शब्द सामर्थ्य 

लोकलमधून प्रवास करत होते. गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती. कुठलतरी स्टेशन आल; आणि बरीचशी गर्दी कमी झाली. तोच पाठीमागून आवाज आला, "थोड आत सरकता कां ?" चौथ्या सीटवरची बाई आर्जवत होती. बसलेल्या तिघी सुहास्य वदनाने थोड्याश्या आत सरकल्या. इतक्यात ,"अहो सरका की आत; काय पसरून बसल्या आहात!" अशा कर्कश्य आवाजाने मी दचकलेच. समोरच्या सीटवरची बाई वैतागून बोलत होती.आणि बाजुच्या तिघी ढिम्म न हलता आपण त्या गावच्याच नव्हे अशा थाटात बसून राहिल्या होत्या. ती बाई त्यांना आत ढोसत होती आणि ढोसता  ढोसता शेवटी पराजित होऊन उभी राहिली. आणि तोंडाचा पट्टा अखंड चालू ढेऊन आपल्या स्टेशनला उतरून निघून गेली. नविन प्रवेशकर्ती बाई पुन्हा त्या तिघींजवळ आली "जरा सरकता कां ? असे नम्रपणे म्हणाली. तिघीही काहीही न बोलता थोड्याशा आत सरकल्या. आणि चौथी मिळालेल्या जागेवर स्वस्थ बसून प्रवास करू लागली. त्या प्रवासातील या दृश्याने मला शब्दाचे सामर्थ्य लक्षात आले.
                    तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ''आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू |'' पण हे शब्दांचे धन आणि शब्दांची शस्त्रे तुम्ही कोणत्या प्रकारे वापरता यावरच शब्द धनाची उपयुक्तता अवलंबून आहे. शब्द आपल्या मनाचा आरसा आहेत. आपण कोणते शब्द कसे वापरतो यावर आपला स्वभाव, आपली संस्कृती इतरांकडून ठरवली जाते. आपले शब्दच आपल्या नकळत आपली ओळख जगाला करून देत असतात.
                               "शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले" ही प्रेमाची परिभाषा फक्त प्रेमिकांनाच कळते. पण सामान्य जनांच्या बाबतीत मात्र आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचे शब्द हेच साधन आहेत. तसे पाहिले तर आपले डोळे, आपले हात, आपला चेहरा शब्दाविना संवाद साधण्याच प्रयत्न करत असतात. पण ही देहबोली नेहमीच प्रभावी होईल असे नाही. कधीकधी अर्थाचा अनर्थ निघून भलताच प्रसंग ओढवण्याची शक्यता त्या देहबोलीमध्ये अधिक असते. शैला मनोजबरोबर चारवेळा फक्त हसली. पण मनोजने त्याचा वेगळाच अर्थ घेतला, आणि लागला शैलाच्या  मागे लाळ घोटायला. शेवटी मनोजला समजावयाला शब्दच शैलाच्या मदतीला धावले.
                   शब्दांचा पसारा अफाट आहे. काही प्रेमळ, तर काही लागट. काही कठोर तर काही मृदू. तर काही "वज्रादपि कठोराणि, मृदूनि कुसुमानिच |" असे वर्णन करण्या इतके लवचिक असतात. ते जसे उच्चारावे तसे भाव त्यातून प्रकट होत जातात. "तू शहाणाच आहेस." आणि शहाणाच आहेस तू !" या दोन्ही वाक्यातील शब्द तेच आहेत. पण उच्चारातील फरकामुळे अर्थात लगेच बदल होतो. मध्यंतरी गावाला जाण्याचा योग आला. आणि एका आजीबाईच्या तोंडी " रांडेच्या " हा शिवराळ शब्द वारंवार येऊ लागल्यावर मी अचंबित झाले. नंतर कळले, प्रगाढ मैत्रीमध्ये जसा "साल्या" शब्द वापरला जातो; तसेच त्या आजीबाई :"रांडेच्या" शब्दातून आपली जवळीक, आपले कौतुक व्यक्त करीत होत्या. मराठी भाषेत "रांडेच्या", "साल्या" यासारख्या शिवराळ शब्दांनी सभ्यतेचा पोशाख कधी चढवला हे मात्र कोणाला कळलेच नाही.
                               लहानपणी बागेमध्ये एक भिकारी कितीही सांगूनसुद्धा आमच्या खेळायच्या जागेवरून उठतच नव्हता. पण पोलिसाने एकदाच त्याला सांगितले आणि लगेचच काही नबोलता तो तेथून पसार झाला. तेंव्हा आईम्हणाली, "बघितलस पोलिसांच्या शब्दांना किती वजन असत ते. " तेंव्हा शब्दांना वजन असते याची जाणीव प्रथम झाली. त्यानंतर असच एकदा आमच्या इमारतीचा पहारेकरी बाबांना म्हणाला, " साहेब तुम्ही सांगा ना त्या लोकांना . तुमच्या शब्दांना किंमत आहे. आम्हाला कोण विचारतय हो !" तेंव्हा शब्दांना वजनाबरोबरच किंमतही असते हे सुद्धा कळले. पुढे मी जसजशी मोठी होत गेले; तसतसे मला जाणवू लागले की, व्यक्तीचे वय, अधिकार, शिक्षण, कर्तृत्व इत्यादि अनेक कारणांमुळे शब्दांची किंमत व वजन वाढत असते.मोठमोठे पुढारी  आणि त्यांचे अनुयायी, तसेच साधुसंत आणि त्यांचे भक्त यांच्या कहाण्या ऐकल्यावर  लक्षात आले कि; प्रेम, भक्ती आणि विश्वास या कारणांमुळेही शब्दांची किंमत वाढत असते. शब्दांना जशी किम्मत असते, वजन असते; तसेच दिला शब्द पाळणार्‍यालाही समाजात मान असतो. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले." या संतवचनानुसार अशा व्यक्तींचे शब्द केवळ झेललेच जातात असे नाही तर ते दीर्धकाळपर्यंत लक्षातही रहातात. आणि इतिहासात त्याची नोंदही ठेवली जाते.
            शब्दांना जसे वजन, किंमत असते तसेच शब्दांना धारही असते. एकाच घावात सारे नाते संबंध तोडण्याचे सामर्थ्य शब्दात आहे. शब्दांच्या सहाय्याने ओळखी वाढवल्या जातात, नाती जोडली जातात आणि शब्दांच्याच मार्फत ते तोडलेही जातात. शब्द  मनाची शस्त्रे आहेत. हळूवार फुंकर घालून मनाच्या वेदना कमी करण्याची जादू शब्दात आहे. उलट मनाच्याभरलेल्या जखमांची खपली काढून घळाघळा रडायला लावण्याची किमयाही शब्दच करू शकतात. थोडक्यात शब्दांचा संबंध मनाशी आहे जखम करून मनाला वेदना देणारे शब्दच आणि त्या जखमेवरच औषधही शब्दच .
                         शब्दांचे खरे सौंदर्य त्यातील अर्थावर आणि ते बोलणार्‍याच्या लकबीवर अवलंबून असले तरी  शब्द सुरात गुंफले की त्याला एक अवीट गोडी प्राप्त होते. आणि असे सुरीले शब्द आपल्या आवडत्या गायकाकडून ऐकायला मिळाले की त्याची लज्जत आणखीच वाढते. शब्द बोलतात, शब्द गातात, आणि गाडीतून प्रवास करताना शब्द पळतानाही दिसतात. पण काही वेळा शब्द घाबरतात सुद्धा. मग एखाद भयानक दृश्य पाहून कधी आपली बोबडीच वळते; तर कधी आपली दातखिळीच बसते. अशावेळी तोंडातून शब्द बाहेर पडायलाच घाबरतात. मात्र  काहीवेळा शब्द लाजेनेही लपून बसतात. प्रिती, भक्ती, आदर आणि विश्वास आपण गमावून बसू अशा आशंकेने शब्द मग आपल्या मुखरूपी घरातून बाहेर पडतच नाहीत. कधी कधी हेच शब्द रागवतात, रुसतात आणि चक्क अबोलाही धरतात.
                              शब्द कोणत्या का भाषेतले असेनात शब्दसामर्थ्य मात्र अफाटच आहे. म्हणून शब्दांची योग्य ओळख करून घेऊन  त्यांच्याशी दोस्ती केली तरआपले जीवन नक्कीच सुरमय , सुखमय होऊन जाईल यात शंकाच नाही.