शनीशिंगणापूर 

महराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. त्यापैकी जगावेगळे देवस्थान म्हणून शनीशिंगणापूरचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यतील नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र शिंगणापूर हे एक वाडीवजा खेडेगाव आहे. या जगावेगळ्या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील लोक चांगले सधन आहेत; त्यांची घरे आधुनिक अशी सिमेंटची आहेत; पण या गावातील एकाही घराला चौकटी नाहीत. आणि खिडक्यांना झडपाही नाहीत .प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी लोक आपल्या घरांना केवळ पडदे किंवा ताटी लावतात.तसेच येथील सारी घरे एक मजलीच आहेत. गावातील कोणत्यही घरात कपाट सुटकेस आढळत नाहीच पण कोणत्याही घराला कडी कोयंडे , कुलुपे लावली जात नाहीत. अशा या वैशिष्ट्यपूर्ण गावातील शनैश्वर देवस्थानही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या देवस्थानातील शनिदेवाची काळी, पाच फूट नऊ इंच ऊंच आणि एक फूट सहा इंच रूंदीची मूर्ती बिगर मंदिराची, उघड्या पटांगणावरच उभी आहे. उन वारा पाऊस थंडी अशा कोणत्याही ऋतूमध्ये देवाच्या डोक्यावर कोणतेही छत्र नसते. या परिसराचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे सगळा उघडा कारभार असूनही या ठिकाणी कोठेही अजूनपर्यंत कधी चोरी झालेली नाही.
सुमारे दिडशे वर्षापूर्वी शिंगणापूर परिसरात मुसळधार पाऊस पडला आणि गावाजवळील 'पानसनाला' नावाच्या ओढ्याला महापूर आला. या महापूरात शनीमहाराजांची मूर्ती वहात आली आणि बोरीच्या झाडाला अडकून राहिली. गावातील लोकंनी ती मूर्ती उचलण्याच प्रयत्न केला पण ती जागची हलेना. दुसर्‍या दिवशी एका भाविकाला दृष्टान्त झाला की," नात्याने सख्ये मामा भाचे असलेल्या दोन व्यक्तींनी मला बोराटीच्या फासावर ठेऊन; दोन काळ्या रंगाच्या बैलांच्या सहाय्याने मला घेऊन जावे. आणि माझी प्राणप्रतिष्ठा देखील मामा भाच्यानीच करावी." या दृष्टांताप्रमाणे मूर्ती आणून साध्या चौथर्‍यावर तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पुढे काही काळानंतर मूर्तीच्या भोवती पंधरा फूट लांब ,पंधरा फूट रूंद व चार फूट उंच असा दगडी चौथरा बांधण्यात आला. व मूर्तीसमोर अहोरात्र जळणारा नंदादीप तेवत ठेवण्यात आला आहे. चौथर्‍याच्या पश्चिमेला एक मठ बांधला असून त्यात सर्व देवदेवतांच्या तसबिरी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच भाविकांकडून मिळालेल्या विविध वस्तूही येथेच ठेवण्यात आल्या आहेत. शनिदेवाच्या चौथर्‍याच्या नैऋत्य दिशेला ग्रामदेवता लक्ष्मीआई हिचे उत्तराभिमुख मंदिर आहे. आणि या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला संत उदासीबाबा यांची समाधी आहे. शनीदेवाच्या पूर्वेकडे पश्चिमाभिमुख असे दत्तप्रभूचे मंदिरही येथे आहे. या दत्तप्रभूच्या मंदिरात श्री शंकर व श्री विष्णू यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तर मठामध्ये विघ्नहर्त्या गजननाची मूर्ती विराजमान आहे.
स्वयंभू मूर्ती असलेले हे शनैश्वराचे देवस्थान एक जागृत देवस्थान आहे. मंदिरविरहित अशा या शनिदेवाचे दर्शन भाविकांना केंव्हाही घेता येते. स्त्रियांना मात्र देवाचे दर्शन चौथर्‍यावर जाऊन घेण्यास सक्त मनाई आहे. त्यांनी चौथर्‍याजवळून दर्शन घ्यावे असा नियम आहे आणि तो येथे कटाक्षाने पाळला जातो.