होळी 

मराठी वर्षाचा शेवटचा महीना फाल्गून. आणि वर्षातला शेवटचा ऋतू म्हणजे शिशिर ऋतू. वसंत ऋतूत नवजीवन प्राप्त झालेल्या सृष्टीचा वृद्धापकाळ म्हणजे शिशिर ऋतू. म्हणून फाल्गून हा पानगळतीचा महीना आहे. या पानगळतीमुळे निर्माण झालेला केरकचरा जाळून टाकून वसंत ऋतूच्या आगमनासाठी पर्यावरण स्वच्छ करणारा सण म्हणजे होळीचा सण. यालाच हुताशनी पौर्णिमा असे म्हणतात. आपल्या हिंदू धर्मात बरेचसे सण स्त्रियांचेच आहेत पण होळी हा खास पुरुषाचा सण मानला जातो. या दिवशी सायंकाळी  अंगण शेणाने सारवून रांगोळी घातली जाते. झाडाची सुकलेली पाने, फांद्या शेणाच्या गोवर्‍या एकत्र करून होळी तयार केली जाते. तिची पूजा करून ती पेटवली जाते. होळीला नारळ अर्पण केला जातो. तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. नाच गाण्याबरोबरच एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहून वर्षभरातील राग द्वेष मत्सर तसेच अन्य वाईट भावना होळीबरोबर जाळल्या जाऊन पर्यावरणाबरोबरच मनेही स्वच्छ केली जातात. दुसर्‍या दिवशी धुलिवंदन असते. जळालेल्या होळीतील राख, माती, रंग, एकमेकांच्या अंगाला फासून मनाबरोबरच शरीरही साफ केले जाते.
या सणाबद्दल काही कथाही प्रचलित आहेत.
१.]  कंसाने कृष्णाला मारण्यासाठी पाठवलेल्या पुतना राक्षसीणीचा कृष्णाने वध केला.आणि नंतर कृष्णाच्या सोबत्यांनी त्या राक्षसीणीला आगीत जाळून भस्मसात केले. या घटनेची आठवण म्हणूनही काही ठिकाणी होळी पेटवळी जाते.
२.]  हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूभक्त होता. आपल्या मुलाची ही विष्णूभक्ती हिरण्यकश्यपूला आवडत नव्हती.तेंव्हा द्वेशाने बुद्धीभ्रष्ट झालेल्या हिरण्यकश्यपूने "आगीमध्ये जळणार नाही." असा वर मिळालेल्या ढुंढा नावाच्या राक्षसीणीला प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन आगीत बसण्यास सांगितले. पण आश्चर्य म्हणजे त्या आगीत प्रल्हाद मरण्याऐवजी ढुंढा राक्षसीणच जळून खाक झाली. या घटनेची आठवण म्हणूनही होळी पेटवली जाते.