पर्ल बक 

साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कर मिळवणार्‍या जगातील पहिल्या स्त्री लेखिकेचा मान पर्ल बक यांना मिळाला. पर्ल बक यांचा जन्म २६ जून सन १८९२ मध्ये अमेरिकेतील " हिल्सबरो" येथे झाला. पर्ल बकचेआई वडिल चीनमध्ये अमेरिकन मिशनरी म्हणून काम करीत होते. त्यामुळे पर्ल बक यांचे बालपण व तारुण्य चीनमध्येच गेले. चीनमधील शांघाय येथील एका शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. मात्र उच्च शिक्षणासाठी त्यांना अमेरिकेला पाठवण्यात आले. तेथे लिचेनबर्ग येथील महिला विद्यापीठातून त्यांनी सन १९१४ मध्ये पदवी संपादन केली. आणि त्या पुन्हा चीनमध्ये आल्या. त्यानंतर जॉन एल. बक या अमेरिकन मिशनरी तरूणाबरोबर त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर काही काळ शिक्षिका म्हणून नोकरी करून त्यांनी आपल्या लेखनास आरंभ केला. सन १९३० मध्ये पर्ल बक यांची पहिली कादंबरी " ईस्ट विंड वेस्ट विंड" प्रकाशित झाली. सन १९३१ मध्ये प्रकाशित झालेल्या " द गुड अर्थ" या कादंबरीने लेखिका म्हणून पर्ल बकना जगभर मान्यता मिळवून दिली. एक चीनी शेतकरी व त्याची पत्नी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या कादंबरीला सन १९३२ चा "पुलित्झर पुरस्कार मिळाला. आणि जगातल्या वीस भाषांमधून त्याचे अनुवाद प्रसिद्ध झाले. पर्ल बक यांनी चाळीसहून अधिक कादंबर्‍या लिहिल्या. त्यामध्ये बाल साहित्याचाही समावेश आहे. त्याशिवाय आपल्या वडीलांचे "दी फायटिंग एन्जल", आणि आईचे "दी एक्झाईल'' अशी दोन अपूर्व चरित्रे लिहिली."माय सेव्हरल डेज" हे पर्ल बकचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. पर्ल बक यांची मुलगी अपंग व मंद बुद्धीची होती. तिच्या संबंधात त्यांनी "द चाईल्ड हू नेव्हर ग्रू " या नावाच्या बर्‍याच लघुकथाही लिहिल्या.
पर्ल बक जशा लेखिका म्हणून प्रसिद्ध होत्या तशाच त्यांना समाजसेविका म्हणूनही मान होता. देशोदेशीच्या अनेक अपंग, अनाथ आणि मंदबुद्धी मुलांना दत्तक घेऊन त्यांचा त्यांनी सांभाळ केला. त्यासाठी त्यांनी अनेक संस्था काढल्या. आणि अफाट पैसा खर्च केला. ऐंशी वर्ष एवढे दीर्घ आयुष्य लाभलेल्या या लेखिकेने ६ मार्च सन १९७३ रोजी या जगाचा निरोप घेतला.