वे खरोखरच अनाथ होते. सन १९२६ मध्ये एका गंगाराम सुर्वे नावाच्या मुंबईतील चिंचपोकळी भागातील गिरणीकामगाराला कापडगिरणीसमोर  टाकलेले तान्हे मूल आढळले.  त्यांनी त्या अनाथ मुलाला उचलून आपल्या परळच्या बोगद्याच्या चाळीतील घरात आणले. गंगाराम सुर्वे यांची पत्नी काशीबाई हीसुद्धा गिरणीकामगारच होती. तिने पोटच्या मुलाप्रमाणे त्या अनाथ मुलाला प्रेम दिले. आणि नारायण गंगाराम सुर्वे हे नावही दिले. त्याला लिहिता वाचता यावे म्हणून दादर,अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत घातले. नारायण सुर्वे सन १९३६ मध्ये इयत्ता चौथी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर गंगाराम सुर्वे निवृत्त झाल्याने  कोकणात निघून गेले. आणि नारायण सुर्वे पुन्हा अनाथ झाले. जवळ होते चौथीपर्यंतचे शिक्षण आणि गंगाराम सुर्वे यांनी जाताना दिलेले दहा रुपये.
मग हा नारायण पोटापाण्यासाठी कामाला लागला. कधी हरकाम्या, कधी घरगडी म्हणून तर कधी हॉटेलात कपबशी विसळणारा पोर्‍या म्हणून काम केले.कधी कोणाची मुले सांभाळली तर कधी दूध पोहोचविण्याचे काम केले. मग गोदरेजमध्ये कारखान्यात पत्रे उचलण्याचे काम केले तर टाटा ऑइल मिलमध्ये हमाली केली. कधी गिरणीत धागा धरला तर कधी बॉबिन भरली. असे करता करता त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली. सन १९५७ मध्ये ते व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा उत्तीर्ण झाले.त्यानंतर सन १९५९ मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षकाची सनद मिळवली. आणि नंतर सन १९६१ मध्ये नायगावच्या महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. आता त्यांना "सुर्वे मास्तर" म्हणून नवी ओळ्ख मिळाली.
सुर्वे सरांचे सारे आयुष्य गिरणगावात गेले. या गिरणगावानेच 'जगाव कस' हे त्यांना शिकवले.मिलमध्ये काम करत असताना युनियनच्या ओफिसमध्ये झाडूवाल्याच काम त्यांना मिळाल होत. त्यांच्या रहाण्याची सोयही तेथेच केली होती. स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या त्या काळात गिरणी कामगारही आपल्या मागण्यांसाठी कॉ. श्रीपाद डांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत होते. सुर्वे सरांच्या भोवताली साम्यवादाचेच वातावरण होते. कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाची गोडी याच काळात त्यांना लागली. या सम्यवादानेच त्यांच्या विचारांना एक निश्चित दिशा दिली. कार्ल मार्क्स त्यांना या गिरणगावातच भेटला. ते कम्युनिस्ट चळवळीत "रेड गार्ड" म्हणून काम करू लागले. नाविकांच्या बंडात ते रस्त्यावर उतरले. पुढे स्वातंत्र्य आंदोलनात "पीपल्स व्हॉलेंटियर ब्रिगेड" मध्येही सामील झाले. अनेक लाठ्याही झेलल्या. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात प्रचार करत गावोगाव फिरले. याच दिवसात त्यांच्या मनातील भावना ते शब्दात व्यक्त करू लागले. आपल्या चळवळीला आवश्यक त्या विचारांच्या कविता त्यांना सुचू लागल्या. चळवळीत काम करत असताना कॉ. तळेकर यांच्या भाचीवर त्यांचे प्रेम बसले. याच कृष्णा साळुंके नावाच्या मुलीबरोबर त्यांनी १९४८ मध्ये विवाह केला. खारजवळ एका झोपडीत त्यांनी आपला संसार थाटला.पुढे ते एका चाळीत राहू लागले पण दारिद्र्य काही त्यांना सोडून गेल नाही. कौटुंबिक समस्या ,अनेक व्याधी आर्थिक विवंचना, कर्जाचे डोंगर अशा सार्‍या दु:खांशी निर्भिडपणे झगडत जीवन जगत राहिले. एक लढवय्या क्रांतीकारी कवी म्हणून अमर झाले.