उपवास 

आपल्या दैनंदिन आहारातून आपल्याला शारीरिक, मानसिक शक्ती प्राप्त होत असते. आहारामुळेच बौद्धिक क्षमता वाढते. व्यक्तिमत्व विकास होतो. अंगी तत्परता येते. अन्नामुळेच निरोगी, आरोग्यमय दीर्घायु जीवन प्राप्त होते. थोडक्यात आहाराचा उद्देश शरिराचे पोषण, वाढ, विकास हाच आहे. परंतु काहीवेळा शरिरात विजातीय पदार्थांची वाढ होऊन शरीर दुषित बनते. रक्तातील व शरिरातील क्षार तसेच आम्ल धर्मीयतेचे प्रमाण असंतुलित होते. शरिरात रोगाचा प्रादुर्भाव होतो. इंद्रिय, मन तसेच बुद्धी यांचे  असंतुलन होते. आणि मग शरीर शुद्धीसाठी उपवास किंवा लंघनाची आवश्यकता भासू लागते.
  आपल्या आयुर्वेदात " लंघनं परमौषधम | " असे म्हटले आहे. जैन धर्म तर लंघनावरच आधारित आहे. शरिराला अंतर्बाह्य आराम करण्याची गरज जाणवू लगली की; काही खाण्याची इच्छा आपोआपच नष्ट होते. आणि मग मनुष्य उपवासाकडे वळतो. प्राण्यांमध्येसुद्धा लंघन ही निसर्गदत्त प्रेरणा दिसून येते. अर्थात उपवास आणि उपासमार यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. अन्न हवे असूनही ते मिळत नाही तेंव्हा होते ती उपासमार. आणि अन्नाची शरीराला जरुरी नाही म्हणून केला जातो तो उपवास.  भूक लागली असताना अन्न मिळाले नाहि की उपासमार सुरू होते आणि मृत्यु हा उपासमारीचा अंत असतो. तर अन्न स्वतःहून वर्ज केल्यावर सुरू होऊन खरी भूक लागल्यावरसंपतो तो उपवास. उपासमारीत निरोगी पेशी पोषणाअभावी नष्ट होतात. आणि त्यामुळे शरीर क्षीण होत जाते. तर उपवासामुळे शरिरात साठलेले दूषित पदार्थ शरिराबाहेर टाकले जाऊन आरोग्य चांगले रहाते. म्हणूनच सार्‍या धर्मात उपवासाला महत्त्व दिले गेले आहे.
उपवसामुळे शरीर व मन दोन्ही शुद्ध होतात. सतत कार्यरत असणार्‍या पचनेंद्रियांना विश्रांती मिळते. शरिरात साठलेली अतिरिक्त चरबी, प्रोटिन्स, शर्करा यांचा वापर होऊन आपल्या जीवनक्रिया उपवास काळात चालू राहतात. यातूनच शरिरात साठलेले विजातीय पदार्थ बाहेर टाकले जातात. आणि रोग निर्मूलन होते. अर्थात उपवास काळात शरिराला पूर्ण विश्रांती मिळणे मात्र अत्यंत आवश्यक आहे.
  हा उपवास अनेक प्रकारे केला जातो. आपल्या शरिराला झेपेल अशा प्रकारे उपवास केला तर उपवासाच्या अनिष्ट परिणामांना तोंड द्यावे लागत नाही. केवळ सकाळचा नाश्ता बंद करून नियमित जेवण घेणे, हा एक प्रकार. एकभुक्त रहाणे म्हणजे केवळ एकाच वेळेला जेवणे हा दुसरा प्रकार. तर एका दिवसापासून खरी भूक लागेपर्यंत काही न खाणे हा तिसरा प्रकार. अशा अनेक प्रकाराने उपवास केला जातो. उपवास काळात घ्यावयाच्या आहारातही विविधता आढळून येते. कोणी एक आहार उपवास . म्हणजे केवळ पोळी किंवा भाकरी भाजी खाऊन उपवास करतात तर कोणी फळांचा रस, ताक, पाणी पिऊन उपवास करतात तर काही केवळ फलाहार घेतात. प्रत्येकाने आपल्या शरिराला झेपेल अशा प्रकारे उपवास केला आणि त्या काळात शरिराला संपूर्ण विश्रांती दिली तर उपवासाच्या अनिष्ट परिणामांना तोंड द्यावे लागणार नाही.