रेड क्रॉस डे 

स्वीत्झर्लंडमधील एका मोठ्या उद्योजक कुटुंबात ८ मे सन १८२८ मध्ये हेन्री ड्युनंट यांचा जन्म झाला. सन १८५९ मध्ये हेन्री आपल्या उद्योगधंद्याच्या निमित्ताने उत्तर इटलीमध्ये गेले होते. त्यावेळी सोल्फेरिनो या ठिकाणी अचानक दोन स्वार्थी पक्षांच्या उद्भवलेल्या लढ्यात हेन्री अडकले. आणि मग बंधुत्वाच्या नात्याने आठ दिवस तेथेच राहून युद्धातील जखमींची त्यांनी सेवा केली.त्यातील काही लोकांना वेदना सहन करण्यासाठी धीर दिला; तर काहींना त्यांनी औषधोपचारासाठी इतरत्र हलवले. युद्धक्षेत्रावरील लढवय्यांची हतबलता पाहून हेन्रीचे मन हेलावले. मानवांची ही शोकांतिका एका समकालीन वृत्तपत्रातून उजेडात आणण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि मग त्याचीच परिणती   Un Souvenir De Solferino ----- A Memoir  Of  Solferino या हृदय हेलावणार्‍या पुस्तकात झाली. सन १८५९ मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकामुळे उत्तर इटलीतील युद्धकालीन भयानक आणि अतिशय खराब परिस्थितीच वर्णन लोकांपुढे आल. त्यामुळे लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. अवघ्या चौतीसाव्या वर्षी हेन्री डुनंटला जगभर प्रसिद्धी मिळाली. या सार्‍या पार्श्वभूमीमुळे हेन्री डुनंटला युद्धकाळातील वेदनामय, दु:खद अशी परिस्थिती कमी करण्यासाठी काही पावले उचलण्यासाठी लोकांचे लक्ष वळविण्याची प्रेरणा मिळाली. आणि रेड क्रॉस या कल्पनेचा जन्म झाला.
सन १८६३ मध्ये जिनिव्हा येथिल आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हेन्री डुनंटच्या अनेक कल्पनांना मान्यता मिळून "रेडक्रॉस" या संघटनेचा जन्म झाला. जखमी सैनिक अणि रेडक्रॉसचे स्वयंसेवक यांना युद्धभूमीवर युद्धहल्ल्यापासून अलिप्त ठेवण्यात यावे; असे ठरवण्यात आले. तसेच प्रत्येक देशाला अशा स्वयंसेवक संघटना तयार करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. "रेडक्रॉसच्या स्वयंसेवकांनी युद्धकाळाबरोबरच अवर्षण, भूकंप आणि साथीचे आजार इत्यादि भीषण संकटात सापडलेल्या लोकांसाठीसुद्धा जास्तीत जास्त त्याग करण्यास सदैव तयार असले पाहिजे. " अशी कळकळीची विनंती हेन्री दुनंट रेडक्रॉस संघटना स्थापन करताना करत असत. अशाप्रकारे हेन्री ड्युनंट केवळ चार वर्षात "आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटना" स्थापन करण्यात यशस्वी झाले.
पण या सर्व धावपळीत आपल्या स्वतःच्या व्यवसायाकडे मात्र हेन्रीचे पूर्ण दुर्लक्ष झाले. साहजिकच अतोनात नुकसान होऊन हेन्री पूर्णतः निर्धन बनले. अशा परिस्थितीत पुन्हा आपल्या जन्मस्थळाकडे जायचे नाही असा त्यांनी निश्चय केला. जवळजवळ दहा वर्ष डुनंट अगदी भिकेकंगाल अवस्थेत कधी जर्मन तर कधी इटली आदि ठिकाणी भटकत राहिले. त्यानंतर सन १८८७ मध्ये स्वीत्झर्लंडमधील "हायडन" नावाच्या आरोग्य केंद्रात ते अचानकच बेशुद्धावस्थेत आणले गेले. औषोधोपचार करणार्‍या डॉक्टरांनी त्यांना त्यांचे नाव विचारले. आणि "हेन्रि डुनंट" हे शब्द ऐकताच डॉक्टर आश्चर्यचकित झाले. त्यानंतर डुनंटच्या नशिबाने "रेडक्रॉसची निर्मिती आणि वृद्धी" याविषयी जाणून घेण्याची इच्छा असलेल्या एका वार्ताहराशी डुनंटची भेट झाली. त्या वार्ताहराने त्यांची मुलाखत घेऊन ती ऑक्टोबर सन १९९५ मध्ये एका जर्मन वार्तापत्रात "Henri Dunant, the founder of the Red Cross"या शीर्षकाखाली प्रसिद्ध केली. आणि मग जगभरातून सहानुभूतीच्या शब्दांबरोबरच मदतीचा जबरदस्त ओघ सुरू झाला. त्या मदतगारांपैकीच स्वीडिश उद्योजक "अल्फ्रेड नोबेल'' हेही होते. त्यानी मानवतावादी डुनंटला सन १९०१चा शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानीत केले. त्यानंतर नऊ वर्षांनीम्हणजे ३० ऑक्टोबर १९१० मध्ये वयाच्या ८२व्या वर्षी हेन्रि डुनंट यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ ८मे हा डुनंटचा जन्म दिवस ''रेडक्रॉस डे" म्हणून साजरा केला जातो.