प्रेमचंद 

 हिंदी साहित्यतील कथा क्रांतीचे जनक म्हणून प्रेमचंद मुन्शी यांना ओळखले जाते. वास्तवतावादी लेखन करून हिंदी साहित्यात नवजीवन निर्माण करणार्‍या या साहित्यिकाचा जन्म बनारस जवळील 'लमही' नावाच्या गावी झाला. प्रेमचंदांचे खरे नाव 'धनपतराय' असे होते. प्रेमाने त्यांना 'नबाब' असेही म्हणत असत. प्रेमचंदांच्या आईचे नाव आनंदीदेवी व वडिलांचे नाव अजायबलाल असे होते. प्रेमचंद आठ वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे सावत्र आईच्या छळाला त्यांना तोंड द्यावे लागले. त्या काळातील रुढीप्रमाणे अवघ्या पंधराव्या वर्षी प्रेमचंदांचे लग्न झाले. पण पत्नीशी त्यांचे फारसे पटत नव्हते. वडिलांच्या अकाली मृत्युनंतर सार्‍या कुटुंबाची जबाबदारी प्रेमचंदांवर येऊन पडली. त्यामुळे आपल्या शिक्षणाबरोबरच त्यांनी शिकवण्याही घ्यायला सुरूवात केली. मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी अध्यापकाची नोकरि केली. सन १९०० मध्ये अलाहाबादला प्रेमचंदांची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली. याच काळात प्रेमचंद अलाहाबाद विद्यापीठातून उर्दू आणि हिंदी या दोन्ही विषयांची व्हर्नाक्युलर परीक्षा उत्तीर्ण झाले.
अशाप्रकारे स्वतःलाच जीवनातील संघर्षाला तोंड द्यावे लागलेल्या या साहित्यकाराने आपल्या कथांमधून जीवनातील निरनिराळ्या स्तरांवरील लोकांच्या तसेच ग्रामीण जीवनाच्या व्यथांचे चित्रण केले. समाजातील शेतकर्‍याचे आर्थिक दौर्बल्य, ग्रामीण जीवनातील अगतिकता, विधवा व वेश्यांची समस्या, समाजातील अन्याय, हिंदू व मुस्लिम एकता, जमीनदार तसेच पोलिसांचे अत्याचार, अंधश्रद्धा यांनी पोखरलेल्या समाजामध्ये माणूसकी व सभ्यतेच्या आचरणाची स्थापना करण्याचे महान कार्य प्रेमचंदांनी आपल्या साहित्याद्वारे केले.