हरिहरेश्वर 

मुंबईपासून २१० कि.मी. अंतरावर हरिहरेश्वर हे सुरेख पर्यटन स्थळ आहे. सकाळी सहा वाजता निघालेली आमची सुमो सुमारे आठ साडे आठच्या दरम्यान वडखळ नाक्याला पोहोचली. तेथे मस्तपैकी चहा-नाश्ता
करून आम्ही माणगाव मार्गे "म्हसळा" या गावी आलो. तेथून एक फाटा दिवे आगरला जातो. दिवे आगर हे श्रीवर्धन तालुक्यातील एक छोटस गाव आहे. त्यठिकणी सन १९९७च्या डिसेंबर महिन्यात संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी एका बागायती जमिनीखाली श्री गणेशाची सुवर्ण प्रतिमा सापडली. ही प्रतिमा म्हणजे सोन्याचा मुखवटा असून तो एका बंद काचेच्या पेटीत छोट्याशा कौलारू देवळात ठेवलेला आहे. श्रींचे दर्शन घेऊन दिवेआगरापासून ३३ कि.मी. अंतरावर असलेल्या हरिहरेश्वर य तीर्थक्षक्षेत्राला भेट देण्यास निघालो.रस्त्याच्या एका बाजुला खडकाळ डोंगर तर दुसर्‍या बाजुला अथांग पसरलेला सागर. फार विलोभनीय दृश्य होत. एक-दोन मासेमारी होड्या समुद्रात दिसत होत्या. रस्त्यात उतरून आम्ही बरेचसे फोटो काढले. रस्त्याच्या कडेला सुके मासे वाळत घातलेले होते. आम्हा सारस्वतांना हवाहवासा वाटणारा मासळीचा सुगंध वातावरणात दरवळत होता.भरतीची वेळ असल्याने फेसाळत्या लाटा उन्हाने चमकत होत्या. हस्यविनोद करत गाडी श्रीवर्धनला जाऊन पोहोचली. तेथे श्री पलांडे यांच्या खानावळीत मस्त जेवण घेतले. त्याबरोबरच पोहा, बटाटा पापड, लोणची असे घरगुती पदार्थ विकत घेतले. आणि हरिहरेश्वरला रवाना झालो.
साधारण पाऊण तासात हरिहरेश्वर आले देखील. जेथे समुद्र संपतो तेथेच देऊळ सुरू होते. वाळूतच गाडी पार्क करून आम्ही देवळाकडे पायी निघालो. दुतर्फा असलेली प्रसादाची आणि निरनिराळ्या वस्तूंची दुकाने ओलांडून आम्ही देवळाच्या परिसरात प्रवेश केला. या देवळाची स्थापना अगस्ती ॠषींनी केली अशी माहिती तेथे मिळाली. ब्रम्हा, विष्णू, महेश आणि पार्वती लिंगरूपात तेथे असून समोर योगेश्वरीसहित काळभैरव देवालय आहे. येथे प्रदक्षिणा केवळ देवळाभोवती न घालता हरिहरेश्वराच्या संपूर्ण डोंगराभोवती प्रक्षिणा घालता येते. प्र्दक्षिणेच्या दरम्यान शुक्लतीर्थ हे एक प्रमुख तीर्थ आहे त्यामध्ये स्नान केल्यावर शुद्धी मिळते असे म्हणतात. तर पांडवतीर्थावर श्राद्धकर्म केली जातात. याचबरोबर गायत्रीकुंड, चक्रतीर्थ, गौरीकुंड, अशीही तीर्थ आहेत. तसेच येथे हरीहर, हर्षनाचल, ब्रम्हादी व पुष्पादी असे डोंगर आहेत.
देवळाच्या परिसरात प्रवेश केला की उजव्या हाताला गणपती मंदीर व हनुमान मंदीर आहे. तेथेच ब्रह्मकूप आहे. मान उंच करायला लावणारी दीपमाळ आहे. पायर्‍या उतरून आलो की देवळाचा मंडप लागतो. मंडपात प्रवेश करताना डाव्या हाताला देवळाचे कार्यालय आहे. कार्यालयात सर्व माहिती पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. डाव्या हाताला हरिहरेश्वराचे मंदीर व काळवैभवाचे मंदीर आहे. दोन्ही देवळामध्ये रिकामी जागा आहे. प्रथम काळभैरव व योगीश्वरीचे दर्शन घेऊन मगच हरिहरेश्वराच्या देवळात प्रवेश करण्याची प्रथा आहे. काळ्भैरवाचे देऊळ जुन्या पद्धतीचे आहे. तेथे ओटी भरून आम्ही हरिहरेश्वराच्या देवळासमोर आलो. देवळासमोरच मोठा नंदी आहे. त्यासमोर खोलगट जागेत भल्यामोठ्या शिवलिंगावर नागाची फणा आहे. व लिंगरूपात ब्रम्हा, विष्णू, महेश, पार्वती आहेत. समोरच्या मोठ्या आरशात या सर्व देवतांच्या प्रतिमा दिसतात. देवळाच्या भिंतीवर देवादिकांच्या जुन्या मूर्ती आहेत. दर्शन घेतल्यावर पुन्हा बाहेर आपण सभामंडपात येतो. मंडपात बसण्यासाठी बाके आहेत. भरतीच्या वेळी समुद्र अगदी देवळापर्यंत येतो.
देवळाच्या बाजुनेच प्रदक्षिणेला जाण्याचा मार्ग आहे. खडकाळ डोंगरातून पायर्‍यापायर्‍यांचा हा मार्ग आहे. सुरुवातीला उंच चढून गेल्यावर एका ठिकाणांहून या पायर्‍या खाली उतरलेल्या दिसतात. आणि त्या एकदम समुद्राच्या बाजुला जाऊन संपतात. म्हणजे ही संपूर्ण प्रदक्षिणा समुद्रातूनच आहे. गंमत म्हणजे दोन डोंगरामधून समुद्राच्या दिशेने पायर्‍या उतरताना आपण स्वर्गाच्या दारातून पाताळात बघत नाही ना आसा भास होतो. तेथून समुद्राचे अविस्मरणीय दर्शन होते. नजर स्थिरावेल तेथपर्यंत पाणीच पाणी दिसते. खाली उतरून पाय ठेवावा तर पायाला टोचणारे खडक,बाजुच्या डोंगरावर सतत पाणी आपटून तयार झालेली जाळीदार नक्षी, सारेच अगम्य गूढ वाटते. समुद्र गुहा म्हणजे काय ते पहायचे असेल तर हरिहरेश्वराची सहल करावीच. पायाखाली समुद्रातले खडक, एका बाजुला नक्षीचे डोंगर, आणि दुसर्‍या बाजुला अथांग पसरलेला समुद्र, अशा थाटात प्रदक्षिणा घालायला खूप मजा येते. थोड पुढे चालून गेल्यावर पायाखाली मोठी दोन पावले असल्याचे जाणवते. ते विष्णूपद स्थान. त्यापुढे गेले की "स्वर्गाचे दार" असे लिहिलेले आहे. तेथे गोड्या पाण्याचा छोटसा झरा आपल्याला आश्चर्याचा धक्का देतो. त्याहून पुढे गेले की मोठ्या कासवाच्या आकाराचा एक खडक दिसतो. त्यापुढे पांडव तीर्थ आहे. तेथे श्राद्धादि कर्मे केली जातात. पिंडदानही केले जाते. तेथून पुढे थोड वर चालून गेलो की आपण पुन्हा देवळात पोहचतो. अनेक भौगोलिक,नैसर्गिक चमत्कृतींनी नटलेला तो परिसर पाहून परमेश्वराच्या अगाध लीलेच कौतुक वाटते.