जागतिक परिचर्या दिन 

परिचर्येसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणार्‍या फ्लोरेंन्स नाईटिंगलचा जन्म दिवस "जागतिक परिचर्या दिन " म्हणून ओळखला जातो. १२ मे सन १८२० रोजी इटली येथे एका ब्रिटिश कुटुंबात फ्लोरेंन्स नाईटिंगलचा जन्म झाला. गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याचा ध्यास घेतलेल्या फ्लोरेंन्सने सन १८४५ मध्ये परिचारिका होण्याचा आपला निर्णय घोषित केला. आणि सन १९५१ मध्ये तिने जर्मनीमध्ये जाऊन चार महिन्याचे परिचारिकेचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सन १८५४ मध्ये फ्लोरेन्सला इतर३८ परिचरिकांबरोबर किमियन युद्धावर परिचर्या सेवा देण्यासाठी पाठवण्यात आले.त्याठिकाणी जवळजवळ दोन हजार रुग्णांवर उपचार करून मृत्युदर कमी करण्यात तिने यश मिळविले. रुग्णांच्या उपचारांचे अहवाल जपून ठेवणे, त्यांची आस्थेने विचारपूस करणे, रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देणे, पत्रव्यवहार करणे,इत्यादि अनेक कामे ती मोठ्या उत्साहाने करित असे. परिचारिका सेवांमधील सेवाभाव आणि प्रशासकीय कौशल्य यात फ्लोरेन्सने नाव कमावले. रात्री-अपरात्री रुग्णांकडे जाताना फ्लोरेन्स नेहमी आपल्याबरोबर दिवा घेऊन जात असे. म्हणूनच लोक तिला "लेडी विथ द लँप " या नावाने ओळखत असत. सन १८५७ मध्ये फ्लोरेन्स इंग्लंडला पोहोचली; तेंव्हा राणी व्हिक्टोरियानंतरची सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणून बी. बी. ची. ने फ्लोरेन्सचाच उल्लेख केला. १३ ऑगस्ट सन १९१० मध्ये लंडन येथे फ्लोरेन्सचे निधन झाले.
सन १८२० ते सन १९१० या नव्वद वर्षाच्या आपल्या आयुष्यातीलबहुमोल वर्ष फ्लोरेन्स नाईटिंगलने परिचर्येसाठी खर्च केली. आणि या व्यवसायाला एक शास्त्र म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. म्हणूनच "आधुनिक परिचर्या शास्त्राची आद्य प्रणोती " म्हणून फ्लोरेन्स नाईटिंगलचे नाव घेतले जाते. परिचर्या शास्त्राविषयीचे तिचे विचार आजही मार्गदर्शक ठरणारे असेच आहेत.