पंडिता रमाबाई 

अनंतशास्त्री डोंगरे नावाच्या विद्वान पंडिताच्या पोटी रमाबाई यांचा जन्म झाला. रमाबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. आति तीव्र बुद्धिमत्ता आणि संस्कृतचा वारसा रमाबाईंनी आपल्या वडिलांकडून घेतला होता.लहानपणी बहीण कृष्णा आणि भाऊ श्रीनिवास यांच्या बरोबरीने वडिलांकडून रमाबाईंनीही  शिक्षण घेतले. आई, वडील व मोठ्या बहिणीच्या मृत्युनंतर रमाबाई व श्रीनिवास कलकत्ता येथे गेले. त्यांच्या विद्येची कीर्ती अगोदरच तेथे पोहोचली होती. त्यांची हुशारी पाहून कलकत्ता विद्यापीठातील प्रोफेसर टोनी आणि महेशचंद्र न्यायरत्न यांनी रमाबाईंचा सत्कार करून त्यांना "पंडिता" ही  पदवी दिली. कलक्त्याला बिपिनबिहारी मेधावी यांच्याशी रमाबाईंचा विवाह झाला परंतु लवकरच अल्पशा आजाराने त्यांच्या पतीचे निधन झाले.त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात येऊन स्त्रियांसाठी कार्य करायचे ठरवले. आणि सन १८८२ मध्ये रमाबाई पुण्यात येऊन दाखल झाल्या. पुण्याला रमाबाईंनी 'आर्य महिला समाज" नावाची संस्था स्थापन केली.
त्यानंतर सन १८८३ मध्ये परदेशातील सामाजिक स्थितीचा अभ्यास करावा व त्याबरोबरच इतर काही विद्या शिकून घ्याव्यात या उद्देशाने रमाबाई विलायतेला गेल्या. इंग्लंडमधे जाऊन रमाबाईंनी संस्कृतचे अध्यापन केले आणि इंग्रजीबरोबरच पदार्थ विज्ञानाचाही अभ्यास केला. हिब्रू भाषा शिकून तिचे व्याकरण तयार केले. इंग्लंडम्ध्ये असताना त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षिल्या गेल्या. ख्रिस्ती धर्माची तत्त्वे रमाबाईंना इतकी पटली; कि त्यांनी आपल्या हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. विलायतेहून महाराष्ट्रात परत आल्यावर रमाबाईंनी ११ मार्च १८८९ रोजी " शारदा सदन" संस्थेची स्थापना केली. आणि तेथे विधवा व परित्यक्ता स्त्रियांना आश्रय दिला. पण रमाबाईंचे अनुकरण म्हणून या आश्रमातील अकरा मुलींनी ख्रिस्ती धर्म स्विकारला. आणि या घटनेचे पडसाद समाजात एवढे उमटले कि, त्याचे पर्यवसान म्हणून "शारदा सदन" ही संस्थाच बंद पडली. अर्थात त्यामुळे रमाबाईंचे कार्य मात्र थांबले नाही. अमेरिकेतून लक्षावधी रुपयांची मदत घेऊन रमाबाईंनी अनाथ व अपंगांसाठी "प्रिती सदन", "मुक्ती सदन", "कृपा सदन" यासारख्या अनेक संस्था काढल्या. स्त्रियांना व्यावसायिक शिक्षण दिले. रमाबाईंनी अनेक पुस्तकेही लिहिली. "उच्च वर्णीय हिंदू महिला", "स्त्री बोधिनी", "युनायटेड स्टेटची लोक स्थिती" आदि अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. ५ एप्रिल १९२२ रोजी रमाबाईंचे देहावसान झाले.