असे हे शाहीर :१.होनाजी बाळा, २.रामजोशी ३.परशुराम 

१. शाहीर होनाजी बाळा

शाहीर होनाजीचे आडनाव 'शिलारखाने' असे होते. स्वतः होनाजी काव्य करी व त्याचा मित्र बाळा करंजकर गायन करी म्हणून त्यांच्या फडाला होनाजी बाळाचा फड असे म्हणत. होनाजी जातीने गवळी होता. त्याचे आजोबा पहिल्या बाजीरावापासून पेशव्यांकडे नोकर होते. ते शाहीरीही करत. होनाजीचे चुलतेही शाहीरच होते. त्यामुळे होनाजीला वंशपरंपरेनेच कवित्वाची देणगी मिळाली होती. पुराणकथा व पंडिती काव्याचा त्याचा अभ्यास होता होनाजीची बैठकीची लावणीही प्रसिद्ध होती. शास्त्रीय रागदारीवर आधारित संथ चालीवरच्या लावण्या त्यांनी रचल्या. डफावर थाप मारून उंच स्वरात त्यांनी काव्य गायिली नाहीत . त्यांच्या लावणीचे शब्दसामर्थ्य आकर्षक होते. त्यांची शब्द रचना बांधीव व मुलायम होती. त्यांच्या शब्दरचनेत सहजता होती. शृंगाररसाचा अद्भूत प्याला होनांजींनी रसिकांसमोर ठेवला. इतकेच नाही तर विरहाची लावणी , गरोदर स्त्रीच्या दु:खाची लावणी, वांझेची लावणी,अशा विविध लावणीतून स्त्रीमनाचे दर्शनही त्यांनी घडवले.

होनाजींनी काही पोवाडेही रचले आहेत. खर्ड्याच्या लढाईचा पोवाडा, रंगपंचमीचा पोवाडा, दुसर्‍या बाजीरावाचा पोवाडा, आसे अनेक पोवाडे होनाजींनी रचले. शिमग्याचे पाच दिवस ते सरकारवाड्यापुढे तमाशाही सादर करत.

होनाजींची भूपाळी त्यांच्या सात्त्विक भाषेचा प्रत्यय देते. हुबेहुब शब्दचित्रे तयार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या काव्यात होते. "घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरूणोदय झाला" ही भूपाळी माहीत नाही असा एकही मराठी माणूस नसावा. त्यांच्या वाणीत माधुर्य आणि कवनात संगीत भरून राहिलेले होते. सन १८१० मध्ये मारेकरी घालून त्यांना ठार मारण्यात आले.

२.शहीर रामजोशी
सन १७५८ ते १८१३ या काळात ब्राम्हण कुलात रामजोशी हे रंगेल शाहीर होऊन गेले. "सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली" ही त्यांची लावणी प्रसिद्ध आहे.त्यांच्या कव्यातील शब्दसौष्टव त्यांच्या प्रतिभेची साक्ष देते. त्यांचा आवाज उंच व लावण्या उत्तेजक होत्या. ते स्वतः उंच, गोरे व रूबाबदार होते. ते मुळचे नाशिक परिसरात रहाणारे होते. त्यांचा मोठा भाऊ किर्तनकार होता. रामजोशींनी संस्कृत भाषेत लावण्या रचल्या आहेत. संस्कृतबरोबरच हिंदी, कानडी,व मराठी अशा मिश्र भाषेतही त्यांनी लावण्या रचल्या आहेत. पण पंडिती परंपरेतील आवडीनिवडी असलेले हे कवी शृंगारिक काव्यात अधिक रमले आणि शाहीर म्हणून प्रसिद्ध झाले. 'चिमा' व 'बया' या नाचणार्‍या दोन स्त्रियांबरोबर पोपट , माकडे , घोडे असा लवाजमा घेऊन ते गावोगाव आपला फड लावत असत.कवी मोरोपंतांनी रामजोशींना तमाशापासून परावृत्त केले.रामजोशी किर्तनही करत असत. त्यांनी भक्तीपर रचनाही रचल्या आहेत.

३. शाहीर परशुराम
सर्व शाहिरांमध्ये जास्तीतजास्त वेगवेगळ्या विषयांवर रचना करणारे शाहीर म्हणजे परशुराम. ते जातीने शिंपी होते. त्यांचा जन्म सन १७५४ मध्ये झाला असावा. नाशिक परिसरात त्यांचा फड प्रसिद्ध होता. त्यांना विट्ठलाचे दर्शन झाले असल्याने लोक त्यांना अवतारी पुरूष म्हणत. समाजाला नीतीच्या मार्गाला लावण्यासाठी त्यांनी लावण्या रचल्या. पण त्यात उपदेशात्मक रचना न करता त्यांनी लावणीला मनोरंजनात्मक रूप दिले. विनोदातून मनुष्य स्वभावाचे दर्शन त्यांनी घडविले आहे.